हिंदू धर्मात हनुमान जयंतीला अनन्यसाधारण असे महत्व आहे. ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. 2022 मध्ये हनुमान जयंती ही शनिवार, 16 एप्रिल रोजी आलेली आहे. लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा सगळ्यांना आपले सण साजरे करायला मिळणार आहेत. या निमित्ताने एकमेंकांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या जातात. गेल्या काही कालावधीत आपल्या अनेकांना हिंदूच्या लहान मोठ्या सणांचा विसर पडला असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. यामध्ये आपण हनुमान जयंती याविषयी सर्वकाही जाणून घेणार आहोत. हनुमान जयंती का साजरी केली जाते. त्याचा पूजाविधी आणि बरेच काही यामध्ये समाविष्ट असणार आहे. रामनवमीनंतर येणाऱ्या हनुमान जयंतीविषयी जाणून घेऊया महत्वाची माहिती.
हनुमान जयंती महत्व
हिंदू देवतांमध्ये भगवान हनुमानाला अनन्यसाधारण असे महत्व आहे. जन्मल्यानंतर आकाशात असलेल्या सूर्याला चेंडू समजून त्याच्याकडे झेपावणारा मारुती ते रामभक्त असलेला हनुमान कोणतेही भय न बाळगता माता सीतेला आणण्यासाठी लंकेत जाणारा हनुमान या रंजक गोष्टी आणि त्याच्या साहसकथा आपण सगळेच जाणतो. या लाडक्या हनुमानाचा जन्म ज्या दिवशी झाला तो दिवस हनुमान जयंती म्हणून साजरा केला जातो. चैत्र महिन्यातील पौर्णिमेचा दिवस हा हनुमानाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो.
पौराणिक दाखल्यानुसार हनुमानाच्या जन्माची कथा ही देखील थोडी वेगळी आहे. असे म्हणतात की, अयोध्याचे राजा दशरथ यांनी पूत्र प्राप्तीसाठी एक यज्ञ केले होते. त्यांनी प्रसाद स्वरुप बनवलेली खीर ही आपल्या तीन पत्नींसाठी दिली होती. पण त्यातील खीर ही कावळ्याने उचलून नेली आणि माता अंजनी यांच्या समोर आणून टाकली. शिवाचा प्रसाद समजून त्यांनी ते ग्रहण केले त्यानंतर अंजनी मातेला पूत्र झाला त्याला पुढे जाऊन हनुमान, केसरीनंदन, रामभक्त, बजरंगबली, कपिश्रेष्ठ अशी ओळख मिळाली.
असा करा पूजाविधी
हनुमान जंयतीच्या निमित्ताने खूप ठिकाणी पालखी उत्सव केला जाते. इतकेच नाही तर अनेक गावांमध्ये या दिवशी पूजा अर्चा केली जाते. प्रसाद स्वरुप जेवण देखील केले जाते. तुम्हाला अगदी घरगुती स्वरुपात हनुमानाची पूजा करायची असेल तर तुम्ही सकाळी उठून हनुमानाच्या देवळात जाऊन त्याला शेंदूर वाहून मनोभावे पूजा करावी. त्याला मालपुआ, लाडू, चुरमा, केळी, पेरु असा नैवेद्य दावा. त्याच्यासमोर बसून हनुमानचालिसाचे पठण करावे. असे म्हणतात कोणत्याही भयापासून मुक्ती मिळवण्यासाठी हनुमानचालिसा ही फायद्याची असते.
शनिदोषापासून सुटका
शनिच्या प्रकोपासाून अनेक जण भयभीत असतात त्याची अपकृपा आपल्यावर होऊ नये यासाठी काहीही करायला सगळे तयार असतात. कारण शनीची बाधा झाल्यावर अनेकांना वाईट अनुभव आलेले आहेत. त्यामुळे ज्यांना शनीच्या बाधेची भीती असेल अशांनी हनुमानाची पूजा या दिवशी मनोभावे करावी. हनुमानचालिसेसोबत रामरक्षा पठण करावे. मारुतीला आवडणारे शेंदूर त्याला अर्पण करावे. इतकेच नाही तर त्याला आवडणाऱ्या वडाच्या पानांचा हार देखील द्यावा. महिलांनी हनुमानाची पूजा करताना विशेष काळजी घ्यावी. हनुमान हे ब्रम्हचारी होते त्यांना स्त्रियांचा स्पर्श हा व्यर्ज होता. त्यामुळे पूजा करताना महिलांनी त्यांच्या मूर्तीला हात लावू नये असे सांगितले जाते. इतकेच नाही तर सूतक ज्यांच्या घरात लागले असेल अशांनीही हनुमानाची पूजा करणे टाळावे. हनुमानाच्या पायांवर चरणामृत चुकूनही करु नये कारण ते त्यांना अमान्य असते.
अशा काही गोष्टी लक्षात घेत यंदा हनुमान जयंती साजरी करावी. 2022 च्या या वर्षात शनि-रविचा अनोखा मेळ असल्यामुळे शनीची कृपादृष्टी देखील आपल्यावर राहणार आहे. बोला जय हनुमान!