मकरसंक्रांतीला तुम्ही नेहमीच तिळाचे लाडू, गुळाची पोळी, तिळाच्या वड्या आणि काटेरी हलवा यांचा आस्वाद घेतला असेल. पण हे मकरसंक्रातीला नेहमी करण्यात येणारे महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत. तुम्ही कधी मकरसंक्रांतीला तिळगूळ, ऊस, पोहे किंवा हिवाळ्यात येणाऱ्या ताज्या भाज्यांचा वापर करून एखादी वेगळी डीश करून पाहिली आहे का? जर तुमची या मकरसंक्रातीला पारंपारिक, झटपट आणि हटके डीश करण्याची इच्छा असेल तर आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी खास संपूर्ण भारतात मकरसंक्रातीच्या निमित्ताने करण्यात येणाऱ्या रेसिपीजची माहिती आणि त्यातील काही झटपट रेसिपीजचा खजाना…
दिवाळीप्रमाणेच फक्त महाराष्ट्रातच नाहीतर उत्तर भारत, दक्षिण भारत आणि पश्चिम भारतातही मकरसंक्रांत विशेष सण म्हणून साजरी केली जाते. दरवर्षी हा सण साधारणतः 14 जानेवारीला साजरा केला जातो. या दिवशी सूर्य मकर राशींमध्ये प्रवेश करतो, त्यामुळे शास्त्रांमध्ये या सणाला खास महत्त्व आहे. प्रत्येक ठिकाणी हा सण वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. पंजाबमध्ये लोहडी, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये संक्रांत, आसामध्ये माघ बिहू, कुमांऊमध्ये घुघुतिया, तर उडीसा,बिहार आणि झारखंडमध्ये मकरसंक्राती नावानेच हा सण साजरा केला जातो. सणाच्या विविध नावांप्रमाणेच प्रत्येक ठिकाणी या सणाच्या निमित्ताने बनवण्यात येणाऱ्या पदार्थांमध्येही विविधता आढळते. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही संदेशही द्या आणि मकर संक्रांतीचा सण साजरा करा.
भारताच्या पूर्वोत्तर आणि उत्तर राज्यांमध्ये मकर संक्रांतीच्या निमित्ताने दही-चूडा खाण्याची परंपरा आहे. या सणाच्या निमित्ताने राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दही-चूडा भोज आयोजित करण्यात येतात. खिचडी आणि दही-चूडा यांचा आस्वाद तुम्ही या सणाच्या निमित्ताने प्रत्येक घरी घेऊ शकता. पाहूया कसा करतात दही-चूडा. सविस्तर रेसिपी खाली वाचा.
Also Read Bornahan In Makar Sankrati In Marathi
मणिपुरमध्ये मकर संक्रांतीच्या सणाला बनवण्यात येणारी डीश आहे कांगसुबी. कांगसुबी हा पदार्थ तीळ आणि उसाच्या रसाने तयार करण्यात येतो. ही डीश बेक करून बनवली जाते आणि नंतर छोट्या छोट्या तुकडे करून ती वाढली जाते.
लोहडीशिवाय पंजाबमधील कोणताही सण अपूर्ण आहे. पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर ऊसाची शेती होते. याच ऊस आणि भाताची खीर मकरसंक्रांतीला त्यामध्ये सुकामेवा घालून बनवली जाते.
मकरसंक्रांतीच्या सणाला खिचडीला फार महत्त्व आहे. बटाटा, मटार, फ्लॉवर, गाजर आणि कोवळे हरभऱ्याचे दाणे यांसारख्या या मौसमात बाजारात येणाऱ्या भाज्या घालून ही खिचडी बनवण्यात येते. देवाला या खिचडीचा नैवेद्य दाखवण्यात येतो. अनेक मंदिरांमध्ये या निमित्ताने प्रसाद म्हणून भंडाऱ्यामध्ये खिचडी केली जाते. ज्याची चव अप्रतिम असते.
बंगालमध्ये मकरसंक्रांतीला पौष संक्राती नावाने साजरे केले जाते. या सणाला खास गोकुल पीठे हा पदार्थ बनवला जातो. खोवलेला नारळ आणि गुळाचे छोटेछोटे गोळे बनवून ते हाताने चपटे थापून तळलं जातं.
मध्यप्रदेशमध्ये मकरसंक्रांत हा सण गजकचा आस्वाद घेऊन साजरा केला जातो. तीळ, काजू आणि शेंगदाणे, तूप आणि साखरेपासून बनवलेलं गजक हे फक्त चवीलाच नाहीतर हिवाळ्यात खाण्यासाठी ही उत्तम आहे.
ओडिशामध्ये लोक संक्रातीला मकर चौला हा पदार्थ बनवून साजरी करतात. तांदळाच्या पीठात, खवलेला नारळ, दूध, पिकलेलं केळ, आलं, साखर, पनीर, तिखट आणि डाळिंबाचे दाणे मिक्स करून हा पदार्थ तयार केला जातो. हा पदार्थ खास प्रसाद म्हणून वाटण्याची परंपरा आहे. सविस्तर रेसिपी खाली वाचा.
खास गूळपोळीचा आस्वाद घेण्यासाठी मकरसंक्रांतीच्या सणाला महाराष्ट्राला अनेक भारतीय भेट देत असतात. गूळ, तिळ, खसखस आणि बेसन यांचं मिश्रण गहू आणि मैदाच्या कणकेने पोळी बनवली जाते. गरमागरम गूळपोळी आणि त्यावर छान तूपाची धार असा खास बेत मकरसंक्रातीला असतो.
उत्तराखंडमधील कुमाऊंनीमध्ये मकरसंक्रांती थोड्या वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. उत्तराखंडमध्ये मकरसंक्रातीला घुंघटीया नावाने ओळखले जाते आणि या निमित्ताने खास घुंघूटे हा पदार्थ बनवण्यात येतो. गव्हाचं पीठ आणि गुळापासून तयार करण्यात येणारा हा पदार्थाला वेगवेगळ्या आकारात बनवलं जातं. जे दिसायला फारच आकर्षक असतं. नंतर तेलात तळून याचा हार तयार केला जातो. मुलं हा हार घालून मग त्यातील एकएक घुंघूटा पक्षांना खाऊ घालतात. असं म्हणतात की, या काळात दुसऱ्या राज्यातील स्थलांतर करून येणाऱ्या पक्ष्यांचं स्वागत करण्यासाठी असं करण्यात येतं.
कन्नड संस्कृतीमध्ये संक्रांतीला महत्त्व असतं ते ईलू म्हणजे गूळ आणि तिळाचं मिश्रण(sesame-jaggery mix), साखरफुटाणे आणि ऊस. येल्लू किंवा ईला म्हणजे तिळ (sesame seeds), बेला म्हणजे गूळ. तीळ आणि गुळाच्या मिश्रणात कर्नाटकात सुकं खोबरं आणि शेंगदाणे घालून मित्रपरिवार, शेजारी आणि नातेवाईकांना दिलं जातं. महाराष्ट्राप्रमाणेच कन्नडमध्येही ईल्लू,बेल्ला टींडू, ओल्ले माताडी म्हणजेच तीळगूळ घ्या आणि गोड बोला असं बोलायची प्रथा आहे.
हिवाळा म्हंटल्यावर बेत नक्की होतो तो म्हणजे उंधियो करण्याचा. उंधियो ही खासियत आहे गुजरातच्या खाद्यपरंपरेतली. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने गुजरातमध्ये या मौसमात उपलब्ध असलेल्या भरपूर भाज्या वापरून उंधियो बनवला जातो. उंधियोची चव अजून छान लागावी म्हणून हा खास माती्च्या मडक्यात बनवला जातो. ही भाजी खास गरमागरम पुऱ्या किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर वाढली जाते. जर तुम्ही संक्रांतीला गुजरातला भेट देणार असाल तर उंधियो चाखायला विसरू नका.
बिहारमध्ये रामदाण्याचा लाडू ही मकरसंक्रांतीची खासियत असते. रामदाणे म्हणजे राजगिरा, वेलची पूड आणि गुळापासून बनवलेला लाडू. सविस्तर रेसिपी खाली वाचा.
तिळाचे लाडू हे भारतभर मुख्यतः मकरसंक्रांतीला बनवण्यात येतात. याच दरम्यान बिहार आणि झारखंड राज्यातही हे लाडू घरोघरी बनवले जातात. या सणाला मिठाईच्या दुकानात इतर मिठायांपेक्षा तिळाच्या लाडूंना जास्त मागणी असते. काही ठिकाणी तिळाचे लाडू साखरेच्या पाकात तर काही ठिकाणी गुळाच्या पाकात बनवले जातात. हे दोन्ही प्रकारचे लाडू चवीला उत्तम असतात.
अप्पालू ही मकरसंक्रांतीला बनवण्यात येणारी डीश आहे. आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये बनवण्यात येणारी ही डीश आहे. गहू आणि तांदळाच्या पीठात गूळ घालून ही डीश बनवली जाते. गहू, तांदूळ आणि गूळ मिक्स करून त्याच्या पीठाचे हाताने हलकं दाबून चपटे पुऱ्या करून ते तेलात तळतात. फक्त या तीन पदार्थांनी बनवण्यात येणाऱ्या या पदार्थाची चव अप्रतिम असते. हा पदार्थ खाण्याआधी देवाला नैवेद्य किंवा भोग म्हणून दाखवला जातो.
घेवर हा गोड पदार्थ राजस्थानची खासियत आहे. घेवर हा पदार्थ तीन प्रकारात उपलब्ध आहे, साधा घेवर, मावा घेवर आणि मलाई घेवर. हा पदार्थ बनवताना गव्हाच्या पीठाचं आणि दूधाचं मिश्रण करून त्याला तूपाच्या फोडणीत शिजवलं जातं. त्यानंतर घेवर साखरेच्या पाकात बूडवून सुका मेव्याने सजवून सर्व्ह केलं जातं.
आपण संपूर्ण भारतात मकरसंक्रांतीनिमित्त करण्यात येणारे विविध पदार्थ पाहिले. आता यातील काही झटपट बनवता येतील अशा रेसिपीज पाहूया
जर तुम्हाला तिळाचे लाडू किंवा गूळपोळी बनवण्यासाठी वेळ मिळाला नसेल तर हरकत नाही. या मकरसंक्रांतीला करून पाहा झटपट आणि पौष्टीक दही चूरा.
साहित्य :1/2 कप पातळ पोहे
1 कप दही
1/2 कप ताजी फळ (द्राक्ष, डाळिंब आणि केळ यांसारखी फळं तुम्ही घेऊ शकता.)
2 छोटे चमचे दूध
ब्राऊन शुगर/मध/मॅपल सिरप/गूळ स्वादानुसार
कृती : चाळणीमध्ये पोहे घेऊन ते वाहत्या पाण्याखाली चांगले धूवून घ्या. त्यानंतर पाणी निथळून घ्या. आता या पोह्यांमध्ये 2 चमचे दूध मिक्स करा. पोहे 15-20 मिनट दुधात भिजू द्या. हा पदार्थ बनवण्यासाठी शक्यतो पातळ पोह्यांचा वापर केला जातो. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जाडे पोहेही वापरू शकता.(जाडे पोहे घेतल्यास ते दूधात किमान अर्धा तास भिजू द्या). पोह्यांमध्ये दही, गूळ किंवा मध चांगला मिक्स करून घ्या. आता चिवडा म्हणजेच पोहे आणि ताजी फळ एकत्र सर्व्ह करा.
सर्व्ह करताना – काचेच्या ग्लासात आधी ताजी फळ आणि त्यावर दही मिक्स केलेले पोहे आणि आवडीनुसार ब्राऊन शूगर घाला, मग परत ताजी फळ आणि पोह्यांचा लेयर करा. नंतर ताज्या फळांनी सजावट करा. तुम्हाला आवडत असल्यास मेपल सिरप आणि मधसुद्धा यावर घालू शकता.
ओरिसामध्ये मकरसंक्रांतीच्या निमित्ताने मकर चौला हा पदार्थ घरोघरी करण्यात येतो.
साहित्य : अर्धा कप पांढरा भात,
1 कप दूध ,
चार ते पाच चमचे खोवलेला नारळ,
तीन ते चार उसाचे तुकडे,
1 पिकलेलं केळ,
साखर,
काळमिरं पावडर अर्धा चमचा,
आवडीनुसार ताजं पनीर ,
1 चमचा किसलेलं आलं,
100 ग्रॅम डाळिंबाचे दाणे
तांदूळ रात्रभर भिजवून ठेवा. त्यानंतर तांदूळातील पाणी निथळून ठेवा. एका डिशमध्ये पसरून तो सूकू द्या. रात्रभर भिजवलेला भात सुकण्यास साधारण 2-3 तास लागतात. भात सुकल्यावर मिक्सरमधून बारीक रवाळ वाटून घ्या. त्यानंतर भातात केळ्याशिवाय इतर सर्व साहित्य मिक्स करा. सर्वात शेवटी केळं सोलून आणि कुस्करून त्या मिश्रणात घाला आणि डाळिंब्याच्या दाण्यांनी सजावट करा.
रामदाना म्हणजेच राजगिऱ्याचा लाडू बिहारमध्ये फारच पवित्र मानला जातो. राजगिऱ्याचा वापर उपावासाच्या पदार्थांमध्येही केला जातो. पाहूया या लाडूची रेसिपी
साहित्य : 1 कप राजगिरा, जेवढा राजगिरा तेवढ्याच मापाचा गूळ आणि तूप.
कृती : रामदाणे म्हणजेच राजगिरा धूवून आणि सूकवून घ्या.नंतर जाड बुडाच्या कढई घेऊन मोठ्या आचेवर तापवा. कढई गरम झाल्यावर राजगिरा घालून तो फूलू द्या. कढई चांगली गरम झाली असेल तरच राजगिरा फुलेल. जर कढई जास्त तापल्यासारखी वाटल्यास गॅस बारीक करावा. अशाप्रकारे राजगिरा भाजून घ्या. जो राजगिरा फुलला नसेल तो चाळणीने चाळून घ्या. आता एका तव्यात एक चमचा तूप, 2 चमचे पाण्यात गूळ तोडून घाला. तो चांगला शिजू द्या, मधेमधे पळीने हलवत राहा. जेव्हा दोन तारेचा पाक तयार होईल तेव्हा त्यात राजगिरा घाला. चांगलं मिक्स करून घ्या आणि गरम असतानाच लाडू वळायला घ्या. दोन्ही तळहातांना थोडं पाणी लावून मग लाडू वळा. हे लाडू हवाबंद डब्यात ठेवल्यास भरपूर दिवस चांगले राहतात.
मग या गुलाबी थंडीत नक्की करून पाहा हे वेगळे आणि पौष्टीक पदार्थ. सर्वांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगूळ घ्या आणि गोडगोड बोला.
फोटो सौजन्यः Instagram