महिलांचा जिव्हाळ्याचा विषय असलेली पैठणी घेऊन आदेश बांदेकर घरोघरी आले आणि होम मिनिस्टर या कार्यक्रमाला सर्वच महिलांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. हा कार्यक्रम जवळजवळ पंधरा वर्षांहून जास्त काळ लोकप्रिय ठरला आहे. टीव्हीवर “दार उघड बया दार उघड” अशा शीर्षक गीताची सुरूवात होताच सर्व महिला हातातील काम टाकून हा पैठणीचा खेळ आजही बघत बसतात. आजवर अनेक महिलांनी या खेळात पैठणी मिळवली. ज्यामुळे आपल्याकडे एकतरी पैठणी असावीच ही त्यांची इच्छा पूर्ण झाली. आता लवकरच या कार्यकमाचं नवं पर्व सुरू होणार आहे. या पर्वाचं नाव होम मिनिस्टर बदलून महा मिनिस्टर असं ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात विजेत्या ठरलेल्या वहिनीला आदेश भाऊजी चक्क सोन्याची जर असलेली 11 लाखांची पैठणी भेट देणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाची चर्चा आणि लोकप्रियता अधिकच वाढताना दिसत आहे.
महा मिनिस्टरमध्ये नेमकं काय काय असेल
होम मिनिस्टरची लोकप्रियता पाहता वाहिनीने आता या कार्यक्रमाला आणखी वरच्या उंचीवर नेण्याचं ठरवलं आहे. आजवर अठरा वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात होम मिनिस्टरची टीम जाऊन आली आहे. देशभ्रमंती करत भारताबाहेर असलेल्या भारतीय वहिनींनीही या कार्यक्रमात पैठणी जिंकली आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचा चेहरा मोहरा बदलत आता महामिनिस्टरचं रूप देण्यात येणार आहे. झी मराठीचा एक प्रोमो आता सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ज्यामध्ये आदेश बांदेकर यांना सुचित्रा बांदेकर यांची एक प्रेमळ नौकझौक दाखवण्यात आली आहे. या प्रोमोवरून लवकरच आता महामिनिस्टर पदासाठी पैठणीचा खेळ रंगणार याची उत्सुकता दिसून येत आहे. आता ही 11 लाखांची सोन्याची जर असलेली पैठणी नेमकी कोणती वहिनी जिंकणार याकडे सगळ्या महिला वर्गाचं लक्ष लागलं आहे.
नवीन पर्वाची नवी मजा
नवीन पर्वात महामिनिस्टरच्या शोधात आदेश भाऊजी महाराष्ट्राच्या आणखी वेगवेगळ्या जिल्ह्यात पैठणीचा खेळ घेऊन दाखल होतील. या खेळात विजेत्या ठरलेल्या वहिनीला ते स्वतःच्या हाताने महामिनिस्टरचा खिताब आणि 11 लाखांची सोन्याची जरी असलेली पैठणी देणार आहेत. 11 लाखांच्या या महापैठणीसाठी चुरस रंगताना दिसणार आहे. त्यामुळे सर्व वहिनी या नवीन पर्वासाठी आणि महामिनिस्टरचा खिताब जिंकण्यासाठी उत्सुक आहेत असं म्हटलं तर खोटं ठरणार नाही. कारण आजकाल प्रत्येकीकडे पैठणी असते पण सोन्याची जर असलेली मौल्यवान पैठणी मिळवणं नक्कीच उत्कंठा वाढवणारं आहे.