तेलकट त्वचेची मुख्य समस्या ही असते की त्वचेवर सतत तेलाचा थर जमा झाल्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स वाढू लागतात. जास्त प्रमाणात त्वचेवर फेसवॉश अथवा क्लिंझर्सचा वापर केला तर त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते. याचा परिणाम तुमच्या त्वचेवर लगेच जाणवू लागतो. एकीकडे त्वचेवर पिंपल्स तर वाढतातच शिवाय त्यांच्या खुणा त्वचेवर तशाच राहिल्याने त्वचेवर डाग,व्रण दिसू लागतात. अती प्रमाणात चेहरा धुतल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक कमी होते आणि चेहरा निस्तेज दिसू लागतो. यासाठीच तुम्हाला अशा फेसवॉशची गरज असते ज्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ तर होईलच पण सोबत त्वचेची योग्य निगादेखील राखली जाईल. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत असे काही घरगुती फेसवॉश शेअर करत आहोत. जे तुम्ही कधीही आणि कितीही प्रमाणात वापरू शकता.
तेलकट त्वचेसाठी होममेड फेसवॉश
बाजारात विविध प्रकारचे फेसवॉश मिळतात. मात्र ते सर्वच तेलकट त्वचेसाठी योग्य नसतात. यासाठीच स्वतःच घरी तयार तरा हे फेसवॉश.
अॅपल सायडर फेसवॉश
जर तुमच्या त्वचेवर सतत तेलकट थर जमा होत असेल तर अॅपल सायडर व्हिनेगरने तो कमी होऊ शकतो. कारण यामुळे तुमच्या त्वचेखाली निर्माण होण्याच्या अतिरिक्त सीबमला प्रतिरोध केला जातो. ज्यामुळे त्वचा तर स्वच्छ होतेच शिवाय चेहरा पु्न्हा लगेच तेलकट होत नाही.
कसा तयार कराल –
एका बाऊलमध्ये तीन चमचे पाणी आणि एक चमचा व्हिनेगर घ्या.
दोन्ही घटक चांगले एकजीव करा.
कापसाच्या मदतीने मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि काही मिनीटांनी चेहरा स्वच्छ धुवून टाका.
कॉफी फेसवॉश
तेलकट चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही चक्क तुमच्या घरातील कॉफीचा वापर करू शकता. कारण यामुळेही तुमच्या त्वचेमधील मोठ्या प्रमाणावर निर्माण होणारी सीबमची निर्मीती नियंत्रित राहिल.
कसा तयार कराल –
एका बाऊलमध्ये एक चमचा कॉफी, एक चमचा पाणी घ्या आणि ते मिश्रण एकजीव करा.
वीस मिनीटे चेहऱ्यावर हे मिश्रण ठेवा आणि चेहरा साध्या पाण्याने धुवा.
लिंबू आणि मध फेसवॉश
लिंबू आणि मध दोन्हींचे मिश्रण तुमच्या त्वचेमधील अतिरिक्त तेलाच्या निर्मितीला कमी करते. कारण लिंबामध्ये सायट्रिक अॅसिड असते जे त्वचेला स्वच्छ करते आणि मधातील पोषणामुळे त्वचा मऊ राहण्यास मदत होते.
कसा तयार कराल –
एका वाटीत दोन चमचे मध आणि एक चमचा लिंबाचा रस घ्या.
सर्व मिश्रण एकत्र करून कापसाने ते चेहऱ्यावर लावा.
पाच ते दहा मिनीटांनी चेहरा स्वच्छ धुवून टाका.
गुलाबपाणी फेसवॉश
गुलाबपाण्यामध्ये त्वचेला टोन करणारे गुणधर्म असतात. म्हणूनच तेलकट त्वचेसाठी गुलाबपाणी अतिशय उत्तम ठरते. पिंपल्स असलेल्या त्वचेवरील दाह कमी करण्यासाठी तुम्ही गुलाबपाण्याचा वापर करू शकता. ज्यामुळे तुमच्या त्वचेतील पीएच बॅलन्स कायम राहतो.
कसा तयार कराल –
एका कॉटन पॅडने संपूर्ण त्वचेला गुलाबपाणी लावून घ्या.
यानंतर तुम्हाला चेहरा स्वच्छ करण्याची गरज नाही.
गुलाबपाण्याने तुमचा चेहरा स्वच्छ होईल आणि त्वचा टवटवीत होईल.