भारतामध्ये प्रभू श्रीरामाची महती दूरवर पसरलेली आहे. श्रीराम म्हणजे श्री विष्णूंचा सातवा अवतार होय. श्रीराम देवाला श्रीरामचंद्र असेही म्हटले जाते. भगवान श्रीरामाने एक आदर्श चरित्र म्हणून समाजाला एका सूत्रात बांधलं होतं. श्रीरामाचं चरित्र म्हणजे पदोपदी मर्यादा, त्याग, प्रेम आणि लोकव्यवहाराचं दर्शन होतं. त्यामुळेच श्रीरामाला मर्यादा पुरूषोत्तम असंही म्हटलं जातं. हिंदू धर्मशास्त्रांनुसार ज्या दिवशी मर्यादा पुरूषोत्तमाचा जन्म झाला होता. तो दिवस दरवर्षी रामनवमी म्हणून साजरा केला जातो. तसंच ज्या दिवशी रामाने लंकापती रावणाचा वध केला. तो दिवस विजयादशमी म्हणून ओळखला जातो. या दिवशी एकमेंकाना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात. याच निमित्ताने नजर टाकूया टीव्हीवरील प्रसिद्ध कलाकारांवर ज्यांनी रामाची भूमिका करून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली.
अरूण गोविल
भारतातला हा तो काळ आहे, जेव्हा रामायण आणि महाभारत घरोघरी लागताच रस्ते निर्मनुष्य होत असत. 1987 साली रामानंद सागर यांनी रामायण मालिकेत प्रभू रामाची भूमिका अभिनेता अरूण गोविल यांना दिली. या कार्यक्रमामुळे त्यांची छबी अशी झाली की, लोक त्यांना भगवान राम समजू लागले. ते जिकडे जात तिकडे लोक त्यांचे पाय धरत असत. एक काळ असा होता की, लोक अरूण गोविल यांना भगवान रामाचं रूप समजू लागले होते. रामायण मालिका संपल्यावर त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिका केल्या. पण लोकांच्या मनात त्यांची श्रीराम म्हणून असलेली छबी कायम होती. त्यामुळे त्यांच्या इतर भूमिकांना एवढी पसंती मिळाली नाही.
नितीश भारद्वाज
2002 साली आलेल्या बीआर प्रोडक्शनच्या रामायण मालिकेत प्रसिद्ध अभिनेता नितीश भारद्वाज यांनी प्रभू श्रीरामाची भूमिका साकारली होती. खरंतर या आधी त्यांना श्रीकृष्णाच्या भूमिकेमुळे प्रसिद्धी मिळाली होती. पण त्यानंतर रामाची भूमिका केल्यावर लोकं कृष्ण आणि राम या दोन्ही रूपात त्यांना पाहू लागले. या मालिकेत नितीश भारव्दाज यांच्या सोबत सीतेची भूमिका स्मृती ईराणीने साकारली होती.
गुरमीत चौधरी
90 च्या दशकात टीव्ही प्रेक्षकांसाठी राम म्हणजे अरूण गोविल होते. त्यामुळे 2008 साली आलेल्या रामायणामध्ये रामाची भूमिका निभावणे हे आवाहन होतं. पण अभिनेता गुरमीत चौधरी याने आपल्या भूमिकेने लोकांच्या मनात जागा मिळवली. अरूण गोविल नंतर गुरमीत चौधरीला रामाच्या भूमिकेत सर्वात जास्त पसंती मिळाली. तुमच्या माहितीसाठी ही रामायण मालिका रामानंद सागर यांचा मुलगा आनंद सागर याने बनवली होती. यामध्ये सीतेच्या भूमिकेता देबिना बॅनर्जी झळकली होती. जी रियल लाईफमध्ये गुरमीत चौधरीची बायको आहे.
आशिष शर्मा
2015 साली स्टार प्लसवर आलेल्या सीया के राम या मालिकेत आशिष शर्मा या अभिनेत्याने रामाची भूमिका केली होती. आशिषसाठी ही मालिका खूपच लकी ठरली. कारण या मालिकेमुळे त्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत सीतेच्या नजरेतून घडणारं रामायण दाखवण्यात आलं होतं.
गगन मलिक
2015 सोनी टीव्हीवर सुरू झालेल्या संकटमोचन महाबली हनुमान या मालिकेत रामाच्या भूमिकेत अभिनेता गगन मलिक झळकला होता. त्यालाही प्रेक्षकांकडून खूप वाहवाई मिळाली आणि त्याच्या अभिनयाचंही कौतुक झालं होतं. या मालिकेची रंजक गोष्ट म्हणजे गगनने यामध्ये भगवान राम, विष्णू आणि महादेव अशा तिघांच्याही भूमिका केल्या होत्या.
मग दसरा म्हणजेच विजयादशमीच्या निमित्ताने पुन्हा एकदा या मालिका नक्की पाहा आणि रामायणाचा महिमा नव्या पिढीलाही कळू द्या. कारण या कलियुगात मनातील रावणाचं दहन करून रामाची जागा निर्माण करणं फार महत्त्वाचं आहे. मनोरंजनाच्या माध्यमातून का होईना दसऱ्याची माहिती आणि आख्यायिका आपल्या नव्या पिढीला नक्की सांगा.