कोरोनाच्या काळात वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन स्कुलमुळे घरात राहून सतत मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर सध्या वाढला आहे. मात्र यामुळे दिवसभर घरातील मोठी माणसं आणि लहान मुलं स्क्रीनवर काम करताना दिसतात. स्क्रीन टाईम वाढल्यामुळे तुमच्या डोळ्यांवर, मानेवर आणि संपूर्ण आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. ज्यांना कोणतेही काम नाही असे लोक मनोरंजनासाठी टीव्ही आणि मोबाईलवर वेळ घालवतात. सहाजिकच सध्या लोकांचा स्क्रीन टाईम नक्कीच वाढलेला आहे. यावर लवकर काही तरी उपाय करायला हवा. एकतर या काळात बाहेर न गेल्यामुळे तुमची शारीरिक हालचाल पुरेशी होत नाही शिवाय स्क्रीन टाईम वाढल्यामुळे डोळे, डोके यांच्यावर परिणाम होताना दिसत आहे. ज्यामुळे अनिद्रा, नैराश्य, चिडचिड अशी लक्षणे लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळत आहेत. यासाठीच जाणून घ्या कसा कमी करावा स्क्रीन टाईम
तुमचा स्क्रीन टाईम मॉनिटर करा –
जर तुम्हाला स्क्रीन टाईम कमी करण्याची गरज वाटत असेल तर आधी तुमचा स्क्रीन टाईम मॉनिटर करा. ज्यामुळे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही दिवसभरात कितीवेळ स्क्रीनवर घालवता. स्क्रीन टाईम मॉनिटर करणारे काही अॅप तुम्ही मोबाईलवर डाऊनलोड करू शकता. टीव्ही किती वेळ पाहायचा याचंही टाईमटेबल तुम्हाला बनवायचं आहे. मोबाईलवर ऑनलाईन शॉपिंग, सोशल मीडियाचा वापर कमी करा. तुम्ही नेमका कितीवेळ या गोष्टींसाठी देता हे एकदा तुमच्या लक्षात आले की यातील किती वेळ तुम्ही कमी करू शकता हे तुमच्या नक्कीच लक्षात येईल. तुमच्या कामाची प्राथमिकता ठरवा आणि त्यानुसार तुमचा वेळ स्क्रीनवर घालवा.
pexels
स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवा –
कोरोना महामारीमुळे तुम्हाला बाहेर जाता येत नाही आहे, घरात राहून काम करावे लागत आहे, शाळेचा अभ्यास आणि प्रोजेक्ट करण्यासाठी मोबाईल गरजेचा आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत आहेत. मात्र या व्यतिरिक्त तुम्ही किती वेळ मोबाईल वर घालवता आणि इतर गोष्टींचा मोह सोडण्यासाठी तुमच्या मनावर कसं नियंत्रण ठेवायचं याबद्दल थोडा गंभीर विचार करा.
कोणती कामे स्क्रीन शिवाय तुम्ही करू शकता
आयुष्यात अशी अनेक कामे असतात जी तुम्ही स्क्रीन शिवाय नक्कीच करू शकता. सतत झूम, व्हिडिओ कॉलवर चर्चा करण्यापेक्षा तुम्हाला सांगायचा मेसेज रेकॉर्ड करून तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना पाठवू शकता. ज्यामुळे तुम्ही कमी वेळ मोबाईलवर घालवाल. स्वयंपाक करण्यासाठी मोबाईलवरील रेसिपी पाहण्याऐवजी रेसिपी बुक्स वापरा. शक्य असल्यास एकदाच सर्व ऑनलाईन शॉपिंग करा ज्यामुळे प्रत्येक गोष्ट मागवण्यासाठी तुम्हाला सतत फोन वापरावा लागणार नाही.
नोटिफिकेशन्स काही काळासाठी बंद ठेवा
आपण सर्व नोटिफिकेशन्स सतत सुरू ठेवतो ज्यामुळे तुमचा फोन सतत व्हायब्रेट होत राहतो आणि तुम्ही वारंवार फोनकडे पाहत राहता. जेव्हा तुमचे काम सुरू नसेल तेव्हा नोटिफिकेशन्स बंद ठेवा. ज्यामुळे तुमचे लक्ष इतर कामामध्ये लागेल आणि तुमचा मोबाईलचा वेळ कमी जाईल.
20-20-20 चे तंत्र शिकून घ्या –
वर्क फ्रॉम होम करताना अथवा ऑनलाईन स्कुल दरम्यान तुम्ही हे टेकनिक नक्कीच वापरू शकता. डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे टेकनिक फार चांगले आहे. दर वीस मिनीटांनी वीस सेंकद वीस फूट लांब नजर टाका. काही सेंकद पापण्यांची उघडझाप करा. एक तासानंतर पाच मिनीटांचा ब्रेक घ्या आणि स्क्रीन पासून जरा दूर जा.
जेवताना आणि झोपताना स्क्रीन पाहू नका –
झोपण्यापूर्वी एक तास आधी सर्व गॅजेट बंद करा. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळी स्नॅक्स घेताना आणि रात्री जेवताना फोन, टीव्ही, मोबाईलपासून दूर राहा. ज्यामुळे तुमचे तुमच्या खाण्याकडे व्यवस्थित लक्ष राहिल आणि रात्री लवकर झोप येईल. यामुळे तुमच्या आरोग्य नक्कीच सुधारेल.
एका वेळी एकच स्क्रीन असा असावा रूल –
सध्याचा जमाना हा मल्टी टास्कचा आहे. त्यामुळे एकाचवेळी अनेक गोष्टी करण्यात तुम्हाला पारंगत व्हायचे असेल. पण या सर्वांमुळे जर तुमचे आरोग्य धोक्यात येणार असेल तर तुम्हाला त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. यासाठी एका वेळी फक्त एकच स्क्रीन पाहा. काम करताना टीव्ही, मोबाईल वापरणे टाळा. टीव्ही पाहताना मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर करू नका.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
या पावसाळ्यात अशी घ्या तुमच्या मोबाईलची काळजी
कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी असा करा तुमचा मोबाईल स्वच्छ