मराठी चित्रपटसृष्टीतील चिरतरूण नायिका ‘किशोरी शहाणे वीज’ आता आपल्याला एका नव्या अंदाजात दिसणार आहे. किशोरी शहाणे यांची महत्वाची भूमिका असलेला ‘मुंबई आपली आहे’ लवकरच प्रर्दशित होत आहे. या चित्रपटात किशोरी शहाणे प्रेक्षकांना नकारात्मक भूमिकेतून दिसणार आहे. ‘एक करारी मुख्यंमत्री’ ही भूमिका किशोरी या चित्रपटातून साकारत आहे. अनेक मराठी चित्रपटांमध्ये किशोरीने नायिकेच्या भूमिका साकारल्या आहेत. माहेरची साडी या चित्रपटातून किशोरीने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. एक काळ असा होता जेव्हा किशोरीच्या ‘प्रेम करुया खुल्लम खुल्ला’ या गाण्यातून प्रेमवीर आपलं प्रेम जगजाहीर करत असत. प्रेक्षकांनी आतापर्यंत किशोरीला नेहमीच गुडीगुडी भूमिकांमधून पाहिलं आहे. निर्मिती सावंत या अभिनेत्रीसह ‘जाडूबाई जोरात’ या मराठी मालिकेमध्ये देखील किशोरीने एक वेगळी भूमिका साकारली होती. या कॉमेडी मालिकेला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता. किशोरीचा ‘मुंबई आपली आहे’ मधला हा नवा अंदाज पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक आहेत. किशोरी शहाणे यांचे मननोहक सौदर्य आणि अभिनय आजही अनेकांना भुरळ घालतात. अनेक वर्ष सतत गुणी नायिकेच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आल्यानंतर आता या चित्रपटासाठी ‘नकारात्मक भूमिका’ साकारत चाहत्यांसमोर येणं किशोरीसाठीदेखील नक्कीच आव्हानात्मक असणार आहे. या चित्रपटासाठी हे आव्हान किशोरीने अगदी लीलया पेललं आहे असंच म्हणावं लागेल. त्यामुळे या भूमिकेतून किशोरीच्या अभिनयातील निगेटिव्ह छटा आता प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.
गुन्हेगारीवर आधारित ‘मुंबई आपली आहे’
‘मुंबई आपली आहे’ चित्रपट 11 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक ‘भरत सुंनदा’ आहेत. मुंबई आपली आहे या चित्रपटाला रुपेश गोंधळी यांनी संगीत दिलं आहे. मराठी चित्रपटात कधीही न अनुभवलेला ‘थरार’ प्रेक्षकांना या चित्रपटातून अनुभवता येणार आहे. 1993 साली असलेली गुन्हेगारी प्रवृत्ती, चाळसंस्कृती आणि त्यातून हळूवार फुलणारी प्रेमकथा या विषयाभोवती या चित्रपटाचं कथानक फिरतं. बॉलीवूड आणि मराठी चित्रपटातून रोमॅंटिक हिरो साकारणारा ‘राकेश बापट’ या चित्रपटात एका कुख्यात गॅंगस्टरच्या भूमिकेतून दिसणार आहे. सहाजिकच राकेश बापटला देखील या चित्रपटातून एक हटके भूमिका साकारता आली आहे. अरुण नलावडेदेखील या चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात अनेक मात्तबर कलाकार त्यांच्या नेहमीपेक्षा वेगळ्या भूमिका साकारत असल्याने हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम