नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या दमदार अभिनयाने लोकांच्या मनात एक खास जागा निर्माण केली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेनंतर सगळीकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पॅरलल सिनेमा असो वा मेनस्ट्रीम सिनेमा, वेबसीरीज असो बायोपिक, नवाजने प्रत्येक भूमिकेत प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सान्या मल्होत्रा चा चित्रपट ‘फोटोग्राफ’ चं ट्रेलर नुकतंच रिलीज करण्यात आलं. अमेझॉन स्टुडीओजतर्फे रिलीज करण्यात आलेल्या अडीच मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये दोन अनोळखी व्यक्तींची प्रेमकहाणी सांगण्यात आली आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन एका फोटोग्राफरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा पहिला फोटो आल्यापासूनच ट्रेलरबाबत उत्सुकता होती. ‘फोटोग्राफ’चं दिग्दर्शन आणि लेखन रितेश बत्राने केलं आहे.
या ट्रेलरमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सान्या मल्होत्राची केमिस्ट्री चांगली दिसत आहे. चित्रपटात नवाज रफी नावाच्या स्ट्रगलिंग फोटोग्राफरच्या भूमिकेत दिसणार आहे. ज्याची आजी त्याच्यासाठी मुलगी शोधतेय. या दरम्यानचं त्याची भेट सान्या मल्होत्राशी होते. जिची तो आपली प्रेयसी नूरी म्हणून आजीशी ओळख करून देते आणि हळूहळू त्यांच्यातील जवळीक वाढू लागते.
नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सान्या मल्होत्राची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ट्रेलरमध्ये दोघांनीही सुंदर अभिनय केला आहे. ‘दंगल’ आणि ‘पटाखा’मध्ये बिनधास्त मुलीच्या भूमिकांमध्ये दिसणारी सान्या या चित्रपटात खूपच छान आणि नाजूक दिसत्येय. सान्या या चित्रपटात गुजराती मुलीच्या भूमिकेत असून जिला सीए बनायचं असतं.
तिची संवादफेकही वेगळी वाटत आहे. तर नवाजचा अभिनय नेहमीप्रमाणे दमदार आहे.
या चित्रपटाला सनडान्स फिल्म फेस्टिव्हल आणि बर्लिन फिल्म फेस्टिव्हलचं खूप कौतुक झालं होतं. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सान्या मल्होत्रासोबतच या चित्रपटात विजय राज आणि जिम सरभची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. हा चित्रपट 15 मार्चला रिलीज होणार आहे.