आपले यकृत आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी चोवीस तास कठोर परिश्रम करते. यकृताची योग्य काळजी न घेतल्यास विविध गुंतागुंत आणि गंभीर समस्या उद्भवू शकतात. यकृताची प्रमुख कार्ये म्हणजे खाल्लेले अन्न पचवणे आणि शरीरातील विषारी पदार्थ फिल्टर करणे ही आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षांपासून भारतीय लोकांची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी बिघडत चालल्या आहेत, त्यामुळे यकृताच्या समस्यांमुळे होणाऱ्या आजारांमध्ये भारताचा दहावा क्रमांक लागतो. म्हणूनच शरीराच्या या महत्त्वाच्या अवयवाची काळजी घेण्यासाठी उत्तम आहार, चांगली झोप आणि व्यायाम करणे आवश्यक आहे.
तुमच्या आहाराचा तुमच्या यकृताच्या आरोग्यावर परिणाम होतो. यकृत निरोगी ठेवण्यासाठी काही खास पदार्थ खाल्ले पाहिजेत आणि अस्वास्थ्यकर अन्न शक्यतोवर टाळायला हवे. चला जाणून घेऊया कुठले पदार्थ खाल्ल्यास यकृत निरोगी राहण्यास मदत होते.
टोफू
टोफू यकृताच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सोयापासून बनवलेले टोफू यकृतातील चरबीचे प्रमाण कमी करण्यास मदत करू शकते. सोया आणि टोफू यकृत निरोगी ठेवण्यासाठी प्रभावी आहेत असे तज्ज्ञांच्या अभ्यासात आढळले आहे.
बदाम
बदाम हा व्हिटॅमिन ई चा समृद्ध स्त्रोत आहे. संशोधनात आढळले आहे की व्हिटॅमिन E हे फॅटी लिव्हर या आजारापासून संरक्षण करण्यास मदत करू शकते. बदाम तुमच्या हृदयासाठी देखील चांगले आहेत, म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला हेल्दी स्नॅक्स खायचे असतील तेव्हा मूठभर बदाम खा.
ताजी सिझनल फळे व भाज्या खा
जर यकृत निरोगी ठेवायचे असेल तर आहारात भरपूर ताज्या भाज्या व फळांचा समावेश असायलाच हवा. तज्ज्ञांच्या काही अभ्यासांत असे आढळले आहे की ब्रोकोली तुम्हाला नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरपासून वाचवण्यास मदत करू शकते. जर फक्त उकडलेली ब्रोकोली खाणे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही त्यावर थोडे लिंबू पिळून खाऊ शकता. यकृताच्या चांगल्या आरोग्यासाठी फळांचे सेवन देखील तितकेच महत्त्वाचे आहे. लिंबूवर्गीय फळे जसे संत्री आणि द्राक्षे यकृत निरोगी ठेवण्यास मदत करतात. संत्र्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी यकृतामध्ये चरबी जमा होण्यापासून रोखण्यास मदत करते. द्राक्षांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स यकृत निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असतात. क्रॅनबेरी आणि ब्लूबेरीसारख्या काही इतर फळांमध्ये देखील अँटिऑक्सिडेंट असतात जे यकृत निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर असतात.
ग्रीन टी
यकृत शेवटपर्यंत निरोगी आणि कार्यरत ठेवायचे असेल तर त्यासाठी ग्रीन टी हा एक उत्तम पर्याय आहे. ग्रीन टी मुळे यकृत निरोगी राहते, तसेच अनेक आजार देखील आपल्यापासून लांब राहतात. ग्रीन टीमुळे यकृतातील एन्झाइमची पातळी सुधारू शकते, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होऊ शकतो तसेच यकृतातील चरबी देखील कमी होऊ शकते.
मद्यपान टाळा
जास्त मद्यपान केल्याने यकृत निकामी होऊ शकते. मद्यपानाने कालांतराने लिव्हर सिरोसिस देखील होऊ शकतो.
सोडा आणि व्हाईटब्रेड
हे रिफाइण्ड कार्बोहायड्रेट्स आणि साखरेचे एक प्राणघातक संयोजन आहे ज्यामुळे तुमच्या यकृताला कोणताही फायदा होत नाही. सोडा आणि व्हाईटब्रेडचे जास्त सेवन केल्यास फॅटी लिव्हर डिसीजचा धोका देखील वाढतो.
जास्त मीठ असलेले पदार्थ
जास्त मीठ खाणे यकृतासाठी चांगले नाही. यकृताचे आरोग्य राखण्यासाठी, मीठाचे सेवन कमी करायला हवे. जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात पाणी साठून राहते. यासाठी कॅन्ड पदार्थ आणि सोडियमचे प्रमाण जास्त असलेले प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळावे. पॅकेज केलेले खारट स्नॅक्स जसे की चिप्स, मिक्स, खारट बिस्किटे इत्यादी देखील टाळा कारण त्यात सॅच्युरेटेड फॅट आणि मीठ भरपूर असते. या पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने फॅटी लिव्हर डिसीज, तसेच लठ्ठपणा होऊ शकतो.
यकृताचे आरोग्य जपण्यासाठी हे लक्षात ठेवा.
Photo Credit- istockphoto
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक