Advertisement

लाईफस्टाईल

भूक वाढवण्यासाठी घरगुती उपाय, वापरा या सोपी युक्ती (Bhuk Vadhavnyache Upay In Marathi)

Trupti ParadkarTrupti Paradkar  |  Nov 23, 2020
Bhuk Vadhavnyache Upay In Marathi

भूक न लागणं ही एक गंभीर समस्या आहे.म्हणूनच जर काही दिवसांपासून तुम्हाला भूकच लागत नसेल अथवा काहीच खाण्याची इच्छा होत नसेल तर यामुळे तुमचे वजन कमी होऊ शकतं अथवा तुम्ही अशक्त होऊ शकता. कधी कधी पुरेसे पोषण न झाल्यामुळे चक्कर येणे, चिडचिड होणे आणि थकल्यासारखे वाटू लागते. भूक न लागण्यामागे अनेक कारणं असू शकतात. मात्र याचा संबध तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थाशी नक्कीच निगडीत असू शकतो. खाण्याची इच्छा जाणं ही साधी गोष्ट नक्कीच नाही. त्यामुळे याबाबत त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. त्यासोबत जीवनशैलीत काही बदल करूनही तुम्ही तुमची ही समस्या कमी करू शकता. यासाठीच जाणून घ्या भूक वाढवण्यासाठी घरगुती उपाय (Bhuk Vadhavnyache Upay In Marathi).

loss of appetite in marathi

ठराविक अंतराने थोडं थोडं खा (Eat Small Meals More Frequently)

जर तुम्हाला भूकच लागत नसेल तर नास्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण असं तीन वेळ पोटभर खाणं हे एक टास्कच आहे. ही समस्या सोडवण्यासाठी तुम्ही तुमचे तीनवेळचं जेवण पाच ते सहा वेळ थोड्या थोड्या प्रमाणात विभागून खाऊ शकता. जस जशी तुम्हाला भूक लागू लागेल तस तसा तुम्ही तुमचा आहार वाढवू शकता. म्हणजे जर तुम्हाला दुपारच्या जेवणात दोन पोळ्या खायच्या असतील तर थोड्या  थोड्या वेळाने एक एक पोळी खा. ज्यामुळे तुमच्या पोटात योग्य प्रमाणात आहार जाईल. 

जेवणाची वेळ ठरवा आणि ती पाळा (Schedule Meal Times)

भूक लागणं हा जेवण्याची वेळ झाल्याचा एक संकेत असतो. मात्र जर तुम्हाला भूकच नाही लागली तर तुमच्या शरीराला जेवायची वेळ झाल्याचा संकेतच मिळत नाही. मग असं असेल तर तुम्हाला जेवायची वेळ झाली हे कसं समजणार. यासाठीच दिवसभरात तुमच्या जेवणाच्या काही ठराविक वेळ ठरवा आणि त्या पाळण्याचा प्रयत्न करा. जेवणाची वेळ पाळण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये अलार्म लावू शकता. ज्यामुळे त्या ठराविक वेळी तुम्ही काहीतरी नक्कीच खाऊ शकाल. 

पौष्टिक आहार घ्या (Eat Nutrient-Rich Foods)

ज्यांना कडकडून भूक लागत नाही अशी माणसं अधुन मधुन चिप्स, पिझ्झा, केक, आईस्क्रिम असे पदार्थ खाता आणि उगाचच वजन वाढवून घेतात. मात्र अशा पदार्थांमुळे तुमच्या शरीराचे पोषण होत नाही. कारण या पदार्थांमध्ये कोणतेही पोषक घटक नसतात. त्याऐवजी असे पदार्थ खा ज्यामधून तुम्हाला जास्तीत जास्त पोषक घटक मिळतील. उदा. जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हा चॉकलेट, आईस्क्रिम ऐवजी एक कप दही, ताक, शेंगदाणे, चणे, फळं असे पदार्थ खा. वजन वाढवण्यासाठी कोणती फळं खावी हे अवश्य वाचा. 

भुक वाढवण्यासाठी उपाय

नास्टा करणं विसरू नका (Don’t Skip Breakfast)

घाई गडबडीत असल्यामुळे बऱ्याचदा अनेक लोक सकाळचा नास्टा करण्याचा कंटाळा करतात. मात्र ही अत्यंत चुकीची सवय आहे. जर तुम्हाला मुळातच कमी भूक लागत असेल तर ही सवय बदलणं फार गरजेचं आहे. एका संशोधनात असं आढळून आलं आहे की जे लोक सकाळचा नास्टा करण्याचा कंटाळा करतात त्या लोकांना सतत थकवा जाणवतो. याउलट सकाळी पोटभर पौष्टिक नास्टा केल्यामुळे दिवसभर उत्साही आणि फ्रेश वाटतं. नास्टा करणं टाळण्यामुळे हळू हळू तुमची भूक कमी होत जाते. म्हणूनच भूक वाढवण्यासाठी घरगुती उपाय (bhuk vadhavnyache upay) करत असाल तर आधी सकाळचा नास्टा करण्याची सवय स्वतःला लावा. 

स्वाद आणि चवीमध्ये बदल करा (Bring Out The Flavors & Change The Texture)

दररोज एक प्रकारचे अथवा सारखेच खाद्यपदार्थ खाण्यामुळेही खाण्याचा कंटाळा येतो आणि भूक मंदावत जाते. यासाठीच जर भूक वाढावी असं तुम्हाला वाटत असेल तर खाद्यपदार्थांमध्ये काही छोटे छोटे बदल करा. जसं की रोजची पोळी-भाजी अथवा वरण-भात तयार करताना त्यामध्ये निरनिराळे मसाले वापरून त्यांची चव बदला. स्वयंपाकाची पद्धत बदलण्यामुळेही तोच पदार्थ निराळ्या चवीचा तयार होऊ शकतो. भुक वाढवण्यासाठी दररोज काहीतरी नवीन पदार्थ तयार करा ज्यामुळे तुमची खाण्याची इच्छा वाढेल आणि तुम्हाला  त्या पदार्थाच्या सुंगध आणि स्वादामुळे कडकडून भूक लागेल.

जेवणात जास्तीत कॅलरिजयुक्त आहार घ्या (Add More Calories To Your Meals)

भूक वाढवण्याचा उपाय म्हणजे नेहमीच्या खाद्यपदार्थांमध्ये जास्तीत जास्त कॅलरिज असतील याची काळजी घेणं. कारण यामुळेही तुम्हाला खूप भूक लागेल आणि जेवण्याची इच्छा वाढेल. खाद्यपदार्थांमध्ये बटर, नट बटर, ऑलिव्ह ऑईल, दूध, दही असे पदार्थ वापरून तुम्ही त्या खाद्यपदार्थांमधील कॅलरिज वाढवू शकता. असं केल्यामुळे खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व घटकांमधील कॅलरिज तुमच्या शरीराला मिळू शकतात. जास्त कॅलरिज म्हणजे जास्त ऊर्जा शरीराला मिळेल आणि तुम्हाला फ्रेश वाटू लागेल. 

Calories to Your Meals

डायनिंग टेबल नीट सेट करा (Set A Nice Dining Table)

आपण जेवण हे सर्वात आधी डोळ्यांनी पाहतो, नाकाने सुंगध घेतो आणि मग त्याची चव घेतो. त्यामुळे जेवण हे नेहमी आकर्षक असायला हवं. खाद्य पदार्थ कितीही सुंदर असला तरी तो जर व्यवस्थित सर्व्ह केला नाही तर तो खाण्यात मजा येत नाही. त्यामुळे जर तुम्हाला भूक लागत नसेल तर तुम्ही हा भूक वाढवण्यासाठी घरगुती उपाय नक्कीच करू शकता. यासाठी तुमचं डायनिंग टेबल नीट सजवा, त्यावर कॅंडल लाईट, आकर्षक रंगसंगतीचे रुमाल आणि प्लेट्स ठेवा. ज्यामुळे तुम्ही सर्व्ह केलेला खाद्यपदार्थ खाण्याची तुम्हाला नक्कीच इच्छा होईल. भूक वाढवण्यासाठी जेवताना तुम्ही आजुबाजुला तयार केलेले वातावरण नक्कीच परिणामकारक ठरू शकते. तेव्हा हा उपाय तुमची भूक वाढवण्यासाठी फायदेशीर ठरेल.

जेवताना पाणी पिऊ नका (Don’t Drink Water Between Meals)

आहारशास्त्रानुसार जेवताना भरपुर पाणी मुळीच पिऊ नये. कारण यामुळे तुमची जेवणाची इच्छा कमी होते. याचं कारण जेवणापूर्वी तुमच्या पोटात पाचकरस निर्माण होत असतात ज्याला आपण जठराग्नि असं म्हणतो. जठराग्निमुळे तुम्हाला भुक लागते. मात्र जेव्हा तुम्ही जेवताना पाणी पिता तेव्हा हा जठराग्नि शमला जातो. सहाजिकच याचा परिणाम तुमच्या भुकेवर आणि पचनावर होतो. यासाठीच जेवताना  कधीच पाणी पिऊ नका. घास लागत असल्यास एखादा घोट अधुन मधुन पाणी पिण्यास काहीच हरकत नाही. मात्र ग्लास भर पाणी पिऊ नका. जेवणाआधी एक तास आधी पाणी प्या. यासोबतच हे ही जाणून घ्या जेवताना पाणी का पिऊ नये

Don't Drink Water Between Meals

फायबरयुक्त पदार्थ कमी आणि लिक्विड डाएट जास्त घ्या (Eat Less Fiber And Drink Liquid Meals)

जर तुम्हाला भूकच लागत नसेल तर आहारातून जास्त फायबर्स असलेले पदार्थ कमी करून जास्तीत जास्त लिक्विड डाएटवर भर द्या. कारण फायबर युक्त पदार्थ खाण्यामुळे तुमचे पोट बराच वेळ भरलेले राहते. जरी संतुलित आहारासाठी जास्तीत जास्त फायबरयुक्त पदार्थ खाणं गरजेचं असलं तरी त्यामुळे तुमची भूक नक्कीच मंदावू शकते. त्यामुळे असे पदार्थ न खाणंच तुमच्या फायद्याचं राहील. मात्र यावर उपाय म्हणून तुम्ही जास्तीत जास्त लिक्विड डाएट घेऊ शकता. ज्यामुळे तुमच्या शरीराचे योग्य पोषण होईल. उदा. जर तुम्हाला भूक लागत नसेल तर फळं खाण्याऐवजी फळांचा रस प्या.फळांचा रस, स्मुदी, ताक, दूध, नारळपाणी यामुळे तुमची भुक वाढण्यासाठी मदत होईल.

नियमित व्यायाम करा (Get Some Exercise)

भूक न लागण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे शारीरिक हालचाल कमी असणे हे आहे. जर तुम्ही एकाच जागेवर बसून अथवा बैठ्या स्वरूपातील कामे करत असाल तर तुम्हाला भुक कमी लागू शकते. कारण यामुळे तुमच्या शरीरातील कॅलरिज बर्न होत नाहीत. यावर उपाय करण्यासाठी तुम्हाला नियमित व्यायाम करण्याची सवय लावायला हवी. व्यायामामुळे तुमच्या शरीराची योग्य हालचाल होईल आणि तुम्हाला कडकडून भूक लागेल. निरोगी राहण्यासाठी दिवसभरात कमीत कमी अर्धा तास व्यायाम करणं गरजेचं आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला वजन वाढवण्यासाठी कोणता व्यायाम करावा हे माहीत असायला हवं.

Get Some Exercise

भूक वाढवण्यासाठी उपायबाबत काही निवडक प्रश्न – FAQ’s

1. भूक न लागण्यामागची कारणे कोणती ?

भूक न लागण्यामागे अनेक कारणे असू शकतात. जसं की, चुकीची जीवनशैली, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, पचनसंस्थेचे विकार, अस्थमा, मधुमेह, किडनीच्या समस्या, अशक्तपणा अशा कोणत्याही कारणामुळे तुमची भुक मंदावू शकते.

2. जर भूक लागत नसेल तर काय खावं ?

जर तुम्हाला चांगली भूक लागत नसेल तर तुम्ही आहाराबाबत सावध असायला हवं. कारण जर तुम्ही अशा परिस्थितीत पौष्टिक पदार्थ खाल्ले नाही तर तुमचे कुपोषण होऊ शकते. यासाठीच भुक लागत नसलेल्या लोकांनी चिप्स, चॉकलेट ऐवजी फक्त पौष्टिक पदार्थ खाण्यावरच लक्ष केंद्रित करावे.

3, जर दिवसभर काहीच खाल्लं नाही तर शरीरावर काय परिणाम होतो ?

शारीरिक कार्य सुरळीत चालण्यासाठी शरीराला पुरेशा आणि पोषक आहाराची गरज असते. मात्र जर भूक कमी लागत आहे या कारणासाठी तुम्ही दिवसभर काहीच खाल्लं नाही तर याचा तुमच्या शरीरावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. शरीराला लागणारे घटक न मिळाल्यामुळे तुम्हाला अशक्तपणा येऊन चक्कर येऊ शकते.