एखाद्या व्यक्तीचं आयुष्य सफल झालं याचं परिमाण सांगताना आपण नेहमी ‘मरावे परंतु कीर्ती रुपी उरावे’ या उक्तीचा वापर करतो. आपण हयात नसतानाही कीर्तीरूपांत लोकांच्या स्मरणात राहणे, त्यांच्या आठवणीत जिवंत राहणे यापेक्षा सुंदर गोष्ट काय असू शकते. असं जगणं फार कमी लोकांच्या वाट्याला येतं.अशा जगण्याचं नितांत सुंदर उदाहरण म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) ही गुरू शिष्याची जोडी. आपल्या हयातीत या दोघांना लोकांचं जेवढं प्रेम मिळालं तेवढंच प्रेम त्यांच्या इहलोकी गेल्यानंतरही कायम आहे. या प्रेमाची प्रचिती आपल्याला वारंवार येतच असते. याहीवेळी ती आली आहे आणि त्यासाठी निमित्त ठरलं आहे ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट. ठाण्याचा ढाण्या वाघ असलेले जननायक धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता बघायला मिळत आहे. या चित्रपटाचा टिझर समाजमाध्यमांवर सत्तर लाखांपेक्षा अधिक लोकांनी बघितला. नुकतंच या चित्रपटातील ‘गुरुपौर्णिमा’ हे गाणं समाजमाध्यमावर प्रदर्शित झालं आणि केवळ 20 तासांमध्ये या गाण्याला 20 लाखांहून अधिक प्रेक्षकवर्ग लाभला असून हजारो लोकांनी हे गाणं आपापल्या पेजवरून शेअरही केलं आहे. युट्यूबवर सुद्धा हे गाणे नंबर 1 ला ट्रेडिंगमध्ये आहे हे विशेष.
बाळासाहेबांचा आदेश म्हणजे दिघे यांच्यासाठी अखेरचा शब्द
धर्मवीर आनंद दिघे यांच्यासाठी गुरू, मार्गदर्शक, तत्त्वेता एवढंच नाही तर त्यांच्या गाभाऱ्यातील देवाच्या स्थानी असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेबांचा आदेश म्हणजे दिघे यांच्यासाठी अखेरचा शब्द. अशा या गुरुची पाद्यपूजा करत या नात्याला सन्मान देणारा प्रसंग गुरुपौर्णिमा या गाण्यातून रेखाटण्यात आलाय. हे गाणं काल प्रदर्शित झालं आणि त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. शिवसेनाप्रमुख आणि धर्मवीर यांच्यातील नात्याचा हा अनोखा प्रसंग बघताना अनेकजण भावूक झाले. जसं हे गुरू शिष्याचं नातं सर्वश्रुत आहे तसाच निर्मळ आणि निरपेक्ष भाव आहे आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे या गुरू-शिष्याच्या नात्यात. याही नात्याची एक झलक या गाण्यातून प्रेक्षकांना बघायला मिळाली. या गाण्यामुळे आता चित्रपटाबद्दलची कमालीची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.
निःस्वार्थी धर्मवीर आनंद दिघे
धर्मवीर आनंद दिघे यांनी निस्वार्थीपणे , कोणताही लोभ न ठेवता केवळ आणि केवळ सामान्यांच्या भल्यासाठी आपलं आयुष्य वेचलं. यामधून आनंद दिघे यांचा करारी बाणा तर दिसणारच आहे पण त्यांच्या आत असलेला एक हळवा शिष्य, गुरुंपुढे निस्सिम श्रद्धेने, आदराने नतमस्तक होणारा शिष्य अशी त्यांची एक दुसरी बाजू प्रेक्षकांना ‘गुरुपौर्णिमा’ या गाण्यातून बघायला मिळणार आहे. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका मकरंद पाध्ये या अभिनेत्याने साकारली आहे. या गाण्यातून प्रथमच बाळासाहेबांच्या या महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेची झलक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. प्रसाद ओक (Prasad Oak), क्षितिज दाते (Kshitij Date) यांच्याप्रमाणेच बाळासाहेब ठाकरे यांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मकरंद पाध्ये यांच्या लुकवरही रंगभूषाकार विद्याधर बट्टे यांनी घेतलेली मेहनत दिसून येते. झी स्टुडिओज, मंगेश देसाई (Mangesh Desai) यांच्या साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असलेला, आणि प्रविण तरडे यांच्या लेखन दिग्दर्शनाने सजलेला धर्मवीर मु.पो. ठाणे हा चित्रपट येत्या 13 मे रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक