उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे त्यामुळे वातावरणात उन्हाची काहिली जाणवू लागलीय. अशा वेळी थंडगार पेय पिण्याची सतत इच्छा होते. कोल्ड्रिंकपेक्षा लस्सी, ताक, पन्हं, कोकम सरबत अशी नैसर्गिक पेय पिण्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. जर या उन्हाळ्यात तुम्हाला थंडगार लस्सी पिण्याची इच्छा झाली असेल तर त्यासाठी लस्सीवाला अथवा हॉटेलमध्ये जाण्याची मुळीच गरज नाही. अगदी घरच्या घरी तुम्ही हॉटेलसारखी घट्ट आणि थंडगार लस्सी बनवू शकता.
लस्सी, ताक आणि दही आरोग्यासाठी का आहे उपयुक्त
उन्हाळ्यात प्रत्येकाच्या घरी दही, ताक आणि लस्सीसारखे पदार्थ असायलाच हवे. भारतीय खाद्यसंस्कृतीत दही, ताक, लोणी, तूपासारखे डेअरी प्रॉडक्ट बनवण्याच्या अनेक सोप्या टेकनिक सांगण्यात आलेल्या आहेत. दही खाणं आरोग्यासाठी हितकारक असल्यामुळे ते तुमच्या आहारात नियमित असायालाच हवं. दह्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते. दही तुम्ही नुसतंच खाऊ शकता किंवा त्यापासून ताक अथवा लस्सी बनवू शकता. जेवणासोबत ताक पिण्यामुळे अन्न लवकर पचते. मात्र जर तुम्हाला ताक आवडत नसेल अथवा ताक पिण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही नियमित लस्सीदेखील ट्राय करू शकता. बाजारात लस्सीचे अनेक प्रकार मिळतात. मात्र घरच्या घरी लस्सी बनवून पिण्याची मजाच काही निराळी आहे. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत घट्ट आणि थंडगार लस्सी बनवण्याची एक सोपी पद्धत शेअर करत आहोत.
लस्सी बनवण्याची सोपी पद्धत –
लस्सी बनवण्यासाठी तुमच्या घरी ताजं दही असायला हवं. यासाठी तुम्ही रात्री दह्याला विरझण लावून ताजं दही घरीच तयार करू शकता.
लस्सीसाठी लागणारे साहित्य –
ताजे दही
साखर
बर्फ आणि थंड पाणी
लस्सी बनवण्याची कृती –
सर्वात आधी तुम्हाला जितक्या लोकांसाठी लस्सी बनवायची आहे त्यानुसार दही एका भांड्यात काढून घ्या. साधारणपणे एक दोन दह्यामध्ये एक मोठा ग्लास लस्सी बनवता येते. या अंदाजानुसार तुम्ही दह्याचे प्रमाण ठरवा. अर्धा किलो दह्यामध्ये दोन ते तीन लोकांसाठी लस्सी तुम्ही बनवू शकता. लस्सी एका भांड्यात घेऊन ते बिटरने चांगले फेटून घ्या. जर तुमच्याकडे दही घुसण्याची रवी असेल तर तुम्ही हाताने घुसळूनही लस्सी तयार करू शकता. मिक्सरमध्येही लस्सी बनवता येते. पण मिक्सरपेक्षा हाताने घुसळलेल्या लस्सी अथवा ताकाला जास्त चांगली चव येते. घुसळल्यानंतर त्यात थंड पाणी, साखर आणि बर्फ टाका. एक ग्लास लस्सीसाठी तुम्ही साधारणपणे दोन मोठे चमचे साखर वापरू शकता. मात्र तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता. पुन्हा एकदा सर्व साहित्य चांगले घुसळून घ्या. जर मिक्सरमध्ये लस्सी करणार असाल तर जास्त वेळ ते त्यात घुसळू नका. नाहीतर दह्याचे लोणी निघेल आणि लस्सीची चव कमी होईल. तयार लस्सी ग्लासात ओता आणि वरून दही घुसळल्यानंतर येणारी मलई आणि बर्फ टाका. आवडत असल्यास वरून थोडं रोझ सिरपही तुम्ही लस्सीत टाकू शकता. खास प्रसंगी ड्रायफ्रूटने सजवून लस्सी सर्व्ह करा.
लस्सी पिण्याचे फायदे
ताकाप्रमाणेच लस्सी पिण्याचेदेखील शरीरावर अनेक चांगले फायदे होतात. लस्सी दह्यापासून तयार केली जात असल्यामुळे दह्यातील कॅल्शिअम त्यात भरपूर असते. हाडांची वाढ आणि स्नायूंच्या बळकटीसाठी लस्सी पिणे फायद्याचे ठरते. लस्सीमुळे शरीरातील उष्णता कमी होते. शरीर हायड्रेट राहिल्यामुळे शरीराचे कार्य सुरळीत चालू राहते. पचनसंस्थेवर कमी ताण आल्यामुळे दिवसभर पोट हलके वाटते. पचनाच्या समस्या यामुळे कमी होतात. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी नियमित लस्सी पिणे फायद्याचे ठरते. लस्सी प्रोबायोटिक असल्यामुळे त्यामुळे आतड्यांचे रोगापासून संरक्षण होते.
फोटोसौजन्य –
अधिक वाचा –
मँगो ड्रींक्सच्या या सोप्या रेसिपीज करा आणि मिळवा वाहवा
घट्ट दही तयार करण्याची घरगुती पद्धत ( How To Make Curd At Home In Marathi)