भारतात वर्षभर सतत कोणते ना कोणते सण साजरे होत असतात. उत्सव, उत्साह हा इथल्या मातीत अगदी आनंदाने भारलेला असतो. सण कोणताही असो आनंद वाटण्याचा, एकमेकांना स्वीकारण्याचा आणि सुखदुःख वाटून घेण्याचा हंगाम म्हणजे हे सण असतात. आपल्या घरात सण साजरे करण्यासाठी आपण अनेक वस्तूंची खरेदी करत असतो. पण या वस्तूंना पर्यावरणाला हानी तर पोहचत नाही ना याचा विचार फारच कमी लोक करतात. आता नुकतीच दिवाळी पार पडली आहे आणि आता पुढचा साजरा करण्याचा सण येईल तो म्हणजे ख्रिसमस आणि नवीन वर्ष. उत्साहाच्या भरात आणि पर्यावरणावर नक्की काय परिणाम होतोय हे पाहायला मात्र विसरतो. पण हे विसरून अजिबात चालणार नाही. तुम्ही 5 सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्यात तर निसर्गाला हानी न पोहचवता आपण नक्कीच कोणताही सण आणि कोणतेही घरातील सेलिब्रेशनही अत्यंत चांगलेपणाने साजरे करू शकतो. त्यासाठी नक्की काय करायला हवे याबाबत आम्ही बेकोचे सहसंस्थापक अनुज रूईया यांच्याकडून अधिक जाणून घेतले. तुम्हालाही याचा नक्कीच फायदा होईल.
इको फ्रेंडली पर्यायांचा करा वापर
प्रत्येक सणामध्ये एक गोष्ट आपल्या सर्वांकडे सामाईक असते ती म्हणजे आपल्याकडे येणारे आपले आप्तमंडळी. प्रियजनांच्या भेटीशिवाय कोणाला सण साजरे करायला आवडतील? पाहुणे येतात तेव्हा अनेक गोष्टी घेऊन येतात आणि त्यात प्लास्टिकच्या पिशव्या अधिक प्रमाणात असतात. सणांच्या वेळी कंपोस्टेबल कचरा पिशव्या आणि पुन्हा वापर करता येण्याजोग्या पिशव्यांचा वापर करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा आपण एखाद्या गोष्टी खरेदी करतो तेव्हा पर्यावरणाला पूरक असणाऱ्या अशा गोष्टींची खरेदी तुम्ही करायला हवा. त्यामुळे जास्तीत जास्त कागदी पिशव्यांचा वापर करा अथवा घरातील कापडाच्या पिशव्या तुम्ही वापरा.
फटाक्यांपासून राहा दूर
कोणताही सण म्हटला की फटाके आणि आतषबाजी आपल्याकडे नेहमीच केली जाते. मात्र सहसा कोणत्याही कार्यक्रमांना फटाक्यांपासून दूरच राहा. यामुळे पर्यावरणाला हानी पोहचते. प्रदूषण वाढवायचे नसेल तर कोणत्याही सणाला तुम्ही साजरे करतेवेळी फटाक्यांचा आधार न घेतलेलाच बरा. यावर्षी दिवाळीत असेही फटाके फारच कमी प्रमाणात फोडलेले पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे आता बऱ्याच जणांचा विचारही बदलताना दिसून येत आहे. दिव्यांच्या रोषणाईने तुम्ही आपले घर अधिक झगमगवा आणि पर्यावरणाला हानी न पोहचवता कोणताही सण साजरा करा.
नेहमी ऑर्गेनिक रंगाचा करा वापर
दिवाळीची रांगोळी असो अथवा होळीचे रंग तुम्ही यावर्षी ऑर्गेनिक रंगाचा वापर या सणांसाठी करा. नैसर्गिक आणि ऑर्गेनिक रंग हे केमिकलविरहीत असतात. त्यामुळे त्याचा ना पर्यावरणाला त्रास होत ना तुमच्या त्वचेला. त्यामुळे सहसा असेच रंग वापरण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही असे रंग तांदळाचे पीठ, जास्वंदाची पाने, संत्र्यांची साले, हळद पावडर, डाळी, गुलाबाची पाने आणि अनेक पर्यायांमधून मिळवू शकता. याचा उपयोग करून तुम्ही पर्यावरणाची हानी करणे टाळू शकता.
काळजीपूर्वक खरेदी करा
बरीच कुटुंबं ही सणांच्या वेळी नव्या कपड्यांची खरेदी करतात. पण अशाच कपड्यांची खरेदी करा जे पर्यावरणासाठी पूरक असतील. बरेच कपडे तुम्ही रिसायकलिंगसाठी वापरू शकता. आजकाल कपड्यांची खरेदी करताना त्यावर तुम्हाला त्याची योग्य माहिती देण्यात आलेली असते. अनेक कॉटनचे कपडे हे इको-फ्रेंडली असतात. त्यामुळे तुम्ही अशाच कपड्यांची खरेदी काळजीपूर्वक करायला हवी. जेणेकरून कोणालाही हानी पोहचणार नाही. नायलॉन अथवा पॉलिस्टरसारख्या कपड्यांपासून लांब राहणेच चांगले.
रॅपिंग ट्रिक
गिफ्ट्स कोणाला आवडत नाहीत? त्यातही पॅक करून देण्यात आलेले गिफ्ट्स तर आपल्याला अधिक भावतात. पण प्लास्टिक पेपर्स, रिबन्स याचा वापर करण्यापेक्षा तुम्ही कागदी पिशव्या अथवा कागदी रॅप पेपरचा वापर केल्यास अधिक सुंदर पण दिसते आणि त्याचा पर्यावरणासाठी उपयोगही होतो. तसंच तुम्ही पुनर्वापर करता येणाऱ्या काही गोष्टींचा वापर करूनही गिफ्ट्सच्या रॅपिंगचा वापर करू शकतो. तसंच तुम्ही नैसर्गिक रॅपिंगसाठी फुलांचाही वापर करू शकता.
यापुढील येणाऱ्या सणांसाठी तुम्हाला नक्की कसं वागायचं आहे ते तुम्ही नक्कीच ठरवा. पण आपल्या पर्यावरणाची काळजी घेणे हे आपल्याच हातात आहे हेदेखील लक्षात घ्या.