सध्या सेलिब्रिटींच्या लग्नाचा सीझन आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अनेक सेलिब्रिटी अगदी गाजावाजा करत लग्न करतात तर काही जण अचानक सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना सुखद धक्का देतात. ‘इंडियन आयडल’मधून घराघरात पोहचलेली गायिका सायली कांबळे (Sayli Kamble) देखील आता लग्नबंधनात अडकली आहे. काही महिन्यांपूर्वीच सायलीने आपला जीवलग मित्र धवल पाटील याच्याशी साखरपुडा केला होता आणि त्याचे रूपांतर लग्नात झाल्याचे सायलीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केले आहे. ‘सौ. धवल पाटील’ अशी कॅप्शन देत सायलीने आपला आनंद व्यक्त केला आहे. आपल्या नवरा आणि परिवारासह सायलीने अनेक फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे.
जवळच्या नातेवाईकांमध्ये केले लग्न
सायली कांबळेने आपल्या जवळच्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत धवल पाटील याच्यासह लग्नगाठ बांधली आहे. सायलीने लग्न झाल्यानंतर आपल्या नवऱ्यासह फोटो शेअर करत आता आपण सौ. धवल पाटील झाल्याचे आनंदाने व्यक्त केले आहे. तर गायिका असल्याने तिच्या हॅशटॅगनेदेखील लक्ष वेधून घेतले आहे. #DHAniSA अर्थात धवल आणि सायली च्या नावाचे पहिले अक्षर आणि सप्तसुरांमधील सुरांचे हॅशटॅग वाचायलाही अत्यंत सुंदर वाटत आहे. नव्या नवरीने जांभळ्या साडीमध्ये अत्यंत सुंदर फोटो शेअर केले आहेत. अगदी मराठमोळी नववधू सायली दिसत असून धवलसह ती खूपच आनंदी दिसत आहे. आपल्या चाहत्यांना सायलीने सुखद धक्का दिला असून इंडस्ट्रीतील अनेक तिच्या मित्रमैत्रिणींनीही तिला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर तिला इंडस्ट्रीमध्ये ब्रेक देणाऱ्या संगीतकार अवधूत गुप्तेनेदेखील तिचे अभिनंदन केले आहे. अचानक सायलीच्या लग्नाचे फोटो समोर आल्याने सर्वांनाच सुखद धक्का मिळाला आहे. आपल्या लग्नाच्या पत्रिकेचे, मेहंदीचे आणि हळदीचे असे सर्व फोटो सायलीने शेअर केले आहेत. हळदीच्या दिवशी तर अक्षरशः होळी खेळल्याप्रमाणे सायली आणि धवल हळदीमध्ये न्हाऊन निघाल्याचे दिसून येत आहे. तर 24 एप्रिल रोजी दोघेही आनंदाने लग्नबंधनात अडकले असून दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद लपत नाहीये.
सायली लवकरच दिसणार ज्युनियर सुपर सिंगरमध्ये
सायलीने इंडियन आयडलमध्ये पहिल्या पाच फायनालिस्टमध्ये बाजी मारली होती. तर लवकरच तिने मराठी गाणेही येत आहे. याशिवाय ती आता लवकरच ज्युनियर सुपर सिंगरमध्ये दिसून येणार आहे. या ज्युनियर मुलांची मेंटर (मार्गदर्शक) म्हणून सायली दिसणार आहे. तर सध्या सायली या नव्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय सायलीने अधिकाधिक गाणी म्हणावीत असेही तिच्या चाहत्यांना वाटत आहे. सायलीने रियालिटी शो मध्ये सहभागी होऊन आपला असा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. तर आता पुढे सायलीने अधिक प्रोजेक्टमध्ये काम करावे असेही तिच्या चाहत्यावर्गाला वाटत आहे. तर सायलीचा मधुर आवाज आता पुन्हा एकदा या नव्या रियालिटी शो मधून ऐकायला मिळावा अशीही चाहत्यांना अपेक्षा आहे आणि आता या नव्या भूमिकेत सायली काय करणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सायली आणि धवलला त्यांच्या पुढच्या आयुष्याच्या नव्या वाटचालीसाठी POPxo मराठीकडून मनःपूर्वक शुभेच्छा!
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक