प्रेक्षकांना खळखळून हसवणारी ‘महाराष्ट्राची जत्रा’ हसवायला पुन्हा एकदा परतणार आहे . सोनी मराठीवर प्रक्षेपित होणाऱ्या या शोच्या पहिला सीझनने सगळ्यांना पोट धरुन हसवले. प्रेक्षकांचे हास्यजत्रेवरील प्रेम पाहता आता हास्य जत्रेचा दुसरा सीझन लवकरच येणार आहे. नुकतीच ही बातमी सोनी टीव्हीकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच जजच्या भूमिकेत मराठी सिनेसृष्टीतील गाजलेला पोलीस महेश अर्थात महेश कोठारे दिसणार आहे. येत्या ७ जानेवारीपासून हा नवा सीझन सुरु होणार आहे.
नवा सीझन नवा फॉरमॅट
२६ डिसेंबरला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा पहिला सीझन संपला. इतक्या लगेच दुसरे सीझन येईल,असे वाटले नव्हते पण नवीन वर्षाचे औचित्य साधत या धम्माल कॉमेडी शोचा दुसरा सीझन सुरु होणार आहे. आता दुसरा सीझन म्हणजे वेगळेपणा असणारचं नाही का? आठवड्यातील ४ दिवस हा नवा सीझन प्रेक्षकांचे मनोरंजन करेल. सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा- कॉमेडीचे जहागिरदार’ अशी थीम असेल. या दोन दिवसांचे परफॉर्मन्स महेश कोठारे जज करतील. महेश कोठारे यांच्यासोबत सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत आणि हे दोघे आठवड्याच्या शेवटी ‘परफॉर्मन्स ऑफ द वीक’ ची निवड करणार आहे.
धमाकेदार विनोदवीरांची टोळी
कॉमेडीची खुमासदार फोडणी लावण्यासाठी नव्या सीझनमध्ये ६ सेलिब्रिटी कलाकार असणार आहेत. समीर चौघुले, विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर, पॅडी कांबळे, अरुण कदम आणि अंशुमन विचारे असणार आहेत आणि त्यांच्यासोबत ८ नवे कॉमेडियन असणार आहेत. या नव्या कोऱ्या सीझनचे वैशिष्टय असे की, या सीझनमध्ये सेलिब्रिटी विनोदवीर आणि पहिल्या पर्वाचे विजेतेदेखील सहभागी होणार आहेत. बुधवारी आणि गुरुवारी ही जोडी त्यांच्या स्क्रिप्टसह सादरीकरण करेल आणि यातूनच ठरेल ‘परफॉर्मन्स ऑफ द वीक’
कोणत्या जोड्या हास्य रिंगणात?
सेलिब्रिटी फॉरमॅटमध्ये समीर चौघुले- विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर- संदीप गायकवाड, श्याम- राजपूत- सुलेखा तळवळकर – अंशुमन विचारे, रोहीत चव्हाण- रसिका वेंगुर्लेकर, गौरव मोरे- वनिता खरात, श्रमेश बेटकर – प्रथमेश शिवलकर या जोड्या हास्य रिंगणात असणार आहे. मागच्या सीझनमध्ये असलेल्या जोड्या बऱ्याच गाजल्या. त्यामुळे या जोड्या आता काय कमाल करणार आहेत, ते पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. शिवाय या जोड्यांमधील कलाकार आधीच लोकप्रिय आहेत.
मागचा सीझन गाजला होता
महाराष्ट्राची हास्य जत्राचा पहिला सीझनदेखील खूप गाजला होता. आतापर्यंत अनेक मराठी हास्य शो येऊन गेले आहेत. मात्र असे असतानाही लगेच दुसरा सीझन घेऊन येणारा हा पहिलाच शो आहे. पहिल्या सीझनमध्ये प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर हे जज होते. तर या सीझनमध्ये पहिल्यांदाच महेश कोठारे जज म्हणून दिसणार आहेत. महेश कोठारे नक्की कशा प्रकारे या कलाकारांना दाद देणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. त्यामुळे यावेळचा सीझन नव्या जोड्या आणि नवे जज यांना प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळणार हे आता लवकरच कळेल.