हसायला आणि पोट धरुन हसायला कोणाला आवडणार नाही? तुम्हाला खळखळून हसवायलाच एक मजेदार चित्रपट भेटीला येणार आहे. येत्या १७ जूनला ‘भिरकीट’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या धमाल चित्रपटाचा धमाल ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. हा पाहिल्यानंतर तुम्हाला खळखळून हसल्यावाचून राहता येणार नाही.प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन कऱण्यासाठी हा मस्त चित्रपट तयार करण्यात आला असून या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार भेटीला येणार आहेत. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत अभिनेते गिरीश कुलकर्णी, कुशल बद्रिके, सागर कारंडे दिसणार असून त्यांची भूमिका या चित्रपटात फारच वेगळी आहे असे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही अद्याप पाहिला नसेल तर तो नक्की पाहायला हवा.
ट्रेलर आहे एकदम झक्कास
चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर यामध्ये धम्माल कॉमेडी असणार आहे याचा अंदाज येतो. गिरीश कुलकर्णी याने या चित्रपटात तात्याची भूमिका साकारली आहे. घरात ज्येष्ठ माणसाचा मृत्यू झाल्यानंतर घरी येणारे वेगवेगळे पाहुणे, उडणारी धमाल यात पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये लव्हस्टोरी शिजताना दिसत असली तरी ट्रेलरच्या शेवटी एक मोठा धडा देण्यात आला आहे. तो कोणता हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपटाची थोडे दिवस वाट पाहावी लागणार आहे.
उडणार हास्याचे फवारे
चित्रपटात सागर कारंडे आणि कुशल बद्रिके असणार म्हटल्यावर हास्याचे फवारे तर उडणारच ना? या दोघांनाही अनेकदा चला हवा येऊ द्या मध्ये पाहिलेले आहेत. त्यांचा हास्यकल्लोळ आपण पाहिलेला आहे. या चित्रपटात हे दोघे असल्यामुळे हास्याचे फवारे उडणार यात काही शंका नाही. पण त्यांच्या जोडीला असलेले ऋषिकेश जोशी, तानाजी गालगुंडे यांना देखील आपण विनोदी भूमिका साकारताना पाहिले आहे. त्यामुळे हा चित्रपट एकदम वेगळा आणि मराठी प्रेक्षकांसाठी खास असणार आहे.
“ या चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील अनेक विनोदवीर आहेत, ज्यांनी आजवर अवघ्या महाराष्ट्राला आपल्या अभिनयाने हसवले आहे. या चित्रपटातील प्रत्येक विनोदवीराची अनोखी विनोदशैली आहे. त्यांच्या हसवण्याच्या तऱ्हा वेगवेगळ्या आहेत. प्रत्येकाचे हसवण्याचे आपापले वेगळे टाईमिंग आहे आणि हे असे वेगवेगळे विनोदवीर एकत्र ‘भिरकीट’मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे हास्याचे जबरदस्त पॅकेज आपल्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक ज्यावेळी विरंगुळा म्हणून चित्रपटगृहात एखादा चित्रपट पाहायला जातो, तेव्हा त्याला निव्वळ मनोरंजन हवे असते, अशा वेळी ‘भिरकीट’ त्यांच्या या अपेक्षा नक्कीच पूर्ण करेल. प्रेक्षक केवळ हसणारच नाही तर त्यातून एखादा संदेशही घेऊन जातील.
आता अगदी थोड्याच काळााची प्रतिक्षा आहे. हा चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे.