दरवर्षी 2 ऑक्टोबरला संपूर्ण देशात गांधी जयंती साजरी केली जाते. तर संपूर्ण जगात हाच दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण 152 सालापूर्वी 2 ऑक्टोबर 1869 साली गुजरातमधील पोरबंदर येथे मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म झाला होता. ज्यांना आज जग महात्मा गांधी आणि भारताचे राष्ट्रपिता या रूपात ओळखते. दरवर्षी 2 ऑक्टोबरला भारतासोबतच जगभरातील अनेक देशांमध्ये महात्मा गांधी यांची जयंती साजरी केली जाते. या दिवशी ठिकठिकाणी रॅलीज, पोस्टर स्पर्धा, भाषणं, चर्चा आणि नाटक यासारख्या अनेक उपक्रमांचं आयोजन केलं जातं. या मागील मुख्य कारण म्हणजे आजही प्रभावी करणारे महात्मा गांधी यांचे विचार होय.
यंदा आपल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 152 वी जयंती आहे. जर या दिवसाच्या निमित्ताने तुम्हाला भाषण द्यायंच असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास आयडियाज सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे दर्शक आणि श्रोते भरपूर टाळ्या तर वाजवतीलच सोबत तुमचं भरपूर कौतुकही करतील. यासाठी महात्मा गांधी यांच्याबद्दलची माहिती ही वाचली पाहिजे.
गांधी जयंतीसाठी तुम्ही खालील विषयांवर भाषणाची तयारी करू शकता.
गांधी आणि सत्याग्रह
1906-07 मध्ये महात्मा गांधी यांनी दक्षिण अफ्रिकेमध्ये सत्याग्रह आंदोलनाला सुरूवात केली होती. हे आंदोलन दक्षिण आफ्रिकेमधील भारतीयांसाठी अनिवार्य पंजीकरण आणि पासच्या विरोधात त्यांनी पुकारलं होतं.
हरिजन आणि गांधी
आपल्या समाजात ज्या समुदायाच्या लोकांना हीन वागणूक दिली जात असे, त्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणजेच बापूंनी हरिजन असं नाव दिल. ज्या शब्दाचा अर्थ होता हरीची (देव) मुल. या एका पुढाकारामुळे त्या समुदायाच्या लोकांना सन्मानजनक जीवन मिळण्याच्या प्रयत्नासाठी एक मोठी भूमिका निभावली.
स्वातंत्र्य संग्रामातील अहिंसेची भूमिका
अहिंसा हा शब्द जेव्हा जेव्हा उच्चारला जातो तेव्हा सर्वात आधी समोर येणार नाव म्हणजे बापू होय. महात्मा गांधी यांनी ना फक्त भारत तर संपूर्ण जगाला अहिंसेचं महत्त्व समजावून सांगितलं. त्यांनी सांगितलं की, अहिंसा ही एक व्यक्तीगत सवय आहे ज्याचा अर्थ आहे, कोणत्याही परिस्थितीत स्वतःला किंवा दुसऱ्यांना नुकसान न पोचवणे.
बापू आणि भारत छोडो आंदोलन
महात्मा गांधी यांनी 8 ऑगस्ट 1942 ला इंग्रजांच्या विरोधात भारत छोडो आंदोलनाला सुरूवात केली होती. तेव्हा दुसरं विश्वयुद्ध सुरू होतं. या आंदोलनादरम्यान बापूंनी करो या मरो चा नारा दिला. विश्वयुद्ध समाप्त होताच ब्रिटीश सरकारने सांगितलं की, भारताला त्यांचे सर्व हक्क परत दिले जातील.
2 ऑक्टोबर – आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस
गांधी जयंतीची सर्वात खास गोष्ट म्हणजे हा एक दिवस असा आहे जो संपूर्ण जगात अहिंसा दिवसाच्या रूपात साजरा केला जातो. 15 जून 2007 ला युनायटेड नेशन्स जनरल असेंबलीने या तारखेला आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवसाच्या रूपात साजरा केला जाण्यासाठी सर्वांची सहमती मिळाली होती.
असं म्हणतात की, गांधीजींनी जगाला शिकवण दिली की, शांतीचा मार्ग आपलासा करून स्वातंत्र्य मिळवता येणं शक्य आहे. त्यांचं असं मानणं होतं की, हिंसेचा रस्ता हा चुकीचा असून यामुळे आपले अधिकार आपल्याला मिळू शकत नाहीत. अहिंसेच्या मार्गावर चालणाऱ्या राष्ट्रपित्याने दक्षिण आफ्रिकेत जवळपास 75 हजार भारतीयांना त्यांचा अधिकार मिळवून दिला.
मोहनदास करमचंद गांधी पासून राष्ट्रपित्यापर्यंतचा प्रवास
जो व्यक्ती बॅरिस्टर बनून वकिलीच्या प्रॅक्टीससाठी दक्षिण आफ्रिकेला गेला होता. तो मोहनदास करमचंद गांधी होता. पण त्यांची विचारधारा आणि लोकांच्या हक्कासाठी लढाई लढणाच्या त्यांच्या पद्धतीमुळे त्यांना राष्ट्रपिता आणि महात्मा ही उपाधी देण्यात आली.
ते सन 1900 च्या सुरूवातीला भारतीय प्रवासी बनून वकिलीसाठी दक्षिण आफ्रिकेला गेले होते. मग पहिल्या विश्वयुद्धांपर्यंत भारत आणि भारतीयांच्या हक्काच्या लढाईसाठी नेतृत्व बनून नावारूपास आले. मग आपल्या मायदेशी परत आले आणि शेवटच्या श्वासांपर्यंत त्यांनी आपल्या विचारधारेच्या बळावर दुसऱ्यांशी लढाई लढत राहिले.
भाषण देण्याची पद्धत
भाषणामध्ये काय बोलायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. पण त्याहूनही जास्त महत्त्वाची आहे ती भाषण देण्याची पद्धत. त्यामुळे एक दिवस आधी आरश्यासमोर उभं राहून आपल्या भाषणाची प्रॅक्टीस करा. प्रयत्न करा की, तुम्हाला कागदावरून वाचून भाषण द्यावं लागणार नाही. लोकांच्या डोळ्यात पाहून पूर्ण आत्मविश्वासाने योग्य आवाजाच्या पट्टीत आणि मॉड्यूलेशनसोबत भाषण द्या. कोणत्याही वाक्यामध्ये कुठे विराम घ्यायचा आहे, कोणतं वाक्य लांब आहे, याकडेही लक्ष द्या.