ADVERTISEMENT
home / मनोरंजन
‘मराठी तारका’ कार्यक्रमाला 11 वर्ष पूर्ण, 13 जानेवारीला रंगणार विशेष सोहळा

‘मराठी तारका’ कार्यक्रमाला 11 वर्ष पूर्ण, 13 जानेवारीला रंगणार विशेष सोहळा

सियाचेनपासून अंदमानपर्यंत दुबईपासून अमेरिकेपर्यंत पोहोचलेल्या ‘मराठी तारका’ या कार्यक्रमानं ११ वर्षं पूर्ण केली आहेत. या खास औचित्याने निर्माता, दिग्दर्शक महेश टिळेकर यांची संकल्पना आणि निर्मिती असलेल्या या कार्यक्रमाचा विशेष सोहळा १३ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता मुंबईतील वर्सोवा मेट्रो स्टेशनजवळच्या मैदानात रंगणार आहे. या सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत. गेल्या अकरा वर्षांमध्ये अनेक तारकांनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. गेल्या ११ वर्षांपासून मराठी अभिनेत्रींचा सहभाग असलेल्या ‘मराठी तारका’ या गीत-संगीत-नृत्याच्या कार्यक्रमाने तमाम मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांची दादही मिळवली आहे.

आतापर्यंत झाले 500 शोज

मराठी अभिनेत्रींना ग्लॅमर मिळवून देणारा हा कार्यक्रम दुबई, अमेरिका, लंडन आणि भारतभरात मिळून 500 हून अधिक शोज झाले आहेत. त्याशिवाय 2008 मध्ये राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची उपस्थितीही लाभली होती. कला क्षेत्रातील पं. बिरजू महाराज, रेखा, माधुरी दीक्षित, श्रीदेवी, वहिदा रेहमान, शोभा डे यांच्यासह माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीही हा कार्यक्रम पाहिला आहे. आत्तापर्यत सहा पिढ्यांमधील अभिनेत्रींनी मराठी तारका या कार्यक्रमात नृत्यकला सादर केली आहे आणि करीत आहेत.

marathi tarka

ADVERTISEMENT

मराठी तारका कार्यक्रमात सामाजिक भान

मराठी भाषा, संगीत, संस्कृतीला या कार्यक्रमातून जगापुढे मांडताना सामाजिक भानही राखलं आहे. म्हणून बॉर्डरवरील जवानांसाठी मोफत हा कार्यक्रम सादर करण्यात आला. तर पोलीस कल्याण निधीसाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून 2 कोटींचा निधी जमवण्यात हातभार लावला. त्यामुळे 11 वर्षांच्या टप्प्यावर आलेला हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या प्रेमाच्या जोरावर असाच एक तप, द्विदशकपूर्तीचीही वाटचाल करेल अशी आशा कार्यक्रमाचे सर्वेसर्वा महेश टिळेकर यांनी व्यक्त केली आहे. आता अकरा वर्षांच्या पूर्तीनंतर हा कार्यक्रम अजून कोणत्या वेगळ्या उंचीवर जाऊन पोहचणार याचीच प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

भार्गवी चिरमुले, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे यांचा समावेश

आतापर्यंत या कार्यक्रमांमध्ये अनेक दिग्गज तारकांचा सहभाग होता. अगदी वर्षा उसगावकर, किशोरी शहाणेपासून आता अमृता खानविलकर, भार्गवी चिरमुले, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, श्रुती मराठे, तेजा देवकर या मराठी चित्रपटसृष्टीतील नावजलेल्या तारकांचाही सहभाग आहे. मराठी चित्रपटसृष्टीला जेव्हा 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर महेश टिळेकर यांनी ‘मराठी तारका’ हा कार्यक्रम दिवंगत अभिनेता निळू फुले यांच्या प्रोत्साहनाने चालू केला होता. मराठीतील तारकांना एकत्रित करून मनोरंजनाबरोबरच सामाजिक प्रबोधन करणं हादेखील यामागचा उद्देश होता. हा प्रयत्न यशस्वी तर झालाच शिवाय या कार्यक्रमाचं नाव ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंदलं गेलं. इतक्या तारका एकाच वेळी नृत्य करणारा असा हा पहिलाच कार्यक्रम आहे. दिल्लीतील राष्ट्रपती भवनातदेखील हा कार्यक्रम झाला होता. त्यावेळी राष्ट्रपतीपदावर असणाऱ्या प्रतिभाताई पाटलांनी या कार्यक्रमाचं कौतुक केलं होतं. केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगभरात या कार्यक्रमाचं कौतुक करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

mahesh tilekar

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम 

10 Jan 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT