सनस्क्रीन लावणं त्वचेच्या सुरक्षेसाठी खूप गरजेचं आहे. उन्हाळ्याप्रमाणे हिवाळा अथवा पावसाळ्यातही सनस्क्रीन लावायला हवं. सनस्क्रीनमुळे तुमच्या त्वचेचं सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण होतं. जर तुम्ही नियमित सनस्क्रीन लावत असाल तर तुम्हाला शरीरावर कुठे कुठे सनस्क्रीन लावायला हवं हे माहीत असायला हवं. कारण बरेच लोक फक्त चेहरा आणि हातावर सनस्क्रीन लावतात. मात्र त्या व्यक्तिरिक्त शरीरावर या पाच ठिकाणी सनस्क्रीन लावणं तितकंच गरजेचं आहे.
शरीरावर या पाच ठिकाणी अवश्य लावा सनस्क्रीन
चेहरा आणि हातांप्रमाणेच तुम्ही तुमच्या शरीरावर या पाच ठिकाणी सनस्क्रीन लावायला हवं.
कान
आपण चेहऱ्यावर सनस्क्रीन लावतो पण बऱ्याचदा कानाकडचा भाग विसरून जातो. चेहरा आणि मानेवर सनस्क्रीन लावताना कानाकडील भाग मुळीच विसरू नका. कारण जर तुम्ही कानाकडील त्वचेवर सनस्क्रीन लावलं नाही तर तुमच्या कानाकडील त्वचेचं सूर्यकिरणांमधील हानिकारक घटकांमुळे नुकसान होऊ शकतं. सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेचे आजार, सनबर्न होण्याची शक्यता असते.
पापण्या
चेहऱ्यावर सनस्क्रीन लावताना कानाप्रमाणेच पापण्यादेखील बऱ्याचदा लक्षात येत नाहीत. ज्यामुळे पापण्यांवर सनस्क्रीन लावलं जात नाही. मात्र लक्षात ठेवा तुमच्या पापण्यादेखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. कारण डोळ्यांच्या वरील आवरण असलेल्या पापण्या अतिशय नाजूक असतात. त्यामुळे जर तुम्ही त्या सनस्क्रीनने कव्हर केल्या नाहीत तर तुम्हाला पापण्यांवर सुरकुत्या अथवा सनटॅन होण्याची शक्यता जास्त असते.
ओठ
ओठ हा चेहऱ्यावरील अतिशय संवेदनशील अवयव आहे. आपण मेकअप करताना लिपस्टिक लावत असल्यामुळे या ठिकाणी सनस्क्रीन लावतोच असं नाही. यासाठीच असं लिपबाम अथवा लिपस्टिक खरेदी करा ज्यामध्ये एपीएफ 30 असेल. ज्यामुळे तुमच्या ओठांचे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून नक्कीच संरक्षण होईल.
मान आणि छाती
काही लोकांना फक्त चेहऱ्यावर सनस्क्रीन लावण्याची सवय असते.पण लक्षात ठेवा चेहऱ्यासोबत तुम्ही मान आणि छातीकडील त्वचादेखील सनस्क्रीनने सुरक्षित करायला हवी. कारण जर हा भाग उघडा राहिला आणि तो सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आला तर त्यावर सनटॅन होण्याची शक्यता असते.
पाय
चेहरा आणि हाताला सनस्क्रीन लावलं की तुम्हाला सनटॅन होणार नाही असं नाही. कारण तुमचे पाय जर झाकलेले नसतील तर पायावर सनटॅन नक्कीच होऊ शकतं. त्यामुळे समुद्रकिनारी फिरताना तुम्ही पायावर सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे.