श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्वाचा सण म्हणजे ‘नागपंचमी’ भावाला चिरंतर आयुष्य लाभावे आणि दु: ख समाप्ती व्हावी यासाठी नागपंचमी हा सण साजरा केला जातो. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केली जाते. स्त्रिया या सजून धजून तयार होतात. नागाच्या प्रतिकृती समोर फुले वाहून त्याची मनोभावे पूजा करतात. लाह्या, फुले वाहून नागपंचमी साजरी केली जाते. नागपंचमीच्या शुभेच्छा देऊन तुम्ही हा दिवस साजरा करु शकता. या दिवशी गव्हाची खीर आणि पुरणाचे दिंड केले जाते. हा या दिवसाचा खास पदार्थ असतो. गव्हाची खीर तुम्ही सगळ्यांनीच आतापर्यंत चाखली असेल. पण पुरणाचे दिंड हा प्रकार तुम्ही कधी खाल्ला आहे का? नागपंचमीसाठी तुम्ही खास पुरणाचे दिंड करण्याचा विचार करत असाल तर जाणून घेऊया पुरणाच्या दिंडाच्या रेसिपी
पुराणाचे दिंड
नागपंचमीच्या दिवशी काही चिरायचे किंवा कापायचे नसते. त्यामुळे असे हा पदार्थ करण्याची पद्धत आहे. कोकणात पातोळ्या नावाचा पदार्थ केला जातो. त्याहून थोडासा वेगळा पुरणाचे दिंड हा पदार्थ असतो. जाणून घेऊया नेमकं कसे बनवतात पुरणाचे दिंड
साहित्य: 1 ½ वाटी चणाडाळ, 1 ½ वाटी किसलेला गूळ, पोळ्यांना भिजवतो तशी कणीक, जायफळ- वेलची पूड, हळद, चवीपुरतं मीठ, तेल आणि उकडीसाठी भांडे
कृती :
- चणाडाळ स्वच्छ धुवून घ्या आणि ती साधारण तासभर तरी भिजत घाला.
- डाळ चांगली भिजली की एक कुकरमध्ये घेऊन त्यामध्ये चणाडाळ, पाणी, तेल, हळद घालून ती छान शिजवून ध्या. डाळ छान गळेपर्यंत शिजायला हवी.
- आता ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीसाठी पुरण बनवतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला एका कढईमध्ये तुम्हाला शिजलेली डाळ, गूळ घेऊन ती चांगली शिजवून घ्यायची आहे. पुरणचांगल कोरडं होऊ द्यायचं आहे. असे केले तरचं ते छान लागते.
- पुरण नीट शिजले की नाही ते देखील पाहून घ्या. कारण या रेसिपीसाठी पुरण चांगले शिजणे फारच जास्त गरजेचे असते.
- पुरण थंड झाले की, पुरण यंत्रातून पुरण काढून घ्या. आता पुरणाचे दिंड करण्यासाठी मळलेली कणीक चांगली मळून घ्या.
- कणीक घेऊन ती लाटून घ्या. तिचा आकार पुरी इतका असू द्या. तयाप पुरणाचा गोळा घेऊन तो बरोबर मधोमध ठेवा.
- कडांना पाणी लावून एक एक कडा दुमडून घ्या. त्याचा साधारण आयताकृती असा आकार तुम्हाला दिसेल.
- अशा पद्धतीने तुम्हाला सगळे पुरणाचे मांडे करुन घ्यायचे आहेत.
- गॅसवर उकडीसाठीचे भांडे ठेवावे. त्याच्यावर एक एक करुन पुरणाचे दिंड ठेवावे. पुरणाच्या दिंडाला थोडासा स्वाद हवा असेल तर उकडीच्या भांड्यात हळदीचे पान ठेवावे. त्यामुळे एक चांगला सुगंध येतो.
- साधारण 5 ते 10 मिनिटांत पुरणाचे मांडे तयार होतात. ते मस्त पानाता वाढून त्याचा आनंद घ्यावा.
आता यंदाच्या नागपंचमीला तुम्ही हमखास पुरणाचे दिंडे करा आणि त्याचा आनंद घ्या.