स्वयंपाकघराचा ओटा, कपाटे, टाईल्स, एग्सॉस्ट फॅन, शेगडी, हॉब, चिमणी, भांडी तेलाच्या डागांमुळे चिकट होतात. जर नियमित स्वच्छता राखली नाही तर तुमच्या किचनला लुक यामुळे खराब होतो. शिवाय जिथे स्वयंपाक केला जातो ते ठिकाण नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न असावे. कारण वातावरणाचाही तुमच्या अन्नावर परिणाम होत असतो. आरोग्यासाठी आणि हायजीनसाठी किचनची वेळोवेळी स्वच्छता राखायला हवी. मात्र भारतीय स्वयंपाकात सतत फोडणी देणे, पदार्थ तळणे, परतणे, भाजणे असे प्रकार केले जातात. ज्यामुळे किचन खराब होणं स्वाभाविक आहे. यासाठीच आम्ही तुम्हाला अशा काही सोप्या टिप्स सांगत आहोत. ज्यामुळे तुमचे तेलकट, चिकट झालेले किचन झटपट स्वच्छ होईल. स्वयंपाकानंतर किचन स्वच्छ करायला नाही लागणार वेळ, फॉलो करा या टिप्स
लिंबू आणि खाण्याचा सोडा
लिंबू आणि खाण्याचा सोडा स्वयंपाक घरात मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे तुम्ही या साधनांचा वापर करून कधीही तुमचे स्वयंपाकघर स्वच्छ करू शकता. यासाठी पाण्यात चमचाभर सोडा मिसळा आणि अर्ध लिंबू पिळा. हे मिश्रण चिकट डागांवर लावा आणि कापडाने पुसून काढा. जर एखादा डाग खूपच चिकट असेल तर तुम्ही थेट लिंबावर सोडा लावून त्यानेच तो डाग रगडून काढू शकता.
डिश वॉशिंग लिक्विड
किचन स्वच्छ करण्याचा सोपा मार्ग म्हणजे भांडी घासण्याचे लिक्विड वापरणे. घरात भांड्यासाठी साबण आणि तेलकट भांड्यांसाठी खास लिक्विड सोप असतो. हे लिक्विड थोड्या पाण्यात मिसळून तुम्ही किचनच्या टाईल्स, किचनमधील कपाटे स्वच्छ करू शकता. कारण या मिश्रणाने तुमचे काम सहज आणि झटपट होऊ शकते.
मीठ
मीठ ही स्वयंपाकघरातील अशी एक वस्तू आहे ज्यामुळे तुम्ही किचनधील कोणताही चिकट डाग कमी करू शकता. मीठाच्या पाण्यामुळे स्वयंपाक घर स्वच्छ आणि निर्जंतूक तर होतेच. शिवाय त्यामुळे स्वयंपाक घरात माशा, कीटक, डासदेखील येत नाहीत. जर तुमच्याकडे जाडे मीठ असेल तर तुम्ही ते किचनची खिडकी, सिंकचे आऊटलेट या ठिकाणी ठेवू शकता. स्वयंपाक घरातील लादी आणि टाईल्स स्वच्छ करण्यासाठी तुम्ही मीठाचे पाणी नक्कीच वापरू शकता.
पावसाळ्यात स्वयंपाक घर असं ठेवा स्वच्छ आणि सुरक्षित
व्हिनेगर
स्वयंपाक घराची स्वच्छता राखण्यासाठी व्हिनेगर वापरणं हा अतिशय उत्तम उपाय आहे. कारण व्हिनेगरमध्ये क्लिंझिंग करणारे घटक असतात. ज्यामुळे तुमचे किचनमधील हट्टी डाग क्षणात कमी होतात. किचनचा हॉब, जाळ्या, चिमणी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगर वापरू शकता. शिवाय व्हिनेगर स्वयंपाकासाठी लागत असल्यामुळे स्वयंपाक घरात व्हिनेगर नेहमी असतेच. त्यामुळे थोड्याशा पाण्यात ते मिक्स करा आणि डागावर लावून कापडाने पुसून टाका. तुम्ही यासाठी स्पंजदेखील वापरू शकता.