कालपर्यंत कोल्हापूरमधील रंकाळा तलाव हा पर्यटकांसाठी फिरण्याचा, करमणुकीचा स्पॉट होता पण सोनी मराठीवरील अपूर्वा आणि विजय यांचं जुळल्यापासून आता या रंकाळा स्पॉटला प्रेमाचं रुपच मिळालंय जणू काही. ‘जुळता जुळता जुळतंय की’ ही मालिका आता मनोरंजक वळणावर पोहचली आहे. कोल्हापूरमधील रंकाळासारख्या नयनरम्य ठिकाणी विजय आणि अपूर्वा यांनी एकमेकांना आपल्या प्रेमाची कबुली दिली. प्रेम युगलांसाठी आता आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी रंकाळा हे ठिकाण आधीपासूनच प्रसिद्ध होता आणि आता नव्याने हा तलाव नव्या प्रेमाचा साक्षी होणार आहे.
‘जुळता जुळता जुळतंय की’ नव्या वळणावर
‘जुळता जुळता जुळतंय की’मध्ये विजयने अपूर्वाला अगदी वेगळ्या पद्धतीने प्रपोज केले. स्पेशल केळीच्या पानामध्ये जिलेबीच्या अक्षरात ‘माझ्याशी लग्न करणार?’ अशी मागणी घालून रंकाळा तलावा. कोल्हापुरी बाज जपत विजयनं अपूर्वाला मागणी घातली आहे. अर्थातच ही प्रपोज करण्याची वेगळी पद्धत नक्कीच आहे. ‘माझ्याशी लग्न करणार?’ अशी विजयने अपूर्वाला मागणी घातल्यावर एकही शब्द न उच्चारता ‘प्रश्नचिन्ह’ उचलून अपूर्वाने अगदी अलगदपणे आणि प्रेमाने तिचा होकार कळवला. सध्या मराठी मालिकांमध्येही प्रेमाचा बहर आलेला आहे. तर अगदी कमी कालावधीमध्ये ‘जुळता जुळता जुळतंय की’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्यामुळे विजय आणि अपूर्वा ही दोन्ही पात्र आपल्यापैकीच एक प्रेक्षकांना वाटायला लागली आहेत. त्यामुळे विजयनं अपूर्वाला घातलेली मागणी ही नेहमीच्या पद्धतीत नसल्यामुळेच प्रेक्षकांनाही ही मागणी आवडली आहे. त्यामुळे आता अपूर्वाला विजयच्या मनातील गोष्ट तर कळली आहे. पण त्यानंतर प्रश्नचिन्ह काढून पुढे नक्की काय? याचीही उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. इतकंच नाही तर आता विजय आणि अपूर्वाचं नक्की कधी लग्न होणार आणि विजय पूर्ण गावाला जिलेबी वाटणार का? याचंदेखील उत्तर नक्कीच प्रेक्षकांना लवकर हवं आहे.
विजय आणि अपूर्वाचं आगळं-वेगळं प्रेम
प्रेमाला कोणतीही बंधनं नसतात आणि आजकाल अशी उदाहरणं आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात. हळूहळू आपला समाजही हे स्वीकारयला लागला आहे आणि अशी बंधनं झुगारून बरीच उदाहरणं समोर येत आहेत. ‘जुळता जुळता जुळतंय की’ ही अशीच एक मालिका आहे. लग्नासाठी किंवा प्रेमासाठी केवळ रंग आणि रूपच गरजेचं नसतं तर माणसाचं मन पाहणंही त्यापेक्षा अधिक गरजेचं असतं आणि याच स्वरुपाचा संदेश या मालिकेतून प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न सोनी मराठीकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आता विजय आणि अपूर्वाच्या प्रेमाचं नक्की पुढे काय होणार? याची नक्कीच प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.