सध्या सगळीकडे ‘सिम्बा’चीच चर्चा सुरु आहे. सिम्बा या वर्षीचा धमाकेदार हिंदी चित्रपट असणार आहे. सिम्बामध्ये ‘रणवीर सिंग’ आणि ‘सारा अली खान’ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एवढंच नाही तर या बहुचर्चित हिंदी चित्रपटात तब्बल ‘अकरा मराठी कलाकार’ देखील आहेत. सिम्बा मध्ये वैदेही परशुरामी, सिद्धार्थ जाधव, अश्विनी काळसेकर, सौरभ गोखले, विजय पाटकर, अशोक समर्थ, नेहा महाजन, अरुण नलावडे, सुलभ आर्या, नंदु माधव, सुचित्रा बांदेकर हे मराठी कलाकार झळकणार आहेत.
रोहित शेट्टी यांचे ‘मराठी’ कलाकारांवर विशेष प्रेम
रोहित शेट्टी यांनी यापूर्वीदेखील त्यांच्या चित्रपटांमध्ये मराठी कलाकारांची निवड केली होती. सिम्बामधील या अकरा कलाकारांपैकी ‘अश्विनी काळसेकर’ ही मराठी अभिनेत्री जवळजवळ सहाव्यांदा रोहित शेट्टी यांच्या चित्रपटातून काम करत आहे. विजय पाटकर यांनीदेखील आतापर्यंत पाचवेळा रोहित शेट्टी यांच्या चित्रपटात काम केलं आहे. सुचित्रा बांदकर आणि अशोक समर्थ यांनी देखील रोहित शेट्टी यांच्या सिंघममध्ये यापूर्वी काम केलं आहे. तर सिद्धार्थ जाधव रोहित यांच्या गोलमाल मध्ये झळकला होता. आता सिम्बामधील या भल्या मोठ्या मराठी स्टारकास्ट वरुन रोहित शेट्टी यांचं मराठी कलाकारांवरचं विशेष प्रेम दिसून येत आहे.
‘सिम्बा’ बॉक्सऑफिस गाजवणार
रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ चित्रपट 28 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटामध्ये रणवीर सिंग एका लालची पोलिसाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येत आहे. मराठी पोलिसाची भूमिका असल्याने या चित्रपटातील त्याचे बरेचसे संवाद देखील मराठीच असणार आहेत. सारा अली खानचादेखील केदारनाथनंतर लगेचच हा दुसरा चित्रपट आहे. साराच्या ‘हटके’ अभिनयाची चुणूक या चित्रपटातून दिसणार आहे. रोहित शेट्टीच्या ‘सिंघम’, ‘चेन्नई एक्सप्रेस’ आणि ‘गोलमाल’ नंतर ‘सिम्बा’ बॉक्स ऑफिस गाजवणार हे नक्की.
फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम