‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या दूस-या पर्वाचा विजेता अभिनेता पृथ्वीक प्रतापच्या शॉर्टफिल्मला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पर्यावरण विषयक वसुंधरा लघुपट स्पर्धेत पृथ्वीकचा ‘वेकअप’ हा लघुपट दुसरा आला आहे.
‘झी मराठी’च्या ‘जागो मोहन प्यारे’मध्ये राहुलच्या भूमिकेत अभिनेता पृथ्वीक प्रताप दिसला होता. त्यानंतर सोनी मराठीवरच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात ‘कॉमेडीचा जहागिरदार’ झाला.
शालेय विश्वावर आधारित असलेल्या ‘बॅकबेंचर्स’ या प्रसिध्द वेबमालिकेमूळेही पृथ्वीक तरूणाईमध्ये लोकप्रिय आहे.
पृथ्वीकने ‘वेकअप’ शॉर्टफिल्मच्या अगोदर ‘दि क्लोजेट’, ‘दस रूपय्या’ अशा शॉर्ट्सफिल्म्समध्येही काम केलं आहे.
या शॉर्टफिल्मबाबत पृथ्वीकने सांगितले की,“मी कॉलेजमध्ये असल्यापासून शॉर्टफिल्ममध्ये काम करत आहे. पण वेकअप माझ्यासाठी खूप महत्वाची शॉर्टफिल्म आहे. कारण मी निसर्ग संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या एनजीओशी ही फिल्म निगडीत आहे. त्यामुळे माझ्या आवडीच्या विषयावर आधारित या शॉर्टफिल्मसाठी काम करणं अर्थातच अविस्मरणीय होतं. त्यातच आता आमच्या या शॉर्टफिल्मला महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा मानला जाणारा पुरस्कार मिळालाय. त्यामुळे आनंद द्विगुणीत होतोय.”
टफएग स्टुडियोच्या अनिकेत कदम आणि तिल्लोत्तम पवार दिग्दर्शित वेकअप ही शॉर्टफिल्म स्वच्छ भारत अभियानाचा संदेश देणारी आहे. एकही संवाद नसलेल्या या लघुपटामध्ये चेह-यावरील हावभावाच्या मदतीनेच पृथ्वीकला अभिनय करायचा होता.
हेही वाचा –
मराठीतला पहिला वेब सिनेमा ‘संतुर्की’ चा ट्रेलर प्रदर्शित