लग्नानंतर मंगळसूत्र ही महिलांच्या गळ्याची शान असते. सोन्याचे मंगळसूत्र वगळता महिलांकडे अनेक वेगवेगळ्या पद्धतीने मंगळसूत्र असतात. साडी, पंजाबी ड्रेस आणि वेस्टर्न आऊटफिटवर वेगवेगळी मंगळसूत्र घालायला खूप जणांना आवडतात. काही जणांना (Mangalsutra Designs) काही वेळा टिपिकल असे मंगळसूत्र अजिबात घालायला आवडत नाही. पण खास कार्यक्रमांना गेल्यानंतर कोणी मंगळसूत्र घातले नाही? असा प्रश्न विचारु नये यासाठी मंगळसूत्रासारख्या दिसणाऱ्या आणि गळ्यालगत राहतील अशा काही सोप्या डिझाईन्स शोधून काढल्या आहेत. त्या डिझाईन्स तुम्हाला नक्कीच आवडतील आणि त्या तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घालता येतील.
चोकर नेकलेस

जर तुम्हाला ट्रेडिशनल मंगळसूत्र घालायचे नसेल तर तुम्ही छान काळ्या रंगाचे चोकर सेट घालू शकता. काळा रंग हा कोणत्याही साडीवर चांगला दिसतो. तुम्ही एखादे लहान असे चोकर निवडून त्याला काळ्या मोत्यांची किंवा काळ्यामणीच्या सरी असतील तर त्या मंगळसूत्रासारख्याच दिसतात. मोठ्या गळ्याचे ब्लाऊज घातले असतील तर अशावेळी तुम्ही असे काळ्या रंगामध्ये चोकर घातले तर ते तुम्हाला अधिक जास्त उठून दिसतात. तुमची मान त्यामुळे चांगली उठून दिसते. चोकर सेट घेताना तुमच्या मानेचा आकार आणि तुमच्या उंचीचा देखील विचार करा. खूप मोठे सेट निवडायचा विचार करु नका. तुमची शरीरयष्टी नाजूक असेल तर त्यांनी विशेष काळजी घ्यायला हवे.
कोल्हापुरी हार

तुम्हाला ट्रेडिशनल अशा डिझाईन्स हव्या असतील तर खास तुम्ही कोल्हापुरी हाराच्या डिझाईन्स निवडायला हव्यात. कोल्हापुरी हारामध्ये अधिक डिझाईन्स मिळतात. कोल्हापुरी हारामध्ये जर तुम्हाला काळे मणी हवे असतील तर तुम्हाला तसे देखील मिळतात. ते मंगळसूत्र असतात असे नाही. अविवाहित स्त्रियादेखील याचा वापर करु शकतात. याचे पेंडंट याची खासियत असते. कोल्हापुरी मंगळसूत्राच्या डिझाईन्स ही युनिक असतात. त्यामध्ये तुम्हाला गोलाकार, आयताकार असे आकार मिळतात. तुम्हाला जसा आकार हवा तो तुम्ही निवडू शकता.
स्टोन चोकर सेट

तुम्हाला एखाद्या साडीवर स्टोन्स ज्वेलरी घालायची असेल तर तुम्ही स्टोन चोकर सेट देखील निवडू शकता. स्टोन्स हे दिसायला गळ्यात खूप आकर्षक दिसतात. तुम्हाला अशा पद्धतीनेही काही सेट्स घेता येऊ शकतात. अशा चोकर सेटमध्ये तुम्हाला गुलाबी, हिरवा, निळा असे काही स्टोन्स निवडता येतात. हल्ली पेंडंट काढून वेगळ्या दोऱ्याला किंवा मण्यांच्या माळेला तुम्हाला लावता येईल, असे पाहा. स्टोन चोकर सेट हे साडी, पंजाबी सूट यावर चांगले दिसतात. त्यामुळे तुमच्याकडे असे काही सेट असायला हवे.
पेटी हार

पेटी हार ही देखील एक डिझाईन ट्रेडिशनल डिझाईनपैकी एक आहे. पेटी हारमध्ये तुम्हाला मोती, खडे यांची घडण असलेली दिसते. हा देखील एक चोकर सेटचा प्रकार आहे. पेटी हार तुम्हाला साडी, पंजाबी सूट यांवर घालता येतात. पेटी हार ही डिझाईन तुम्हाला सोन्यातही घडवून मिळू शकते. जर तुम्हाला सोन्यामध्ये ते घडवून घ्यायचे नसेल तर तुम्हाला इमिटेशन ज्वेलरी मिळते त्याठिकाणी देखील मिळते. याला देखील तुम्हाला काळा दोरा लावता येतो. शिवाय तुम्हाला रंगाचे थ्रेडदेखील लावता येतील.
ऑक्सिडाईज चोकर

सध्याचा काळ ऑक्सिडाईजचा काळ आहे. अनेक कपड्यांवर ऑक्सिडाईज ज्वेलरी या खूप चांगल्या दिसतात. मुळातच सिल्व्हर आणि काळ्या टोनमध्ये असलेल्या या ज्वेलरी कोणालाही घालता येतात. तुम्हाला मंंगळसूत्राऐवजी जर एखाद्या हारच घालायचा असेल तर तुम्हाला असे चोकर वापरता येतात. त्यामुळे तुमचा लुक उठून दिसतो. इतकेच नाही तर काळ्या रंगाच्या साडीवर असे चोकर खूपच छान दिसतात.
आता कोणत्याही कार्यक्रमांना तुम्हीदेखील हे पर्याय नक्की ट्राय करुन बघा.