home / सौंदर्य
केसांना फुटलेत फाटे, काय आहेत त्यावर घरगुती उपाय (Home Remedies For Split Ends In Marathi)

केसांना फुटलेत फाटे, काय आहेत त्यावर घरगुती उपाय (Home Remedies For Split Ends In Marathi)

केस जेव्हा खूप घनदाट आणि लांब असतात तेव्हा सर्वांची नजर असते ती तुमच्या केसांवर. ऑफिसमध्ये असो वा कोणत्याही मित्रमैत्रिणीच्या घरी असो अथवा घरी कोणत्याही कार्यक्रमात असो प्रत्येकाला तुमचे केस इतके  लांब आणि छान कसे हे जाणून घ्यायचं असतं. केसांना सुंदर ठेवण्यासाठी तुम्ही काय करता, कोणता उपाय करता हे सर्वच लोकांना जाणून घ्यायचं असतं. तर दुसरी बाजू असते ती म्हणजे केस अतिशय कोरडे होणं आणि केसांना फाटे फुटणं. अर्थात दोमुहे बाल हा शब्द आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. पण मराठीमध्ये केसांना फाटे फुटणं असंच म्हटलं जातं. केसांना फाटे फुटतात तेव्हा खूप वेगवेगळ्या उपायांचा विचार करण्यात येतो. बऱ्याच मुली काय अगदी मुलंही विविध उपाय केसांसाठी करत असतात. केसांना फाटे फुटणं ही अशी समस्या आहे जी आयुष्यात प्रत्येकाला झेलावी लागते. तुमचे केस कितीही सुंदर वा घनदाट असले तरी जर त्यामध्ये फाटे फुटले असतील तर ते अगदी दुरूनदेखील दिसण्यात येतात. तुम्हाला जर अशी समस्या असेल तर हा लेख आम्ही तुमच्यासाठीच लिहिला आहे. आम्ही तुम्हाला इथे केसांना फाटे का फुटतात याची कारणं तर देणार आहोतच पण त्याचबरोबर त्यावरील नक्की घरगुती उपचार कोणते आहेत याचीदेखील माहिती देणार आहोत. तसंच आयुर्वेदिक पद्धतीने केसांची काळजी घेता येते.

केसांना फाटे फुटणं म्हणजे काय

केसांना फाटे फुटण्याची कारणं

केसांना फाटे फुटणे उपाय

केसांच्या फाटे फुटण्याच्या समस्येवर घरगुती उपाय

वाचा – पांढरे केस काळे करण्यासाठी हे आहेत सोपे घरगुती उपाय

केसांना फाटे फुटणं म्हणजे काय (What is Split End Hair)

how-to-get-rid-of-split-ends-in-marathi
केसांना फाटे फुटणं अर्थात स्प्लिट एंड्स हेअर म्हणजे केस खालून दोन भागात विभागले जातात. अर्थाही ही एक नेहमीची समस्या आहे. केसांच्या बाह्य बाजूला ही समस्या नेहमीच उद्भवत असते. यामुळे केस अगदीच कोरडे आणि वाईट होतात. यामुळे केवळ केसांची वाढच थांबत नाही तर, तुमच्या केसांचं सौंदर्यही नाहीसं होतं. बऱ्याचदा केसांना फाटे फुटल्यानंतर केस कापण्याचा अथवा ट्रीम करण्याचा सल्ला देण्यात येतो. पण आपण स्वतः तर केस सतत कापू शकत नाही आणि पार्लरमध्ये सारखं सारखं जाणं हेदेखील परवडण्यासारखं नाही. कारण पार्लरमध्ये आता या सगळ्यावरच्या उपायासाठी बरेच पैसे आकारले जातात आणि प्रत्येकवेळी आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांना ते परवडण्यासारखं नाही. शिवाय केसांना फाटे फुटू नये म्हणून महाग शँपू आणि कंडिशनरदेखील पार्लरमध्ये देण्यात येत असतात. इतकं करण्यापेक्षा आपल्याला अनेक घरगुती उपायांनी ही समस्या सोडवता येऊ शकते. पण ही समस्या सोडवण्यापूर्वी नक्की यामागची कारणं काय आहेत हे जाणून घेणं आवश्यक आहे.

केसांना फाटे फुटण्याची कारणं (Causes of Split End Hair)

how-to-get-rid-of-split-ends-in-marathi
1. हिटिंग टूल्सचा प्रयोग (Using Heat-Styling Tool)

केस कुरळे असो वा फ्रीजी केस सरळ करण्यासाठी अर्थात स्ट्रेट करण्यासाठी आपण बऱ्याचदा हेअर स्ट्रेटनिंग टूलचा वापर करतो. पहिल्यांदा यासाठी बऱ्याचदा पार्लरमध्ये जावं लागायचं पण आता हेअर स्ट्रेटनर घरोघरी दिसू लागले असल्यामुळे बऱ्याचदा घरीच याचा प्रयोग केला जातो. पण याचा जास्त वापर केल्यामुळे केसांना फाटे फुटण्याची शक्यता निर्माण होते. हेदेखील केसांना फाटे फुटण्याचं महत्त्वाचं कारण झालं आहे. यामधून येणारी गर्मी अर्थात हिट केसांना अपायकारक आहे. त्यामुळे केस कोरडे आणि बेजान होतात आणि केसांना फाटे फुटतात. याशिवाय हेअर ड्रायरचा वापर जर तुम्ही सतत करत असाल तर, त्यामुळेदेखील तुमच्या केसांचं नुकसान होतं आणि केसांना फाटे फुटतात. त्यामुळे तज्ज्ञदेखील केसांवर हिटिंग टूल्सचा वापर न करण्याचा नेहमी सल्ला देत असतात.

वाचा – #DIY: झटपट केस वाढवायचेत तर जाणून घ्या घरगुती उपाय

2. केमिकल्सचा वापर (Use of Chemicals)

आजकाल केसांची स्टाईल करण्यासाठी वेगवेगळ्या केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ तुम्ही जर तुमचे केस कायमस्वरुपी कुरळे वा कायमस्वरूपी स्ट्रेट करून घेत असाल तर, तुमच्या केसांवर अनेक केमिकल्सचा वापर केला जातो. त्याशिवाय यामध्ये केसांना रंग देण्यासाठी असणाऱ्या उत्पादनांमध्येही बऱ्याच केमिकल्सचा वापर असतो. या सर्व केमिकल्समुळे केसांची हानी होते. यामुळे केसांना फाटे फुटण्याची समस्या निर्माण होते.

3. केसांना तेल न लावणं (Not Oiling Your Hair)

आपल्या शरीराच्या पोषणासाठी ज्याप्रमाणे पाणी आणि आहाराची गरज असते. त्याचप्रमाणे आपल्या केसांच्या पोषणासाठी तेलाची आवश्यकता असते. केसांसाठी तेल हे अतिशय आवश्यक असतं. वेळोवेळी जर केसांना तेल लावलं नाही तर त्यामुळे केस कोरडे पडतात आणि त्यामधील चमकदारपणा निघून जातो. यामुळेच केसांना फाटे फुटायलाही सुरुवात होते. आठवड्यातून किमान दोन वेळा केस धुण्यापूर्वी एक तास केसांना तेल लावून ठेवा आणि केसांना चांगलं पोषण द्या. तर तुमच्या केसांची समस्या नक्की दूर होईल.

4. जास्त वेळा केस धुणं (Washing Your Hair To Often)

बऱ्याच जणांना केस रोज धुण्याची सवय असते. केस लहान असतील तर हे नक्की चालू शकतं. पण जेव्हा तुमचे केस मोठे असतात तेव्हा रोज धुतल्याने त्याची चमक तर निघून जातेच. पण तुमच्या केसातील नैसर्गित तेलदेखील निघून जातं. रोज शँपूचा वापर करणं हे केसांसाठी अजिबात चांगलं नाही. त्यामुळे केसांना फाटे फुटून केस अधिक कोरडे होतात हे लक्षात घ्या.

5. शँपू न बदलणं (Not Switching Your Shampoo)

बरेच लोक एकच शँपू नेहमी वापरत असतात आणि तो त्यांचा फेव्हरेट असतो. पण तो शँपू न बदलणं चुकीचं आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, शँपू सतत बदलत राहायला हवा. असं न केल्यास, केसांना एकाच शँपूची सवय होते आणि त्यामुळे तुमच्या केसांवर शँपूचा परिणाम होणं बंद होतं. शँपू बदलत राहिल्यामुळे केसांसाठी योग्य काम करतो. शिवाय एकच शँपू वापरत राहिल्यास, तुमच्या केसांना फाटे फुटण्यासाठीदेखील कारणीभूत ठरतं.

केसांना फाटे फुटणे उपाय (Tips to Get Rid Of Slipt Ends )

home-remedies-for-split-ends-in-marathi
1. केस ओले असताना विंचरा 

केस जेव्हा कमी ओले असतील तेव्हाच विंचरा. पूर्ण सुकल्यानंतर केस विंचरू नका. बऱ्याचदा आपण केस ओले आहेत तर कसे विंचरायचे असं समजून तसेच ठेवतो आणि त्यामध्ये अधिक गुंता होतो. तर कधी आपण केस धुतल्या धुतल्या केस विंचरतो. पण त्यावेळी तुमच्या केसांच्या मुळाशी परिस्थिती अगदीच नाजूक असते. त्यामुळे केस तुटतात. त्यामुळे अशा चुका टाळून अधिक नुकसान न करता. केस थोडे ओले आणि थोडे सुकले असताना विंचरावेत. या गोष्टीची तुम्ही सवय करून घ्या. शिवाय फणीने खसाखसा केस न विंचरता व्यवस्थित हलक्या हाताने आणि ब्रशने तुम्ही तुमचे केस विंचरा.

वाचा – सुंदर केसांसाठी या 8 क्लुप्त्या वापरा आणि बदला तुमचं जग

2. लिव्ह इन कंडिशनरचा करा वापर (Use Leave-In Conditioner)

केसाला शँपू केल्यानंतर तुम्ही नक्कीच कंडिशनरचा वापर करत असाल. पण तुम्ही कधी तुमच्या केसांवर लिव्ह इन कंडिशनरचा वापर केला आहे का? याचा वापर करण्यापूर्वी नक्की याचा वापर कसा करायचा हे जाणून घेणं गरजेचं आहे. वास्तविक केस धुतल्यानंतर जेव्हा आपण टॉवेलने पुसतो त्यानंतर लिव्ह इन कंडिशनरचा वापर करायचा असतो. तसेच हे केसांच्या वाढीच्या दिशेने लावायचं असून मुळाशी लावायचं नसतं. यामुळे तुमच्या केसांचा गुंता सोडवण्यासाठी मदत होते आणि केस तुटतही नाहीत. लिव्ह इन कंडिशनर लावून केस धुवायचे नसतात. म्हणूनच याला लिव्ह इन अर्थात लावून तसंच ठेवायचं असल्यामुळे तसं नाव देण्यात आलं आहे. ज्यांना नियमित कंडिशनर वापरण्याची सवय नसते त्यांच्यासाठीदेखील हे उपयोगी आहे. हे लावून झाल्यावर केस ब्रशने नीट विंचरून घ्यावेत त्यामुळे केस चांगले आणि चमकदार राहण्यास मदत होते.

3. नियमितपणे केस ट्रीम करत राहा (Trim Your Hair)

केसांना कमीत कमी दर 6 महिन्यात ट्रीम करत राहायला हवं. असं न केल्यास, केसांच्या वाढीवर परिणाम होतो. तसेच केसांना फाटे अधिक स्वरुपात फुटायला लागतात. त्यामुळे नियमित आणि वेळेवर केसांना ट्रीम करत राहा.

केसांच्या फाटे फुटण्याच्या समस्येवर घरगुती उपाय (Home Remedies For Split End In Marathi)

home-remedies-for-split-ends-in-marathi
1. अंड्याचं मास्क (Egg Mask)

केसांसाठी अंडं हे अतिशय आवश्यक असून फॅटी अॅसिड आणि प्रोटीनचा एक महत्त्वपूर्ण स्रोत आहे. यामुळे केवळ केसांना पोषणच मिळत नाही तर केसांना मजबूती मिळते आणि केसांना फाटे फुटण्याच्या समस्येपासून अंडे संरक्षण करते. अंड्याचा मास्क बनविण्यासाठी एक अंड (बलकासह), एक चमचा दही, त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घ्या आणि मिक्स करून तुमच्या केसांना साधारण 45 मिनिट्स लावून ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. असं आठवड्यातून एकदा नक्की करा. तुम्हाला स्वतःला केसांमधला चांगला फरक जाणवेल.

2. गरम तेलाने मालिश (Massage with Hot Oil)

केसांना पोषण देण्यासाठी आणि मुलायम ठेवण्यासाठी गरम तेलाच्या मालिशव्यतिरिक्त दुसरा चांगला पर्याय नाही. यामुळे केवळ तुमचे केसांचे फाटे फुटण्यापासून सुटका मिळत नाही तर तुमच्या केसांचा मुलायमपणादेखील राखला जातो. यामुळे तुमचे केस अधिक चमकदर, स्वस्थ आणि सुंदर होतात. केसांवर करण्यात आलेल्या मालिशमुळे डोक्यातील रक्तप्रवाहदेखील चांगला राहतो. त्यामुळे केसांचा लवकर विकास होतो आणि केस वाढतात. नियमित स्वरुपात घरामध्ये तेल गरम करून व्यवस्थित मालिश करा आणि त्यानंतर तुमचे केस गरम टॉवेलमध्ये बांधून थोडा वेळ तसेच राहू द्या. थोडा वेळ जाऊ दिल्यानंतर केस शँपूने धुवा.

3. एकच केळं फायदेशीर (Banana)

केळं हे खाण्यासाठी पौष्टिक असतं हे तर सर्वांनाच माहीत आहे. पण केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी केळं फायदेशीर असतं हे खूप कमी लोकांना माहीत आहे. एक केळं मिक्सरमधून नीट वाटून घ्या आणि त्यामध्ये थोडं एरंडाचं तेल मिक्स करा. तसंच त्यामध्ये 2 मोठे चमचे दूध आणि थोडा मध घालून मिक्स करून घ्या. हा मास्क आठवड्यातून एकदा साधारण अर्धा तास लावून ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवून टाका. अतिशय वाईट दिसणाऱ्या आणि फाटे फुटलेल्या केसांवर हा अगदी रामबाण उपाय आहे.

4. मध आणि दह्याचं मिश्रण (Honey and Yogurt)

केसांना मुलायमपण आणण्यासाठी आणि केसांचं फाटे फुटणं कमी करण्यासाठी मध आणि दह्याचं मिश्रण केसांना लावावं. हे कॉम्बिनेशन तुम्ही आठवड्यातून दोन वेळा लावल्यानंतर तुमच्या केसांमधील बदल तुम्हाला स्वतःलाच जाणवेल. मध तुमच्या केसांना मुलायमपणा देतो तर दही केसांना मजबूती देत त्यामध्ये चमकदारपणा आणतं.

5. पपायाचं पॅक (Papaya Pack)

पपाया पोट स्वस्थ ठेवण्यास मदत करते हे तर तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, पपाया हे हेअर हॅक म्हणूनदेखील चांगलं काम करतं. प्रोटीन आणि अमिनो अॅसिडचं प्रमाण पपायामध्ये जास्त प्रमाणात असल्यामुळे, मुळापासून केस चांगलं राखण्यास मदत होते. यासाठी तुम्हाला पपई नीट वाटून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये अर्धा कप दही घेऊन नीट मिक्स करा. हे पॅक तुम्ही साधारण 45 मिनिट्स लावा. त्यानंतर केसांना नीट शँपूने धुवा. आठवड्यातून तुम्ही एकवेळ असं केल्यास, लवकरच तुम्हाला केसांच्या फाटे फुटण्याच्या समस्येपासून सुटका मिळेल.

6. मेथीमुळे केसांचं सौंदर्य वाढतं (Fenugreek)

मेथीमध्ये अधिक प्रमाणात प्रोटीन असतं. त्यामुळे केसांची वाढ जलद होते. मेथी केसगळती, केसांना काळं करण्यासाठी, कोंडा घालवण्यासाठी तसंच केसांचे फाटे कमी करण्यासाठी लाभदायक आहे. तसंच केसांना घनदाट आणि मजबूत करण्यासाठीदेखील मेथीचा उपयोग होतो. त्यासाठी तुम्हाला चार मोठे चमचे दह्यामध्ये मेथीचे दाणे अर्धा तास भिजवून ठेवा. त्यानंतर हे मिश्रण केसांना साधारण अर्धा तास लावून ठेवा. नंतर शँपूने केस धुवा. यामुळे केवळ केसाला फाटे फुटण्याची समस्येपासूनच सुटका होईल असं नाही तर, तुमच्या केसांचा कोरडेपणा दूर होऊन तुमचे केस मुलायम होतील.

7. कोरफड अर्थात अॅलोव्हेरा कायम (Aloe Vera)

घरगुती उपायांबद्दल आपण बोलत आहोत आणि कोरफडचं नाव त्यामध्ये नसावं असं होणं शक्यच नाही. कोरफडमध्ये अनेक पोषक तत्त्व असतात. ज्यामुळे केसांना फाटे फुटण्याचं प्रमाण कमी होतं. त्यासाठी तुम्हाला कोरफड जेलमध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि दोन चमचे एरंडेल तेल मिसळून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण घेऊन केसांना मसाज करा. मसाजनंततर साधारण अर्धा तास हे मिश्रण केसांवर तसंच राहू द्या. त्यानंतर केस शँपूने धुवून टाका.

वाचा- केस आणि चेहऱ्यावर कसं वापरावं ग्लिसरीन

केसांची काळजी एका नजरेत

1. केसांना टॉवेलने रगडून नका. त्यामुळे केस तुटतात आणि अतिशय रफ होतात.

2. अधिक गरम पाण्याने केस धुवू नका. थंडी असल्यास, कोमट पाण्याने केस धुवा.

3. शँपू करण्याआधी अर्धा तास केसांना तेलाने नक्की मालिश करा.

4. स्टायलिंग टूल्सचा जास्त वापर करू नका. त्यातून निघणाऱ्या हिटमुळे केसांना अपाय होतो.

5. केसांना सारखा शँपू नका करू आणि काही महिन्यानंतर शँपू बदलत राहा.

फोटो सौजन्य – Instagram

15 Feb 2019

Read More

read more articles like this
good points logo

good points text