Advertisement

अॅक्सेसरीज

मालिकांमुळे प्रसिद्ध झाल्या मंगळसूत्रांच्या ‘या’ डिझाईन्स

Leenal GawadeLeenal Gawade  |  Jan 18, 2019
मालिकांमुळे प्रसिद्ध झाल्या मंगळसूत्रांच्या ‘या’ डिझाईन्स

Advertisement

एखादी मालिका आली की मग त्या मालिकेतील प्रत्येक गोष्टी अगदी बारकाईने टिपल्या जातात. बारकाईने टिपण्यासारख्या गोष्टी म्हणजे नायिकांचे कपडे, त्यांचे केस आणि त्यांनी घातलेले दागिने…हा आता  दागिने म्हटले की, साहजिकच महिलांच्या भुवया उंचावतात. कारण दागिने हा महिलांचा हळवा कोपरा आहे नाही का? गेल्या काही मालिकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या गोष्टी लगेचच बाजारात उपलब्ध होतात. आता सांगायचेच झाले तर नायिकांनी नेसलेल्या साड्या यात अग्रक्रमावर असतात. जान्हवी साडी, पुढचं पाऊल साडी, सरस्वती साडी, राधिका साडी अशी काही नाव त्यांना मालिकांमुळेच पडतात. त्यातच हल्ली नायिका वापरतात ती मंगळसुत्रे ही सर्वाधिक चर्चेचा विषय ठरतात. त्यानुसारच मंगळसुत्रांचे ट्रेंड हल्ली बाजारात आलेले दिसतात.अशाच काही मंगळसुत्रांच्या डिझाईन्स खास तुमच्यासाठी… बघा तुम्हाला यापैकी कोणती डिझाईन आवडते.

ईशा मंगळसूत्र

मराठी मालिकांमध्ये सध्या चर्चा सुरु आहे ती एकाच जोडीची ती म्हणजे ईशा आणि विक्रांत सरंजामेची. नुकतचं त्याचं मालिकेत लग्न झाले. श्रीमंत विक्रांत सरंजामेच्या बायकोचे दागिनेही तितके खास असणार असा अंदाज प्रेक्षकांना होता. कारण मालिकेत त्यांचे दाखवण्यात आलेले रॉयल वेडिंग. त्यामुळे ईशाच्या मंगळसुत्राच्या डिझाईनची उत्सुकता सगळ्यांना होती.  ईशाचे मंगळसूत्र त्यामानाने अगदीच साधे आहे. म्हणजे मंगळसूत्राला दोन वाट्या आहेत. पण त्या वाट्यांवर गुलाबी खड्यांची पट्टी आहे. मंगळसूत्राच्या नाजूक वाट्या हिरेजडीत आहेत आणि मंगळसूत्र एका सरीचे आहे. सध्या तरी ईशाचे हे मंगळसूत्र साधे वाटत असले तरी थोडे वेगळे आहे. लग्नावेळी इशाच्या गळ्यात आणखी वेगळे मंगळसूत्र होते. पण लग्नानंतरच्या एपिसोडमध्ये तिच्या गळ्यात हे नाजूक मंगळसूत्र दिसत आहे. आता ईशाच्या गळ्यात हेच मंगळसूत्र असणार की, याची डिझाईन बदलणार हे मालिकेतून कळेल.

isha-mangalsutra-1

राधिका मंगळसूत्र

३०० कोटींचा मसाला विकणारी मसाला क्वीन राधिका आपटे म्हणेच माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील राधिकाचे मंगळसूत्रही वेगळे आहे. ती मसाला क्वीन होण्याआधी तिचे मंगळसूत्र अगदी साधे होते. पण आता तिचे मंगळसूत्रही ट्रेंडी दाखवण्यात आले आहे. सिंगल सरीच्या मंगळसूत्राला वाट्या नाहीत त्यामध्ये त्रिकोणी आकाराचे ट्रेंडी पेडंट आहे जे सोन्याचे नाही. त्याला आणखी चांगला लुक येण्यासाठी  काळ्या सरीसोबत पेंडंट शेजारी मोती गुंफण्यात आले आहे. साधे पण अगदी क्लासी वाटणारे हे मंगळसूत्र घरी कसे बनवता येईल यासाठी अनेकांनी व्हिडिओदेखील तयार केले आहेत. अर्थात आता तुम्हाला या मंगळसूत्राची क्रेझ कळालीच असेल.

anita date as a radhika

जान्हवी मंगळसूत्र

‘काही हा श्री’ म्हणत प्रेक्षकांच्या मनात  सून मी या घरची या मालिकेने जागा मिळवली. त्याहीपेक्षा वेड लावले ते या मालिकेच्या नायिकेतील मंगळसूत्राने. जान्हवी अर्थात तेजश्री प्रधानने मालिकेतील लग्नानंतर तीन सरींचे जे मंगळसूत्र घातले ते महिलांच्या पसंतीला भारीच उतरले. काळ्या मण्यांचे तीन सरींचे मंगळसूत्र प्रत्येक सरींमध्ये एक मुहूर्तमणीसारखा गोल मणी… हे तीन सरींचे मंगळसूत्र इमिटेशन ज्वेलरीपासून सोन्यातही विकत मिळू लागले. शिवाय या मंगळसूत्राच्या आणखी व्हरायटीही बाजारात आल्या आणि अजूनही अशा प्रकाराची मंगळसूत्रे बाजारात पाहायला मिळतात. या मंगळसूत्राची क्रेझ बरीच वर्षे टिकून आहे. या मालिकेच्या कालावधीत ज्यांची लग्ने झाली त्यापैकी बऱ्याच नववधूंची मंगळसूत्र याच डिझाईन्समध्ये होती.

वाचा – टॉप 10 ट्रेंडी स्टायलिश ब्लाऊज बॅक डिझाईन

janhavi mangalsutra

सरस्वती मंगळसूत्र

मालिका या ट्रेंड कशा बदलत असतात त्याचे आणखी एक उदाहरण म्हणजे सरस्वती मंगळसूत्र. सरस्वती मालिकेतील नायिका तिच्या नावाप्रमाणे  सरस्वतीचे पेंडंट असलेले मंगळसूत्र ती घालते. मंगळसूत्रातील पेंडंटचा हा प्रकार अगदीच नवीन आहे. त्यामुळे हे मंगळसूत्र अनेकांनी वापरुन पाहिले. मालिकेत सरस्वतीच्या गळ्यालगत हे मंगळसूत्र आहे. १ आकड्यापासून तयार करण्यात आलेली सरस्वती आपण अनेकदा पाटीवर, फळ्यावर  रेखाटली असेल. पण या डिझाईनमध्ये मंगळसूत्र येईल असे कधीच कोणाला वाटले नसेल हो ना ? गोल्डन आणि सिलव्हर अशा दोन्ही पॅटर्नमध्ये हे मंगळसूत्र उपलब्ध आहेत. सरस्वतीच्या गळ्यातील हे मंगळसूत्र एकदम हटके आहे आणि खरेच ते घातल्यावर चांगले दिसते. थोडंसं मोठ पेंडंट असल्यामुळे कदाचित ते तुम्हाला वेगळं वाटेल. पण ते नक्कीच वेगळे आणि हटके आहे त्यामुळे काहीतरी नवीन ट्राय करायला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अशा प्रकारचे मंगळसूत्र घालून पाहू शकता.

titeekshaa tawade saraswati

बेला मंगळसूत्र

नुसत्याच मराठी मालिका नाही तर हिंदी मालिकांमधील दागिनेही तितक्याच चर्चेचा विषय ठरतात. सध्या सुरु असलेली नागिन ३ ही मालिका सर्वाधिक पाहिली जाते. या मालिकेतील नायिका बेला अर्थात सुरभी ज्योती ही देखील तिच्या फॅशनेबल अवतारामुळे खूपच प्रसिद्ध आहे.  तिच्या साड्यांपासून ते तिच्या दागिन्यांपर्यंत अनेक गोष्टींकडे लोकांचे बारीक लक्ष असते. तिचे मंगळसूत्र हे नोकरी करणाऱ्या महिलांना आवडण्यासारखे आहे. नाजूक एका सरीचे मंगळसूत्र आणि वाटीच्या जागी एक गोल अमेरिकन डायमंड त्या ठिकाणी आहे. गळ्यालगत  हे मंगळसूत्र आहे. त्यामुळे ज्यांना वाट्यांचे टिपिकल मंगळसूत्र आवडत नाही. त्यासाठी हा चांगला पर्याय आहे. शिवाय वेस्टर्न, ट्रेडिशनल अशा कोणत्याही कपड्यांवर हे मंगळसूत्र चांगले दिसते. म्हणून हल्ली बाजारात इमिटेशन ज्वेलरीच्या प्रकारात असे मंगळसूत्र पाहायला मिळतात. बेलाच्या मंगळसूत्राच्या एक पाऊल पुढे जात पांढऱ्या डायमंडच्या जागी मल्टीकलर स्टोनमध्ये देखील हे मंगळसूत्र मिळते. अशाच पद्धतीचे मंगळसूत्र मौनी रॉयने नागीनच्या आधीच्या सीझनमध्ये घातले होते.या मालिकेतील दागिने जितके प्रसिद्ध आहेत. तितकेच या मालिकेत काम करणाऱ्या अनिता हसनंदानी हिचे ब्लाऊजही प्रसिद्ध आहेत.

surbhi jyoti

वाचा- अनिता हसनंदानीचे असेच एकापेक्षा एक डिझाईन्सचे ब्लाऊज

अनिका मंगळसूत्र

इश्कबाज या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारी सुरभीचंद्रा अर्थात मालिकेतील अनिका ओबेरॉय हिचे मंगळसूत्रदेखील वेगळे होते. एका सरीच्या मंगळसूत्राला कुंदनचे पेंडंट होते. दोन पानाच्या आकाराचे आणि मध्ये गोल आकाराचे असलेले कुंदन अशा पद्तीने सेट करण्यात आले आहे की, हे मंगळसूत्र वेगळे दिसते. अनिका ओबेरॉयमुळे हे मंगळसूत्र जास्त प्रसिद्ध झाले आहे. कुंदनमधील मंगळसूत्राचा हा प्रकार मालिकेमुळेच पुढे आला. सोन्यात नाही पण इमिटेशन ज्वेलरीमध्ये या मंगळसूत्राचा प्रकार अधिक पाहायला मिळत आहे. शिवाय कुंदन हा असा प्रकार आहे जो कधीच ट्रेंडच्या बाहेर जात नाही. आता अनिकाच्या मंगळसूत्रातील कुंदनचा आकार पाहिला तर तो अगदी लहान आहे. पण यामध्ये मोठ्या सरीचे मंगळसूत्रदेखील आहे. तेही या मंगळसूत्राला पाहून तयार करण्यात आले आह.या मालिकेचा पहिला भाग नुकताच संपला आणि दुसरा भाग सुरु झाला आहे. पण या मालिकेचा फॅन फॉलोवर्स आणि सुरभीचंद्राचा फॅन फॉलोवर्स असल्याने या मंगळसूत्राची अधिक चलती आहे.  

anika mangalsutra 

नवरीसाठी दागिने खरेदी करताय मग तर तुम्ही हे पाहायला हवे.

इशिता मंगळसूत्र

‘ये हे मोहब्बते’ ही मालिका देखील खूप प्रसिद्ध आहे. इशिताचे काम करणारी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीही सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. तिच्या प्रत्येक गोष्टी या तिचे फॅन्स फॉलो करत असतात. तिचे मंगळसूत्रही त्यामुळेच खूप खास ठरले. साधारण एका सरीच्या मंगळसूत्राचा असलेला ट्रेंड सगळीकडेच आहे. दिव्यांका त्रिपाठीचे म्हणजेच इशिताचे मालिकेमधील मंगळसूत्र  एक सरीचे आहे. मंगळसूत्राचे पेंडट खड्यांचे असून त्याचा आकार पानासारखा आकार पानासारखा आणि त्याच्याखाली एक छोटासा मोती आहे. त्यामुळे हे मंगळसूत्र एकदम वेगळे आणि उठून दिसते. खड्यांच्या पेंडंटमधील मंगळसूत्र काही नवीन नाही. पण इशिताने ते घातल्यानंतर अशा मंगळसूत्रांमधील अनेक व्हरायटी बाजारात दिसू लागली.

ishita mangalsutra

तुम्ही पेपर आणि फ्लोरल ज्वेलरी पाहिली आहे? नसेल पाहिली तर याविषयी अधिक जाणून घ्या.

या होत्या आम्हाला माहीत असलेल्या मंगळसूत्राच्या डिझाईन्स तुम्हालाही मालिकेतील एखाद्या नायिकेचं मंगळसूत्र आवडत असेल तर आम्हाला नक्की कळवा.

 (सौजन्य- Instagram )