भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार ‘मिताली राज’ हिचा बायोपिक ‘शाबाश मिथू’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. 15 जुलै रोजी चित्रपटगृहात दाखल होणार्या या चित्रपटात मिताली राजच्या बालपणापासून ते क्रिकेटपटू बनण्यापर्यंतच्या संघर्षाची कथा दाखवण्यात येणार आहे. मितालीने पुरुषप्रधान खेळात आपले स्थान निर्माण केले आणि संपूर्ण जगात भारताचे नाव उंचावले आहे. मिताली राजची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 23 वर्षांची कारकीर्द आहे. यामध्ये तिने अनेक विक्रम मोडीत काढत एकदिवसीय सामन्यांमध्ये 10,000 हून अधिक धावा केल्या आहेत.
ट्रेलरमध्ये दिसतेय संघर्षाची झलक

या ट्रेलरमध्ये दिसतेय की, तापसी पन्नू उर्फ मिथूला पुरुषांचे वर्चस्व असलेल्या खेळात म्हणजेच क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी तिच्या पालकांपासून निवडकर्त्यांपर्यंत सर्वांशी कसा संघर्ष करावा लागतो. यादरम्यान कसा तिला त्रास दिला जातो आणि तिची चेष्टा केली जाते. पण ती समाज आणि आपल्या प्रियजनांविरुद्ध देखील ठामपणे उभी आहे. चित्रपटाचा ट्रेलर शेअर करताना, तापसी पन्नू लिहिते, “तुम्हाला नाव माहित आहे, आता मितालीला लीजेंड बनवण्यामागील कथा पाहण्यासाठी तयार व्हा. “द जेंटलमन्स गेम” ची पुनर्व्याख्या केलेल्या महिलेची कथा तुमच्यासमोर आणताना आम्हाला अभिमान वाटतो आहे. शाबाश मिथू 15 जुलै.”
शाबाश मिथू हा सृजित मुखर्जी दिग्दर्शित आणि वायकॉम18 स्टुडिओज निर्मित चरित्रात्मक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपट भारताच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज हिच्या जीवनावर आधारित आहे. यात तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहे. श्रीजीत मुखर्जी दिग्दर्शित आणि प्रिया एवेन यांनी लिहिलेल्या या चित्रपटात मिताली राजच्या आयुष्यातील चढ-उतार, अपयश आणि उत्कंठापूर्ण क्षणांचे वर्णन केले आहे.या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांना मितालीचे आयुष्य मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
भारतात क्रिकेटची प्रचंड क्रेझ
भारतात क्रिकेटप्रेमींच्या मनात क्रिकेटची प्रचंड क्रेझ आहे. भारतीयांसाठी हा केवळ खेळ नव्हे तर धर्म आहे. मात्र, ही क्रेझ केवळ पुरुषांच्या क्रिकेटचीच दिसून आली आहे. महिला क्रिकेटची ही क्रेझ नव्वदच्या दशकापर्यंत नव्हती. आजच्या परिस्थितीत महिला क्रिकेटला जी काही ओळख मिळाली आहे, त्याचे श्रेय ‘लेडी सचिन तेंडुलकर’ म्हणून ओळख असलेल्या मिताली राजला जाते. जेव्हा मितालीने पुरुषप्रधान क्षेत्रात महिला क्रिकेटला ओळख मिळवून देण्याचे स्वप्न पाहिले होते, तेव्हा ते सोपे नक्कीच नव्हते. आपली समाजरचना अशी आहे की मितालीला घरापासून क्रिकेटच्या मैदानापर्यंत सगळीकडे विरोध आणि अडथळे पार करावे लागले. या प्रवासात तिला प्रचंड संघर्ष करावा लागला.

समाजाने निर्माण केले अडथळे
ज्या समाजाने महिलांना अध्यापन आणि बँकिंगमध्ये करिअर करण्याचा सल्ला दिला, त्या समाजात मितालीने तिची बॅट हातात धरून तिचे स्वप्न साकार केले तेव्हा अनेकांनी तिचा आत्मविश्वास डळमळीत केला. मात्र तिला आई-वडिलांचा पाठिंबा होता आणि ती घाबरली नाही किंवा समाजापुढे झुकली नाही. महिला क्रिकेट विश्वात तिने जो इतिहास रचला आहे, तो जगापुढे आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असेही दाखवण्यात आले आहे की, मितालीच्या भूमिकेत तापसी पन्नू म्हणते, “मी आठ वर्षांची होते, जेव्हा कोणी स्वप्नात तरी पाहिले होते का की आमच्याकडे ‘वूमन इन ब्लू’ सारखी टीम असेल.” प्रशिक्षक सांगतात, ‘हिच्यात नैसर्गिक टॅलेंट आहे, योग्य प्रशिक्षण घेतल्यास ती राष्ट्रीय संघात खेळण्याची शक्यता आहे.’ ही प्रशंसा मिथुनसाठी आहे असे संपूर्ण कुटुंबाला वाटते, पण प्रशिक्षक म्हणतात, ‘अहो मी मितालीबद्दल बोलतोय’. यावर संपूर्ण कुटुंबाचा चेहरा उतरतो.पण नंतर मितालीच्या कुटुंबाने तिला पाठिंबा दिला आणि तिने तिचे स्वप्न साकार केले.
मितालीचा हा प्रवास 15 जुलै रोजी बघायला मिळेल.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक