सध्याच्या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर वेबविश्वातही एक मोठी घडामोड घडणार आहे. ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटीवर ‘मी पुन्हा येईन’ (Mi Punha Yein) या वेबसीरिजच्या माध्यमातून सत्तेचा घोडेबाजार पाहायला मिळणार आहे. नुकतेच या वेबसीरिजचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी चाललेली चुरस यात पाहायला मिळत आहे. अरविंद जगताप लिखित, दिग्दर्शित या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे (Sayaji Shinde), उपेंद्र लिमये (Upendra Limaye), भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure), सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav), प्रभाकर मोरे (Prabhakar More), अमित तडवळकर, रमेश वाणी, संजय कुलकर्णी, राजेश दुर्गे, राजेंद्र गुप्ता, रुचिता जाधव, सीमा कुलकर्णी आणि दिप्ती क्षीरसागर यांच्या प्रमुख भूमिका असून ‘मी पुन्हा येईन’ची निर्मिती प्लॅनेट मराठी, गौतम कोळी आणि जेम क्रिएशन्सने केली आहे.
पुन्हा एकदा खुर्चीसाठी चढाओढ
मोशन पोस्टरमध्ये सयाजी शिंदे आणि उपेंद्र लिमये यांच्यात खुर्चीसाठीची चढाओढ दिसत आहे. या चढाओढीत आता ते हातमिळवणी करणार की, दोघांपैकी कोणाची सत्ता स्थापन होणार? हे ‘मी पुन्हा येईन’ आल्यावरच कळेल. दरम्यान या वेबसीरिजमध्ये राजकारणातील कट- कारस्थाने, नेत्यांची फोडाफोडी आणि मुख्य म्हणजे सध्या चर्चेत असलेले ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’ पाहायला मिळणार आहे.
दिग्दर्शक अरविंद जगताप यांनी सांगितले की, ” खरं सांगायचे तर वास्तवातील राजकारणापर्यंत पोहोचणे आपल्यासारख्यांना शक्यच नाही. मात्र बहुमतासाठी पक्षांची चाललेली धडपड, आमदारांची पळवापळवी, नेत्यांची कारस्थाने कोणत्या थराला जातात, याचे गंमतीशीर चित्र म्हणजे ‘मी पुन्हा येईन’.”
‘मी पुन्हा येईन’ या वेबसीरिजबद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकरने सांगितले की, “प्रेक्षकांना असे विषय पाहायला आवडतात. या वेबसीरिजचा सध्याच्या राजकीय घडामोडींशी काहीही संबंध नसून राजकारणात घडत असणाऱ्या काही गोष्टी यात पाहायला मिळणार आहेत. या वेबसीरिजची निर्मिती निव्वळ मनोरंजनच्या हेतूने करण्यात आली आहे.”
नुकताच टीझर झाला लाँच
टीझरमध्ये दोन पक्षाचे नेते सत्तेसाठी आमदारांची कशी पळवापळवी, फोडाफोडी करत आहेत, हे दिसत आहे. एवढेच नाही तर शासकीय यंत्रणांचाही कसा बेमालूमपणे वापर केला जातो आणि अधिकारीवर्गही यात आपली पोळी कशी भाजून घेतात, हे या टीझरमधून कळतेय. राजकारणावर आधारित या वेबसीरिजमध्ये सत्तालोलूपता, कपट-कारस्थान, संधीसाधूपणा, आमदारांची मेगाभरती, फोडाफोडी, पळवापळवी आणि सध्या चर्चेत असलेलं ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’ असा सगळा मसाला पाहायला मिळणार आहे. सध्याच्या पार्श्वभूमीवर आधारित अशी ही वेबसिरीज असल्याने नक्कीच प्रेक्षकांना यामध्ये रस निर्माण झाला असणार यात शंका नाही. महाराष्ट्राचे तापलेले सध्याचे राजकारण आणि या वेबसिरीजमध्ये बऱ्यापैकी साम्य असल्याचे प्रेक्षकांना वाटत आहे. मात्र हे केवळ मनोरंजनासाठी आणि साधारण राजकारणात काय काय चालतं हे लोकांना समजावे यासाठी दाखविण्यात आल्याचे याआधीही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र या वेबसिरीजचा विषयच असा असल्यामुळे अनेक जण सध्याच्या परिस्थितीशी याच्या कथेचे साधर्म्य जोडण्याचा प्रयत्न करत असल्याचेही दिसून येत आहे.
लवकरच ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये आणि भारत गणेशपुरे यांचा दमदार अभिनय पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक