हिंदी मालिकांमध्ये कधी आणि कोणतं ट्वीस्ट येईल हे सांगता येत नाही. असंच काहीसं चित्र मराठी मालिकांमध्येही पण हिंदीच्या प्रमाणात ते कमी आहे. टीआरपीच्या दर आठवड्याच्या बदलणाऱ्या आकड्यांनुसार कधी कधी एखाद्या भूमिकेला अचानक मरण दिलं जातं तर कधी अचानक एखाद्याला जीवनदान दिलं जातं. असंच काहीसं झालं आहे मोलोय बासू म्हणजेच उदय टिकेकर यांच्या भूमिकेचं.
मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील जवळपास सर्वच माध्यमांमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनय कौशल्याने वेगळे स्थान निर्माण केलेले अभिनेते म्हणजे उदय टिकेकर. सध्या ते स्टार प्लस वाहिनीवरील कसौटी जिंदगी की 2 या मालिकेत अनुराग बासूच्या वडिलांची म्हणजेच मोलोय बासूची भूमिका साकारत आहेत. लवकरच ही मालिका 200 एपिसोड्सचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण करणार आहे. पण अवघ्या 200 एपिसोड्सच्या कालावधीतच या मालिकेमध्ये 200 पेक्षा जास्त ट्वीस्ट तरी नक्कीच दिसले असतील, असं म्हणायला हरकत नाही. मग ते कधी प्रेरणा आणि अनुरागच्याबाबतीतले असोत वा त्यांच्या इतर जवळच्या व्यक्तींबद्दलचे असोत. कधीकधी एखाद्या कलाकाराला चांगली संधी मिळाल्यावर तेही सीरियलला अचानक रामराम करतात.
मोलोय बासूंच्या भूमिकेला एक्सटेन्शन
असो…सूत्रांच्या माहितीनुसार मोलोय बासू यांचे अपघाती निधन होऊन ही भूमिका अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं ऐकिवात आलं होतं. पण मोलोय बासू या भूमिकेची वाढती लोकप्रियता आणि उदय टिकेकर यांचं अभिनय कौशल्य पाहता ही भूमिका वाढवण्याचा निर्णय आता चॅनेल आणि मालिकेच्या निर्मात्यांनी घेतला आहे. या मालिकेत त्यांना अपघात होऊन ते कोमात गेल्याचं दाखवण्यात आलं होतं. आता या अपघातानंतर हे पात्र डोळ्यांच्या आणि चेहऱ्यांच्या हावभावाने व्यक्त होताना दिसत आहे आणि अशी आव्हानात्मक भूमिकाही उदय टिकेकर समर्थपणे साकारत आहेत.
कोमोलिकामुळे झाला होता मोलोयचा अपघात
कोमोलिकाचा मृत्यू होण्याआधी तिने मोलोय बासू आणि राजेश यांचा जीव घ्यायचा प्रयत्न केला होता. कोमोलिकाने घडवून आणलेल्या अपघातामुळे राजेश यांना जीव गमवावा लागला पण मोलोय बासू कोमामध्ये गेले. पण आता त्यांच्या भूमिकेला जीवनदान मिळाले आहे. आता मोलोय यांच्या तब्येतीत सुधार होताना दिसत आहे.
मोलोय बासू आणि प्रेक्षक
मोलोय बासू ही भूमिका साकारत असताना उदय टिकेकरांच्या अभिनयाचे विविध पैलू प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहेत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांनी त्यांना वेळोवेळी दादही दिली आहे. एवढंच काय तर त्यांच्या सहकलाकारांनी या आधीही जेव्हा त्यांच्या भूमिकेला एक्स्टेन्शन मिळालं तेव्हा वेलकमबॅक पार्टीही दिली होती. तसंच त्यांच्या मोलोय बासू या भूमिकेच्या नावाने इन्स्टावर पेजेसही आहेत.
उदय यांनी मानले प्रेक्षकांचे आभार
प्रेक्षकांच्या या भूमिकेला मिळालेल्या उदंड प्रतिसादाबाबत विचारलं असता उदय टिकेकर म्हणाले की ” मी प्रेक्षकांचा खूप खूप आभारी आहे. तसंच अशाप्रकारचे कलरफुल कॅरेक्टर मला करायला मिळाल्याबद्दल मी स्टार प्लस, एकता कपूर, त्यांची संपूर्ण क्रिएटीव्ह टीम, दिगदर्शक आणि सहकलाकार यांचादेखील खूप आभारी आहे.”
आता या भूमिकेच्या एंट्रीमुळे मालिकेला कोणतं नवीन वळण मिळणार यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
हेही वाचा –
कसौटी जिंदगी की : प्रेरणा आणि अनुराग एकमेकांना करत आहेत का डेट
कसौटी जिंदगी की : सीरियलमध्ये झाली मिस्टर बजाजची एंट्री
‘कसौटी जिंदगी की’ ची ‘प्रेरणा’ श्वेता तिवारीचं पुन्हा टीव्हीवर कमबॅक