पावसाळा सुरु होण्याआधी खूप जणांकडे वेगवेगळ्या गोष्टींची तरतूद करुन ठेवली जाते. साठवणीचे, सुकलेले पदार्थ, कांदे, बटाटे, लसूण, सुकट अशा काही गोष्टी घरात जास्तीच्या आणून ठेवल्या जातात. विशेषत: कांदे या दिवसात अधिक आणले जातात. घरी स्वयंपाकासाठी सुका कांदा लागतो. पावसाआधी बाजारात येणाऱ्या सुका कांदा घरी आणून तो वर्षभरासाठी ठेवण्याची पद्धत खूप जणांकडे आहे. लसूणच्या बाबतीत ही गोष्ट चालू शकते. पण बटाटे काही खूप जास्त आणता येत नाही. जर तुम्ही कांदे, बटाटे किंवा लसूण स्टोअर करुन ठेवत नसाल तर तुम्हाला या सोप्या पद्धतीने कांदे, बटाटे आणि लसूण स्टोअर करता येतील.
Kitchentips : जाणून घ्या बटाटे उकडण्याची योग्य पद्धत
कांदे
कांदे हा जेवणातील असा घटक पदार्थ आहे. ज्याशिवाय जेवण अजिबात रुचकर लागणार नाही. पण हाच कांदा जेव्हा भाव वाढतो तेव्हा चांगलाच रडवतो. असा हा कांदा तुम्ही घरी आणून ठेवला असेल तर तो स्टोअर करण्याआधी काही गोष्टी कराव्या लागतात त्या जाणून घेऊया
- कांदा घेताना तो नेहमी सुका असायला हवा. कांदा सुकलेला असेल तरच तो जास्त काळ टिकायला मदत होते. त्यामुळे कांदा हा सुकलेला निवडा.
- स्वस्तात मिळालेला कांदा जास्त आणला असेल तर तो घरी आल्यानंतर पोत्यातून बाहेर काढा. कांदा पोत्यातून बाहेर काढल्यानंतर त्यातील ओला किंवा खराब झालेला कांदा बाहेर काढून आधीच टाका. नाहीतर असा कांदा इतर कांद्यांना खराब करु शकतो. कांदे हवा जातील अशा ठिकाणी ठेवा म्हणजे ते खराब होणार नाहीत.
- जर तुम्ही जागेअभावी जास्तीचे कांदे खरेदी करत नसाल तर तुम्ही कांदे ज्यावेळी घ्याल त्यावेळी खूप जास्त घेऊ नका. घरी राहतील इतकेच कांदे घ्या. ते कांदे स्वच्छ करा आणि लवकरात लवकर वापरा. किचनमध्ये अडगळीच्या ठिकाणी कांदा मुळीच ठेवू नका.
कांदा आणि बटाट्याला मोड येऊ नये यासाठी फॉलो करा या टिप्स
बटाटे
घरात काहीही नसले की बटाटा नावाच्या या कंदमुळाचा उपयोग केला जातो. बटाटा हा असा घटक आहे जो कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्यास मदत करते. पण असा बटाटा नेमका कसा स्टोअर करावा जाणून घेऊया.
- खूप मोड आलेले बटाटे निवडू नका. कारण असे बटाटे हे ओले असतात. यांना जास्त काळासाठी स्टोअर करता येत नाही. असे बटाटे नरम होतात.
- बटाटा हा नेहमी स्वच्छ आणि मोठा असलेला असा घ्या. असा बटाटा जास्त काळासाठी टिकतो.
- बटाटा स्टोअर करण्याआधी त्यावर लागलेली माती अजिबात काढून टाकू नका. कारण पाण्याने बटाटा धुतल्यामुळे तो खराब होण्याची शक्यता असते.
लसूण
कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्याचे काम लसूण करते. एखाद्या पदार्थाला लसणीची फोडणी दिली की, तो पदार्थ अधिक चविष्ट आणि चांगला लागतो. पण लसूण खूप वेळा पोली, आतून खराब होते. त्याला किड लागते. लसूण जास्ती काळ टिकवण्यासाठी काय करावे जाणून घेऊया
- लसूण घेताना कधीही ओली घेऊ नका. कारण ओली लसूण कितीही जपली तरी पावसाच्या दिवसात त्याला आतून बुरशी येते.
- लसूण आणल्यानंतर ती तिच्या पाकळ्या वेगळ्या करुन तेलात तळून ठेवल्या तरी देखील चालू शकतात. त्यामुळे त्या जास्त काळ टिकतात.
- लसूण आणल्यानंतर घरीच त्याला वाळू घाला. म्हणजे त्यांच्यातला ओलावा निघून जातो.
आता या काही गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही कांदे, बटाटे, लसूण स्टोअर करा.