ADVERTISEMENT
home / आयुष्य
Lagna Vidhi Marathi

हिंदू लग्न विधी समारंभ असतो असा, विवाह विधी घ्या जाणून (Lagna Vidhi Marathi)

आपण नेहमीच लग्नसमारंभ, सोहळे (Marathi Lagna Sohala) यांना लहानपणापासून जात असतो. लग्नातील जोडपे, लग्नात देण्यात येणारी सात वचने (Lagnache 7 Vachan In Marathi), विधी हे सगळे शब्द आपल्या कानावर जातातच. आपला मित्रपरिवार, कुटुंब एकत्र येते आणि हीच आपल्यासाठी पर्वणी असते. पण लग्न म्हणजे फक्त लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश देणे नव्हे. यात लग्न कुंडली बघण्यापासून ते विदाई पर्यंत प्रत्येक गोष्टीला एक अर्थ आहे. लग्न म्हणजे नक्की काय आणि याचे विधी काय असतात, लग्न कुंडली कशी पहिली जाते हे कधी ना कधीतरी आपल्याला जाणून घ्यायला हवे. कोणाच्याही लग्नात गेल्यानंतर आपल्याला पूर्ण विधी पाहायला मिळत नाहीत. आपल्या हिंदू धर्मामध्ये लग्नाआधीपासून अनेक विधी (Lagna Vidhi Marathi) असतात आणि त्याचीच संपूर्ण माहिती आम्ही या लेखातून देण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्हाला हिंदू लग्न विधी समारंभ नक्की कसा असतो, विवाह विधी (Marathi Lagna Vidhi) काय असतात, लग्नाचे रूखवत (Marathi Lagna Rukhwat) म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही हा लेख नक्कीच वाचायला हवा.

लग्ना आधीचे विधी (Lagna Aadhiche Vidhi Marathi)

Lagna Vidhi Marathi
Lagna Vidhi Marathi

लग्न म्हणजे आधी बरीच तयारी असते आणि लग्नाच्या चार दिवसाआधीपासूनच अनेक विधींना सुरूवात होते. आपण सहसा लग्नात जाऊन बघतो पण त्याआधी घरातही अनेक विधी करण्यात येतात. हे नक्की कोणते विधी (Lagna Vidhi Marathi) आहेत ते आपण पाहूया.

सोडमुंज (Sod Munj)

हिंदू धर्मामध्ये अनेक जाती आहेत. त्यातही मराठी लोकांमध्येही पोटजाती आहेत. त्यापैकी काही जातींमध्ये मुंज करण्यात येते. मुंजीनंतरचा एक विधी म्हणजे सोडमुंज. लग्नाआधी सोडमुंज केल्याशिवाय लग्न लावता येत नाही असे म्हटले जाते. यालाच समावर्तन असेही म्हणतात. हा एक द्वादश संस्कार असल्याचे सांगण्यात येते. ‘समावर्तन’   म्हणजेच विद्यार्जन संपवून स्वगृही परत येणे असा अर्थ आहे.  पूर्वीच्या काळी वेदाचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर अभ्यास संपवून परत स्वत:च्या घरी येण्यापूर्वी गुरू सर्व शिष्यांचा समावर्तन संस्कार करायचे. यावेळी गुरूला दक्षिणा दिली जायची. मुंज झाल्यावर विद्यार्थी दशेत गुरुच्या घरी शिकायला गेलेला शिक्षण घेण्यासाठी गुरुच्या घरीच रहात असे. त्यामुळे शिक्षण संपल्यानंतर अंतिमतः अधिकृत परवानगी म्हणून या संस्काराकडे पाहिले जात होते. यावेळी गुरू आपल्या शिष्याला गृहस्थ आश्रम संबंधात श्रुतिसंमत आदर्शपूर्ण उपदेश करायचे. याचाच अर्थ ब्रह्मचर्यव्रताची निवृत्ती होय. यामध्ये कंबरेतील करगोटा काढून टाकतात म्हणून याला ‘सोडमुंज’ असे संबोधण्यात येते. पूर्वीच्या काळापासून सोडमुंज झाल्याशिवाय लग्न करण्यात येत नसे. तीच परंपरा कायम चालू आहे.

साखरपुडा (Engagement Ceremony)

Marathi Lagna Vidhi
Engagement Ceremony – Marathi Lagna Vidhi

लग्नाआधी करण्यात येणारा महत्त्वाचा विधी म्हणजे साखरपुडा. वधू आणि वराची परस्पर पसंती झाल्यानंतर साखरपुडा हा विधी निश्चित केला जातो. शास्त्रामध्ये  साखरपुडा या  विधीचा  उल्लेख करण्यात आलेला  नाही. पण संपूर्ण समाज, आप्तेष्ट, नातेवाईक या सर्वांना साक्षी ठेऊन विवाह निश्चित करण्याचा कार्यक्रम म्हणजे साखरपुडा.

ADVERTISEMENT

वराचे आई-वडिलांनी वधूला साडी, ब्लाऊजपीस, अलंकार, गजरे, इ. देतात आणि  नंतर वधूच्या आईवडिलांनी वराला चौरंगावर बसवून पोशाख वगैरे देऊन त्याचा सत्कार करायचा असतो.  दोन्ही व्याह्यांनी समोरासमोर बसून गणपतीपूजन व वरुणपूजन केल्यानंतर वधू-वर कपडे  बदलून येतात. त्यानंतर वराच्या आईने वधूला हळद-कुंकू लाऊन मनगटावर अत्तर लाऊन तिला पेढा भरवायचा आणि  वराकडील 5 सुवासिनींनी वधूची 5 फळांनी ओटी भरायची असते.  वराच्या वडिलांनी वधूला पेढ्यांचा पुडा द्यावा. तर यानंतर वधू- वरांनी एकमेकांच्या बोटात अंगठी घालून आता आपण लग्नासाठी तयार असल्याचे सांगायचे असते.

वाचा – साखरपुडा शुभेच्छा

केळवण (Kelvan)

लग्न ठरल्यानंतर वधू आणि वराकडील नातेवाईक आणि मित्रमंडळी आता लवकर भेट होणार नाही म्हणून हा विधी करतात. वधू आणि वरांना त्यांच्या आवडीचे पदार्थ खायला घालून एक दिवस पूर्ण त्यांच्यासह घालविण्याचा हा विधी आहे. लग्नाच्या वेळी नवरा आणि नवरीला वेळ नसतो. त्यामुळे लग्नाच्या आधी त्यांच्यासोबत वेळ घालविण्यासाठी हा विधी करण्यात येतो. मुळात आपल्या आवडत्या व्यक्तीसह वेळ घालवणे हा विधीमागील उद्देश आहे. पूर्वी अनेक जण घरात असायचे पण आता वेळ काढणे अशक्य होते. त्यामुळे आता या विधीला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे.

देवांना निमंत्रण (Invitation to God)

वधूपक्ष आणि वरपक्ष मुहूर्त काढून आमंत्रण पत्रिका बनवतात आणि ती पहिली पत्रिका ही घरातील देवांना अर्थात आपल्या कुलदेवतेला ठेवतात. त्यालाच देवाला निमंत्रण देणे असं म्हणतात. निमंत्रण पत्रिका छापून झाल्यावर वर प्रमुख तसेच वधूप्रमुख आणि घरातील इतर वडीलमंडळी हे सर्व घरातल्या देवांना तसेच गावातील ग्रामदेवता, शक्य झाल्यास कुलदेवता यांच्या मंदिरात जाऊन आग्रहाचे आमंत्रण देतात. मंदिरात जाऊन तिथे हार, फ़ुले नारळ विडा ठेऊन आणि देवीचे मंदीर असेल तर घरातील सुवासिनी खण – नारळाने ओटी भरतात आणि पत्रिका ठेवतात. कार्यामध्ये कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून प्रथम देवांना निमंत्रण देण्याची पद्धत आहे.

ADVERTISEMENT

ग्रहमख (Grahmakh)

Lagna Vidhi Marathi
Grahmakh – Lagna Vidhi Marathi

लग्नाच्या आधी चार दिवस अथवा लग्न होण्यापूर्वी एक दिवस हा विधी करण्याची पद्धत आहे. ग्रहशांतीनिमित्त करण्यात येणारा हा यज्ञ लग्नाच्या आदल्या दिवशी किंवा आधी आठ दिवस केला तरी चालतो. कोणतेही मंगलकार्य करण्याआधी नवग्रहांची कृपा व्हावी म्हणून हा यज्ञ करण्यात येतो. या विधीमध्ये नवग्रहांच्या पूजेला तसेच वरुण देवाच्या पूजेला महत्त्व देण्यात येते. ग्रहमखाच्या दिवशी वराचे आणि वधूच्या घरचे केळवण तसेच वराच्या घरी वधूच्या आईवडिलांसाठी व्याही भोजन करण्याची पद्धत आहे. त्यानुसार दोन्ही कुटुंब एकत्र येऊन हा विधी करतात. 

घाणा भरणे (Ghana Bharne)

लग्नाच्या दिवशी अथवा ग्रहमखाच्या दिवशीच हा विधी करण्यात येतो. लग्नाच्या आधीच्या दिवशी  करण्याचा हा विधी असून तो सकाळी शक्यतो पारोशाने अर्थात आंघोळ न करता करायचा असतो. हा विधी लग्नाअगोदर करायचा असेल तर लग्नापूर्वी तीन, सहा अथवा नववा दिवस वर्ज्य करावा असे सांगण्यात येते. या विधीमध्ये धान्य कांडले जाते आणि धान्य कांडण्यामागे कार्याला आलेल्या सर्व आप्तांसाठी अन्न तयार करणे हा उद्देश असतो. 

वाचा – मराठमोळ्या मंगळसूत्र डिझाईन्स

मेंदी आणि चुडा भरणे (Mehndi & Chuda Ceremony)

Marathi Lagna Vidhi
Mehndi – Marathi Lagna Vidhi

कोणत्याही शुभकार्याला मेंदी लावणे ही खरी तर राजस्थानमधील मूळ पद्धत आहे. पण आता ही पद्धत महाराष्ट्रातही लोकप्रिय झाली आहे. मेंदीच्या कोनाच्या सहाय्याने वधूच्या तळहातापासून ते मनगटापर्यंत व हाताच्या पाठीमागच्या भागावरही, तसेच पावलांवर घोटयापर्यंत नाजूक कलाकुसरीची मेंदी काढली जाते. वधूचे सौंदर्य खुलविण्यासाठी ही मेंदीची प्रथा पूर्वपरंपरागत चालत आली आहे. मेंदीचा हा कार्यक्रम सहसा लग्नाच्या दोन दिवस आधी मित्रमैत्रिणींच्या सहवासात केला जातो. वधूबरोबरच लग्नासाठी जमलेल्या महिलांनाही मेंदी काढतात. मेंदी रंगल्यावर वधूला चुडा भरतात. चुडा म्हणजे हिरव्या रंगाच्या साध्या काचेच्या बांगडया. चुडा भरताना दोन्ही हातात सात-सात अथवा नऊ-नऊ बांगडया घालतात. त्यासाठी बहुदा लग्नाच्या मंडपात कासाराला बोलाविण्याची पद्धत अजूनही आहे. हिंदूंच्या अथवा मराठी लोकांच्या दृष्टीने हिरव्या बांगडया व कुंकू हे सौभाग्याचे लक्षण मानले जाते.

ADVERTISEMENT

वाचा – Navrichi Mehndi Design

हळद (Haldi Ceremony)

Haldi Ceremony
Haldi Ceremony

आजकाल या विधीला खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र याचा मूळ उद्देश म्हणजे हळद लावण्यामागेदेखील शास्त्र आहे. आयुर्वेदामध्ये हळद ही अँटिसेप्टिक आणि त्वचेसाठी उपयुक्त मानली जाते. तर तेल हे त्वचेला मऊपण देणारे आहे. त्यामुळेच हळदीचा कार्यक्रम करण्यात येतो. हळद व तेलामुळे वधू वराला सुकांती प्राप्त व्हावी असा हेतू असतो. हळदीमुळे लग्नाच्या दिवशी चेहऱ्यावर चांगली चमक येते आणि म्हणूनच हा विधी करण्यात येतो.  

व्याहीभेट (Vyahi Bhet)

व्याही अर्थात मुलीचे पिता आणि मुलाचे पिता हे एकमेकांना भेटून आहेर देतात. वधूचे वडील हे वराच्या वडिलांना चांदीचा पेला किंवा फुलपात्र देतात अशी परंपरागत चालत आलेली पद्धत आहे. मात्र आता वेगवेगळे गिफ्ट देण्यात येते. यावेळीच व्याही भोजन करण्यात येते. व्याही एकमेकांसह भोजन करण्याची ही प्रथा आहे.

लग्नातले विधी (Lagna Vidhi Marathi)

मराठी लग्न विधी (Marathi Lagna Vidhi) खूपच मोठे असतात. त्यामध्ये लग्नाच्या विधीला सुरूवात होते ती म्हणजे सीमांत पूजन या विधीने. नक्की लग्नात कोणकोणते विधी असतात ते आपण जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

सीमांत पूजन (Simant Pujan)

विवाहविधी हे सहसा मुलीच्या मंडपामध्ये अर्थात मुलगी जिथे राहते तिथे करण्याचे शास्त्र आहे, पण आधीच्या काळी लग्नापूर्वी हा विधी मंडपामध्ये न होता तो गावच्या सीमेवर होत असे म्हणून सीमांत पूजन म्हणजे सीमेवर केले जाणारे पूजन असे म्हटले जाते. वाङ् निश्चय झाल्यानंतर मुहूर्त काढलेल्या दिवशी वर वधूच्या गावी गेला की, त्याचे गावच्या सीमेवर पूजन केले जात असे. यात वराची पूजा करून त्याला विविध अलंकार घालण्यात यायचे. यामध्ये वराचे पाय धुऊन त्याला नवीन वस्त्रे देण्याची पद्धत होती. विहिणीचे देखील पाय धुऊन तिला साडी-ब्लाऊज आणि शिधा देण्यात येतो. वराचे पूजन करण्यापूर्वी सीमांत पूजनाचा संकल्प हा नवरीच्या वडिलांकडून करण्यात येतो. निर्विघ्नतेसाठी गणेश पूजन करून वरपूजन या विधीमध्ये करण्यात येते. अजूनही हॉलमध्ये हे सर्व विधी करण्यात येतात. यावेळीच वधूला जर मोठी बहीण असेल तर ज्येष्ठ जावई पूजन हा विधी करण्यात येतो. वधूच्या आई-वडिलांना ज्येष्ठ जावई असेल तर धाकट्या मुलीचे लग्न होण्यापूर्वी ज्येष्ठ जावयाचा प्रथम आहेर देऊन सन्मान करण्यात येतो आणि मग वराचे सीमांतपूजन करण्यात येते. 

रूखवत (Marathi Lagna Rukhwat)

मराठी लग्नात रूखवत (Marathi Lagna Rukhwat) हे दोन पद्धतीचे असते. रूखवत फराळ हा पहिला प्रकार. रुखवत हा न्याहारी देण्याचा एक प्रकार आहे. सात्विक आहार म्हणून हा देण्यात येतो.  उपाशीपोटी असलेल्या व्यक्तीला आपली मुलगी देऊ नये असे शास्त्र सांगते. म्हणून हा विधी करण्यात येतो. कन्यादानाच्या वेळी वराने उपहार केलेला असावा म्हणून त्याला खायला घालण्याचा हा विधी आहे. तर दुसरी पद्धत म्हणजे मुलगी किती गुणी आहे हे दाखविण्यासाठी रूखवत मांडले जाते. यामध्ये तिने केलेल्या वस्तू सासरच्या मंडळीना दाखवण्यात येतात. 

तेलफळाची ओटी (Tel Fal Oti)

लग्नाच्या दिवशी पहाटेच मुलाकडील सुवासिनी मुलीसाठी तेलफळ घेऊन येतात. गौरीहरापाशी पहिली ओटी भरावी असे शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे. वधूची 5 फळे आणि हिरवी साडीचोळी, एखादा दागिना देऊन ओटी भरली जाते. या ओटीसह मुलगी लग्नाच्यावेळी उभी राहते. हा विधी सर्व जातींमध्ये केला जातो असे नाही. वधूला हिरवी साडी, 5 फळे, न सोललेला नारळ, फुलांची मुंडावळ, एखादा दागिना, तेलाचे भांडे, डाव, कुंकवाचा करंडा आणि फणी देतात. वराची आई ही वधूची ओटी भरते. नंतर वधूच्या आईचीसुद्धा पाय धुऊन ओटी भरायची असते पण सर्वांना हे माहीत असतेच असे नाही.

गौरीहर पूजन (Gaurihar Puja)

Gaurihar Puja
Gaurihar Puja

महादेवासारखा पती मिळावा या चांगल्या हेतूने ही पूजा लग्नाच्या वेळी वधूने करायची असते. सजवलेल्या मंडपामध्ये तांदुळाची रास करून त्यावर अन्नपूर्णेची स्थापना करण्यात येते. गौरीहराची पूजा केली जाते. तर काही ठिकाणी बाळकृष्ण ठेवण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी लाकडी बोळकी मांडण्यात येतात तर काही ठिकाणी मंडपी ठेवून त्यात गौर ठेवली जाते.  वधूने पिवळी साडी नेसून समई लावावी आणि मग गौरीहरपूजन करावे असे सांगण्यात येते. अन्नपूर्णा म्हणजेच दाक्षायणी. शंकरासारखा पराक्रमी, बलवान पती आपल्यालाही प्राप्त व्हावा म्हणून हे पूजन करण्यात येते. तर “गौरी गौरी सौभाग्य दे, दारी पाहुणा येईल त्यास आयुष्य दे” असे जपत दोन्ही हातांनी थोडे तांदूळ देवीला सतत वाहत राहायचे असतात. मामा मुहूर्ताला न्यायला येईपर्यंत हे पूजन करायचे असते.

ADVERTISEMENT

मंगलाष्टके (Mangalashtak)

Mangalashtak
Mangalashtak – Lagna Vidhi Marathi

मुहूर्त जवळ आल्यानंतर मंडपात मध्यभागी पूर्व आणि पश्चिम अशा तांदुळच्या राशी घालून राशीच्या मध्यभागी कुंकवाने दोन्ही बाजूंनी काढलेला अंतरपाट भटजींद्वारे धरण्यात येतो. वधूला पश्चिमेकडच्या राशीवर पूर्व दिशेला तोंड करून आणि वराला पूर्वेकडेच्या राशीवर पश्चिम दिशेला तोंड करून उभे केले जाते. वधूवरांना समोरासमोर येण्याचा हा पहिलाच प्रसंग असतो. यावेळी मंगलाष्टके गायली जातात. मंगलाष्टक म्हणजे आठ श्लोकांचे मंगल वचनांचे अष्टक असते. मुहूर्ताची घटिका जवळ येईपर्यंत मंगलाष्टके म्हणण्याची पद्धत आहे. 

वरमाता ओटी भरणे (Var Mata Oti)

या विधीदरम्यान वराच्या आईला चौरंगावर बसवायचे असते. वधूच्या आईने वराच्या आईची साखरेची ओटी भरायची आणि यामध्ये साडी, ब्लाऊजपीस, तांदूळ, नारळ, विडा, एखादा दागिना, गजरा आणि साखरेचा पुडा ठेवण्याची पद्धत आहे.

कन्यादान (Kanyadaan)

लग्नातील सर्वात महत्त्वपूर्ण आणि भावनिक विधी. योग्य स्थळी कन्यादान केले आणि चांगली प्रजा निर्माण झाली म्हणजे कन्यादानाची सांगता झाली असे मानण्यात येते. कन्यादानाच्या वेळी कन्येचा वधू म्हणून स्वीकार करताना वरावर येणारी जबाबदारी आणि बंधने यांची जाणीव वधूच्या पित्याकडून दिली जाते. विवाह सर्व अर्थाने सुखी यशस्वी होण्याकरता धर्म, अर्थ, काम यांचा वैवाहिक जीवनात आनंद उपभोग घेताना मर्यादेचे उल्लंघन करणार नाही असे वचन वराने यावेळी वधूला द्यावे लागते. वधूचा पिता आपली कन्या संपूर्णतः वराला सोपवतो असा हा विधी आहे. यानंतर आता पिता म्हणून आपला कोणताही हक्क नाही आणि आता ती सर्वस्वी पतीची जबाबदारी आहे असंही पूर्वपरंपरागत सांगण्यात येते. 

कंकण बंधन (Kankan Bandhan)

Kankan Bandhan
Kankan Bandhan

वधूवरांच्या भोवती मंत्रघोषाने सूत्रबंधन करण्याच्या विधीला कंकणबंधन म्हटले जाते . वधूवरांना एकत्र बांधून टाकणारा सुत्रावेष्टनाचा हा संस्कार करण्यात येतो. कन्यादानाच्या विधीनंतर वर कन्येच्या उजव्या कुशीला स्पर्श करून देवाकडे आवडती संतती देण्याची आकांक्षा करतो. नंतर दोघांना समोरासमोर बसवून दुधात भिजवलेल्या पांढ-यासुताने त्यांच्या कंठाला व कमरेला चार अथवा पाचवेळा वेढे दिले जातात आणि नंतर कमरेचे सुत दोघांच्या वरून व कंठाचे सुत जमिनीवर ठेऊन ते काढून घेतात. त्याला हळद व कुंकू लावून हळकुंड बांधून कमरेजवळच्या सुताने केलेले कंकण वराच्या उजव्या मनगटाला वधू बांधते आणि गळ्याजवळच्या सुताने केलेले कंकण वर वधूच्या डाव्या मनगटाला बांधतो. याला कंकणबंधन असे म्हणतात. व्रतस्थ असणा-या वधूवरांनी बंधनात राहावे म्हणून हे बंधन असते. हे चार दिवसांनी सोडले जाते.

ADVERTISEMENT

मंगळसूत्र बंधन (Mangalsutra Bandhan)

Mangalsutra Bandhan
Mangalsutra Bandhan

वराच्या आईने दिलेले वस्त्र परिधान केल्यानंतर वराने मंगळसूत्र वधूच्या गळ्यात बांधायचा हा विधी असतो. यामागचा उद्देश असा की, मंगल म्हणजे पवित्र, सूत्र म्हणजे दोरा. या मंगळसूत्राने लज्जारक्षण करण्यात येते. मंगळसूत्रातील काळ्या मण्यांमुळे दृष्टीबाधा होण्यापासून संरक्षण मिळते. दोन वाट्या चार मणी हे सोन्याचे असतात तर एक वाटी दोन मणी सासरचे आणि एक वाटी दोन मणी माहेरचे अर्थात दोन्हीकडून समसमान प्रेम असे हे प्रतीक आहे. हे सोन्याचे करण्यामागे आपल्या मुलीला अलंकृत करणे हा एकमेव हेतू असतो. सासरचे आणि माहेरचे अशी दोन्ही कुटुंबं एकत्र करून संसार माळेसारखा बांधून ठेव असा संदेश कन्येला यातून दिला जातो.

होम (Havan)

Homhavan
Homhavan

वधूच्या वडिलांनी  दिलेले सोवळे नेसून वराने वधूसहित या विधीमध्ये बसायचे असते. होम केल्यानंतर त्यामध्ये तुपाच्या 5 आहुत्या दिल्या जातात आणि त्यानंतर पाणिग्रहण आणि लाजाहोम करण्यात येतो. वधूच्यासमोर वराने उभे राहून तिचा हात आपल्या हातात घेऊन तिला उभे करायचे असते. याला ‘पाणिग्रहण’ म्हणतात. होमाभोवती 3 वेळा प्रदक्षिणा मारून फेरे घेतले जातात. लाह्यांच्या 4 आहुत्या होमामध्ये वर-वधू एकत्र आपल्या ओंजळीमधून यावेळी देतात. यालाच ‘लाजाहोम’ असे म्हटले जाते. यानंतर एक प्रथा म्हणून वधूचा भाऊ नवऱ्याचा कान पिळतो आणि त्याचा मान म्हणून त्याला आहेर केला जातो. याला ‘कानपिळी’  असे म्हटले जाते. आपल्या बहिणीची काळजी घेण्यासाठी आपण आहोत हेच वराला वधूचा भाऊ सांगतो. 

सप्तपदी (Lagnache 7 Vachan In Marathi)

सप्तपदी (Lagnache 7 Vachan In Marathi) दरम्यान होमकुंडाच्या उत्तर दिशेला मांडून ठेवलेल्या एकेका तांदुळाच्या राशीवरून स्वतःच्या पायाचा अंगठा पुढे सरकवत वधूने 7 पावले पूर्वेकडे तोंड करून चालायचे असते, याला सप्तपदी म्हणतात. लग्नाची सात वचने वधू आणि वर एकमेकांना यावेळी देतात आणि जन्मभर ही वचने पाळण्याबाबत एकमेकांना सांगतात. दोघांनाही आपापल्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी हा विधी आहे. भारतीय परंपरेनुसार लग्नाच्या सप्तपदीचं महत्त्व आहे.

ऐरणी दान (Airani Daan)

वरमातेचे यथाशक्ती पूजन करून तिची पांढरी साडीचोळी, सौभाग्यवायन अर्थात त्यामध्ये आरसा, कंगवा, कुंकू, मणी, मंगळसूत्र देण्यात येते. नंतर सुपातअथवा रोवळीत सोळा दिवे ठेऊन प्रथम उमा-महेश्वराची पूजा करून हे दिवे कन्येचा पिता प्रथम कन्येच्या मग वराच्या मग सासू सासऱ्यांच्या डोक्यावर धरत जातात. आई दिव्याखाली कापड धरते .हा विधी झाल्यावर ते सूप अथवा रोवळी वराच्या आईला दान केली जाते. दिवे डोक्यावर धरण्याचा अर्थ असा की आजपासून मुलीची जबाबदारी तुमच्यावर सोपवली आहे. थोडक्यात अर्थ असा की आमची मुलगी आजपर्यंत आम्ही आमच्या मुलाप्रमाणे वाढवली आहे ती आता तुमच्या घरची सून आहे तिला तुमच्याकडील रिती-रिवाजांबद्दल माहिती नाही तरी तिला तुमच्याकडील सर्व गोष्टी समजावून सांगून तिचा तुमच्या मुलीप्रमाणे सांभाळ करा.

ADVERTISEMENT

सून मुख (Sun Mukh)

सून हे आपलेच अपत्य म्हणून स्वीकारायचे असा हा विधी सासूसह करण्यात येतो. सासूला मध्यभागी बसवून एका मांडीवर सुनेला व दुस-या मांडीवर मुलाला बसवायचे आणि आरशात सुनेचा चेहेरा पहायचा. तिच्या पाठीवरून हात फिरवायचा तिची वेणी घालायची.आरशात पहायचे कारण असे की अलंकृत अशा मुलीला कोणाचाही दृष्ट लागू नये. कारण प्रतिबिंबाला दृष्ट लागत नाही. तिला सासूने धीर द्यायचा थोडक्यात यापुढे आईची माया तिला द्यायची जबाबदारी सासूची असे म्हटले जाते. यालाचा सूनमुख असे नाव देण्यात आले आहे. 

मुलीच्या नावात बदल (Change In The Name)

यानंतर तांदळामध्ये लिहून मुलीचे नाव बदलण्यात येण्याचा विधी करण्यात येतो. आता तशी ही परंपरा शिल्लक राहिलेली नाही. कारण सहसा मुली नाव बदलायला तयार होत नाहीत. पण तरीही हा विधी करण्यात येतो. केवळ तांदळात नाव कोरून हा विधी करण्यात येतो. नवरा मुलगा बऱ्याचदा उखाणा घेऊनही मुलीचे नाव बदलतो. 

लग्नाची पंगत (Lagnachi Pangat)

यावेळी वधूच्या आई आणि वडिलांनी वर व वराच्या आई-वडिलांना जेवणाचे आमंत्रण द्यायचे असते.  चांदीच्या वाटीत 5  मोती व 5 सोन्याचे मणी घालून अक्षता घालून वाटीसह द्यायचे असते. हा त्यांचा मान असतो. जेवणाच्या पंगतीत मुलाकडील मानाच्या माणसांच्या ताटाभोवती रांगोळ्या काढल्या जातात. चांदीचे ताट, उदबत्ती, पंचपक्वान्ने वाढून सनईच्या मंद सुरात भोजन समारंभ करण्यात येतो  वधू आणि वर उखाणा घेऊन अर्थात एकमेकांचे नाव घेऊन घास भरवतात. जेवणानंतर वधूच्या आईने वराची आई व इतर मानाच्या सुवासिनींना हात धुण्यासाठी गरम पाणी, हातावर साखर,चांदीची लवंग देण्याची पद्धत आहे. 

लग्नानंतरचे विधी (Lagna Nantarche Vidhi Marathi)

केवळ लग्न झाले इथपर्यंतच थांबत नाही. त्यानंतरही दुसऱ्या दिवशी काही विधी शिल्लक असतात. लग्नानंतरचे विधी (After Wedding Ritual In Marathi) नक्की कोणते आहेत ते आपण पाहूया.

ADVERTISEMENT

वरात (Barat)

वधू आणि वराच्या हातावर दही आणि साखरचे मिश्रण देऊन त्यांना वधूच्या आईवडिलांकडून निरोप दिला जातो. नंतर वाजत गाजत वधूला घेऊन वर आपल्या घरी घेऊन जातो तशी पद्धत आहे.

उखाणे घेण्याची पद्धत (Ukhane)

आपल्याकडे विशेषतः मराठी लग्नामध्ये अगदी सगळ्या विधींसाठी वेगवेगळे मराठी उखाणे घेतले जातात. उखाणे म्हणजे वधू आणि वराने एकमेकांचे नाव विशिष्ट पद्धतीने आणि कार्यक्रमाच्या अनुषंगाने घेणे. घरातील मोठ्या व्यक्ती आणि मित्रमैत्रिणींकडून यावेळी दोघांनाही चिडवण्यात येते आणि सहसा अरेंज मॅरेज पद्धतीत नवऱ्याचे नाव घ्यायला मुली लाजतात. नवरीसाठी खास उखाणे असतात मग अशावेळी उखाण्यांमध्ये नाव घेण्याची ही पद्धत आहे. आताही हा विधी केला जातो. पण मजेसाठी हा विधी जास्त प्रमाणात करण्यात आल्याचे हल्ली दिसून येते. 

लक्ष्मीपूजन (Laxmi Puja)

चांदीच्या ताटात सोन्याच्या तारेने वराने वधूचे नाव लिहावे अशी प्रथा आहे. वधुचे नामकरण आणि कन्येचा विवाह हा तिचा पुनर्जन्म मानला गेलेला आहे. ज्याप्रमाणे लग्नानंतर गोत्र बदलते त्याप्रमाणे नावही बदलले जाते असे पूर्वपरंपरागत चालत आले आहे. ते नवीन नाव उखाण्यातून सर्वांना सांगायचे असते. वराच्या आईने वधूची ओटी भरून तिला साडी, ब्लाऊजपीस, विडा, नारळ, गजरा, पेढा, एखादा दागिना.द्यावा.  लक्ष्मीपूजन हे वराच्या घरी गेल्यानंतर करण्यात येते.  पण हल्ली हे लग्नाच्या वेळी कार्यालयातच करण्याचा पायंडा पडला आहे.

सत्यनारायण (Satynarayan Puja)

लग्नानंतर लक्ष्मी नारायणासारखा जोडा कायम टिकून राहावा आणि सर्व काही मंगल कार्याने सुरू व्हावे म्हणून सुनेच्या गृहप्रवेशानंतर सत्यनारायणाची पूजा करण्यात येते. घरातील मंडळीच्या उपस्थितीत आणि सुनेला जवळच्या नातलगांची कल्पना यावी यासाठी ही पूजा घरात करण्यात येते. तसंच सत्यनारायणाची पूजा ही पवित्र मानली जाते. त्यामुळे लग्न झाल्यानंतर ही करण्याची प्रथा आहे. 

ADVERTISEMENT

कंकण सोडणे (Kankan Ceremony)

लग्नाच्या दिवशी बांधलेले कंकण हे माहेरी जाऊन पाचपरतवणीला सोडण्यात येते. इतके वर्ष माहेरी राहिलेली मुलगी कंकण सोडण्यासाठी पुन्हा एकचा चार दिवसांनी माहेरी जाण्याची पद्धत आहे. वराकडील सर्व मंडळी ही मुलीला माहेरी घेऊन जाताता आणि पहिल्यांदाच मुलीच्या घरी जेवण्यासाठी जातात अशी पद्धत आहे. कंकण सोडल्यानंतर सर्व विधी समाप्त होतात. 

हिंदू धर्मानुसार आणि मराठी लग्न पद्धतीनुसार हे सर्व विधी लग्नाच्या वेळी करण्यात येतात. तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेअर करा. 

09 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT