उन्हाळा चांगलाच सुरु झाला आहे आणि आता घराघरांत उन्हाळ्यापासून आराम मिळावा म्हणून कुलर, एसी लावले जात आहेत. हल्ली दिवसा तर चांगलेच गरम होऊ लागले आहे आणि रात्री सुद्धा लवकर उकाडा कमी होत नाही. त्यामुळे झोपताना कुलर किंवा एसीची मदत घ्यावीच लागते. आपल्यापैकी सर्वांनाच ठाऊक आहे की आपल्या आजूबाजूला भरपूर झाडे असतील तर तिथे तापमान जास्त वाढत नाही. किंबहुना झाडांमुळे हवेत गारवा राहतो. म्हणूनच आपल्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात मोठी मोठी झाडे लावण्याचे महत्व हल्ली लोकांना पटू लागले आहेत. निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर मन शांत आणि चांगले राहते. अनेक अभ्यासांमध्ये असेही म्हटले गेले आहे की आपल्या आजूबाजूला भरपूर झाडे आणि वनराई असेल तर मनःस्थितीवर आणि आरोग्यावर त्याचा मोठा फरक पडतो.अर्थात मोठ्या शहरांमध्ये निसर्गाच्या सानिध्यात घर मिळणे कठीण होते पण आपण आपल्या घरातच इनडोअर प्लांट्स लावून दुधाची तहान ताकावर भागवू शकतो. इनडोअर प्लांट्समुळे घर फक्त सुंदरच दिसत नाही तर ते आर्द्रता, हवेतील घाण इत्यादी स्वच्छ करण्याचे कामही करतात.
ज्यांच्या घरी अंगण नाही किंवा ज्यांच्याकडे मोठी झाडे लावण्यास जागा नाही ते लोक बाल्कनीत किंवा टेरेसवरही भरपूर झाडे लावू शकतात. तुम्हाला ठाऊक आहे का, अशीही काही झाडे आहेत जी लावल्यास आसपासचा परिसर गार राहण्यात मदत होते. तसेच आपण घरातही असे काही इनडोअर प्लांट्स लावू शकतो ज्याने उन्हाळ्यात आपले घर थंड राहण्यास मदत होऊ शकते. बघूया कुठली झाडे लावून आपले घर उन्हाळ्यात गार राहू शकेल.
कोरफड
तुमच्या घरात कोरफड असल्यास तुमचे घर थंड राहतेच, पण सनबर्नवर उपचार करण्यासाठी तुम्हाला ताजे एलोवेरा जेल देखील मिळेल. हे हवेचे तापमान कमी करते आणि घराला जास्त गरम होण्यापासून वाचवते.
स्नेक प्लांट
हे झाड तुम्ही तुमच्या बेडरूममध्येही लावू शकता कारण हे झाड विशेषत: रात्रीच्या वेळी ऑक्सिजन घेत नाही. ते ऑक्सिजन उत्सर्जित करते आणि तुमची खोली थंड ठेवते आणि तिथली हवा ताजी व शुद्ध ठेवते.
अरेका पाम ट्री
हे एक लोकप्रिय झाड आहे जे अनेक लोक त्यांच्या हॉलमध्ये किंवा लिव्हिंग रूममध्ये ठेवतात. हे झाड दिसायला सुंदर असल्याने अनेक लोक सजावटीसाठी त्यांच्या घरात लावतात. हे झाड नैसर्गिक एअर ह्युमिडीफायर म्हणून काम करते. तुमचे घर थंड करण्याव्यतिरिक्त अरेका पाम हवेतील बेंझिन, फॉर्मल्डिहाइड आणि ट्रायक्लोरेथिलीन यांसारखे विषारी घटक काढून टाकण्यास मदत करते.
फायकस ट्री
सामान्यतः वीपिंग फीग म्हणून ओळखले जाणारे हे झाड घरातील हवेचे तापमान गार ठेवण्यास मदत करते तसेच वायू प्रदूषण कमी करते आणि हवेची गुणवत्ता सुधारते.
फर्न
हे दिसायला सुंदर असलेले झाड केवळ हवा थंड ठेवण्यात आणि हवेतील आर्द्रता वाढवण्यास फायदेशीर नाही तर कोरफडीप्रमाणेच हवेतील फॉर्मल्डिहाइड काढून टाकते. फर्नचे झाड हे सर्वांमध्ये सर्वात प्रभावी वायु-शुद्ध करणाऱ्या झाडांपैकी एक आहे.
गोल्डन पोथोस
गोल्डन पोथोस हे एक उत्तम इनडोअर प्लांट आहे कारण या झाडाला कमी प्रकाश मिळाला तरी चालतो आणि त्याची डोळ्यात तेल घालून फार काळजी घेण्याचीही आवश्यकता नसते. हे झाड तुमच्या घरातील हवा थंड आणि शुद्ध ठेवण्यास फायदेशीर आहे.
तर घरात ही झाडे लावा आणि शुद्ध व गार हवा मिळवा.
Photo Credit – unsplash.com
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक