महाराष्ट्राची पारंपरिक वाडा संस्कृती, झिम्मा-फुगडी मंगळागौरीचे खेळ, पारंपरिक पेहरावातील साजशृंगार आणि याचसोबत नववर्षाचे स्वागत होणार ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी संगीतमय शिवचरित्राने.. अशा दिमाखदार वातावरणात गुढीपाडवा (Gudi Padwa) साजरा होणार असून जनप्रबोधन करणारी अनोखी शोभायात्रा यंदा निघणार आहे. ‘सईशा फाऊंडेशन मुंबई’तर्फे शिवचरित्र आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचा संगम असणाऱ्या ‘चैत्रोत्सव’ कार्यक्रमाचे पुण्याजवळील ढेपेवाडा या कलात्मक चिरेबंदी वाड्यात 2 आणि 3 एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले आहे. आपल्या परंपरा, संस्कृती… हे सारं काही अनुभवता यावं, नवीन पिढीला प्रत्यक्षात पाहता यावं, हा यामागचा उद्देश आहे.
नऊवारीचा साज, भव्य रांगोळी, व्हिंटेज फोटोसेशन, झिम्मा-फुगडी मंगळागौरीचे खेळ
भावबंधातून बांधली गेलेली जिव्हाळ्याची नाती ते ऋणानुबंध हे वाडा संस्कृतीच्या कानाकोपऱ्यात आजही खोलवर रुजली गेलेली आहेत. नऊवारीचा साज, भव्य रांगोळी, तांब्यापितळेची भांडीकुंडी, पाट चौरंग, जातं, चूल, उखळ….असं सारं काही या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनुभवता येईल. ”गुढीपाडवा आणि शोभायात्रेचं समीकरण आपली संस्कृतीदर्शक असून ढोल-ताशा, सनई चौघडा, सडा रांगोळी, दारी तोरण, मंगलमय व प्रसन्न वातावरणात एकत्र कुटुंब पद्धती हा जिव्हाळ्याचा विषय आहे. पँडेमिक परिस्थितीमुळे गेली दोन वर्ष हे सारं काही मोठ्या प्रमाणात साजरं करता आलं नाही, परंतु या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे क्षण पुन्हा जगता येणार आहेत. 82 वर्षांची आजी ते लहान मुलांपर्यंत, प्रत्येक वयोगटातील मंडळीचा सहभाग असेल. सायंकाळी भव्य दिवाणखान्यात ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’ हे प्रेरणादायी शिवचरित्र सादर केले जाईल.” असे लेखक अनिल नलावडे म्हणाले.
”मराठमोळ्या रुबाबदार पेहरावात, कौटुंबिक वातावरणात गुढीपाडव्यासहीत सारेच सणसंस्कार व आपल्या रितीभातींचा समावेश असणारा हा कार्यक्रम आहे. नऊवारीतील सखी मैत्रिणींच्या झिम्मा फुगड्यांनी रात्र जागवली जाईल. शिवाय शेजारीच असलेल्या शिल्पकार गणेश कुंभार यांच्या प्रतिभेने साकार झालेल्या संतसृष्टीने महाराष्ट्राच्या संतांचे भारावून टाकणारे दर्शन घडणार आहे.
फुले, तोरणे, रांगोळ्या आणि दिव्यांची आरास आणि याचसोबत सर्वपरीने जुन्या काळची स्मृती जागृत करणारे फोटोसेशन करून हा मराठी नववर्षारंभ कायमस्वरूपी कसा अविस्मरणीय राहील, याचसाठी सईशा फाऊंडेशन मुंबई हा गुढीपाडवा विशेष सोहळा आहे.” असे दिग्दर्शिका, निवेदिका पद्मश्री राव म्हणाल्या.
दोन वर्षाने साजरी होणार शोभायात्रा
गुढीपाडव्याला नेहमी शोभायात्रा विविध भागात काढली जाते. पण कोरोना काळात या शोभायात्रेची सगळेच वाट पाहात होते. शोभायात्रा दोन वर्ष झाली नाही आणि आता दोन वर्षाने ही शोभायात्रा पुन्हा एकदा सर्वांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनाच आनंद झाला आहे. शोभायात्रा म्हणजे पारंपरिकता जपणे आणि या शोभायात्रेमध्ये महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे यावर्षीच्या शोभायात्रेलाही एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. तसंच शिवयात्रा म्हटलं की, एक वेगळाच साज शोभाायत्रेलाही चढणार यामध्ये काहीच शंका नाही. यावर्षीच्या मराठी नववर्षाच्या अर्थात गुढीपाडव्याच्या दिवसाला खास महत्त्व प्राप्त झाले आहे आणि सर्वांनाच हर्षोल्हासात हा दिवस साजरा करण्याची इच्छा आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक