आषाढ महिन्यात येणाऱ्या गुरूपौर्णिमेचं विशेष महत्त्व आणि माहिती आहे. आपल्याकडे जसं शिक्षक दिनासाठी खास शुभेच्छा दिल्या जातात. तसंच या दिवशी आवर्जून गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा ही दिल्या जातात. धर्म ग्रंथांनुसार, या दिवशी वेदव्यास ऋषींचा जन्म झाला होता. त्यांनी महाभारतासारख्या अनेक ग्रंथांची रचना केली. कौरव आणि पांडव त्यांना गुरू मानत असत. यामुळे आषाढ मासात येणाऱ्या पौर्णिमेला गुरूपौर्णिमा व व्यास पौर्णिमा असं म्हणतात. या दिवशी गुरूंची पूजा करून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा प्रचलित आहे. हिंदू धर्मात गुरूंना देवापेक्षा श्रेष्ठ मानण्यात आलं आहे. कारणं गुरू आपल्या शिष्यांना सदमार्गावर चालण्याची प्रेरणा देतात. तसंच आयुष्यातील कठीण क्षणांना सामोरं जाण्यासाठी तयार करतात. म्हणूनच म्हटलं गेलं आहे की,
गुरुब्र्रह्मा गुरुर्विष्णु र्गुरुर्देवो महेश्वर:।
गुरु: साक्षात्परंब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम:।।
अर्थात गुरूच ब्रम्हा आहे, गुरूच विष्णू आहे आणि गुरू हाच भगवान शंकर आहे. गुरू हे साक्षात परब्रम्ह आहे. अशा देवासमान गुरूंना मी प्रणाम करतो.
गुरूपौर्णिमा अर्थात सद्गुरू पूजनाचं पर्व असतं. गुरूंची पूजा, गुरूंचा आदर करणं ही कोणा व्यक्तीची पूजा नाही. गुरूंच्या देहातील जो विदेही आत्मा आहे, परब्रम्ह परमात्मा आहे त्याचा आदर आहे., ज्ञानाचा आदर आहे, ज्ञानाचं पूजन आहे, ब्रम्हज्ञानाचं पूजन आहे.
गुरू शब्दांमध्ये गुरूचा महिमा वर्णिला आहे. गु चा अर्थ आहे अंधकार आणि रू चा अर्थ आहे प्रकाश. त्यामुळे गुरूचा अर्थ आहे अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा म्हणजे आपल्या शिष्याला आयुष्यात यश मिळावं म्हणून उचित मार्गदर्शन करणारा गुरू होय. धर्मग्रंथांनुसार, या दिवशी जी व्यक्ती गुरूचा आशिर्वाद प्राप्त करते. तिचं आयुष्य सफल होतं. महर्षि वेदव्यास यांनी भविष्योत्तर पुराणात गुरूपौर्णिमेबाबत लिहीलं आहे –
मम जन्मदिने सम्यक् पूजनीय: प्रयत्नत:।
आषाढ़ शुक्ल पक्षेतु पूर्णिमायां गुरौ तथा।।
पूजनीयो विशेषण वस्त्राभरणधेनुभि:।
फलपुष्पादिना सम्यगरत्नकांचन भोजनै:।।
दक्षिणाभि: सुपुष्टाभिर्मत्स्वरूप प्रपूजयेत।
एवं कृते त्वया विप्र मत्स्वरूपस्य दर्शनम्।।
अर्थात – आषाढ शुक्ल पौर्णिमेला माझा जन्म दिवस आहे. ज्याला गुरूपौर्णिमा म्हणतात. या दिवशी पूर्ण श्रद्धने गुरूंना कपडे, दागिने, गाय, फळ, फूल, रत्न, धन इत्यादि गोष्टी समर्पित करून त्यांचं पूजन करावं. असं केल्याने गुरूदेवांमध्ये माझ्या स्वरूपाचं दर्शन होईल.
आपला पहिला गुरू ही आपली आई असते. जी आपल्याला हसणं, बोलणं शिकवते. जिचा हात धरून आपण चालायला शिकतो. आपली आपल्याला नेहमी चांगले संस्कार शिकवते आणि मोठ्यांचा आदर व छोट्यांवर प्रेम करण्याची शिकवण देते. चांगल्या वाईटाची ओळख करून देते.
जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा शाळेत जातो. जिथे गुरूजी म्हणजेच आपले शिक्षक आपल्याला शिकवतात. गुरू हा असा सागर आहे ज्यातून कितीही पाणी काढलं तरी ते कमी होणार नाही. ज्ञानाचं भंडार म्हणजे गुरू. म्हणूनच म्हणतात गुरूशिवाय ज्ञान नाही. हे निश्चित आहे की, ज्ञानाशिवाय आपलं आयुष्य अपूर्ण आहे. हेही खरं आहे की, केवळ गुरूंकडून आपल्याला ते मिळतं. ज्ञानाशिवाय आपण यशस्वी होऊ शकत नाही. तुम्ही कोणत्याही यशस्वी माणसाला विचारून पाहा. त्यांचा कोणी ना कोणी आदर्श हा नक्की असतो.
इतिहास साक्षीदार आहे की, महाभारतात विजयी होणाऱ्या पांडवाचे गुरू द्रोणाचार्य यांनी आपल्या शिक्षेने त्यांना अस्त्रशस्त्रांमध्ये निपुण बनवले होते. गुरू द्रोणाचार्यांनी अर्जुनाला धनुर्विद्येत कुशल बनवलं. गुरू चाणक्यानी आपली विद्या देऊन चंद्रगुप्त मौर्याला मगधचा सम्राट बनवलं आणि अशी अनेक उदाहरण तुम्ही कुठे ना कुठे वाचली असतीलच आणि पाहिलीही असतील.
वाचा – गुरुपृष्यामृत योग म्हणजे काय ?
गुरूंच्या समोर कधीही ही काम करू नये
शिष्याने गुरूंच्या समान आसनावर बसू नये. म्हणजेच गुरू जर आसनावर बसले असतील तर शिष्याने खाली बसावे. जर गुरू जमीनीवर बसले असतील तर शिष्यानेही जमीनीवर बसावं.
– गुरूंच्या समोर भिंत किंवा इतर कोणत्याही वस्तूला टेकून बसू नये. त्यांच्यासमोर पाय पसरून बसू नये.
– गुरूंच्या समोर कोणत्याही अपशब्दांचा वापर करू नये.
– जेव्हा गुरूंची भेट घ्यायला जाल तेव्हा रिकाम्या हाताने जाऊ नये, काही ना काही भेट अवश्य घेऊन जावी.
– असा आहे गुरूंचा आणि गुरूपौर्णिमेचा महिमा, जो नक्की अनुभवण्यासारखा आहे.