दीपवीरच्या लग्नानंतर एकामागोमाग एक रिसेप्शन देण्याचा एक ट्रेंडच आलाय काहीसा असं म्हणावं लागेल. निकयांका अर्थात निक आणि प्रियांका यांचं लग्नानंतर पहिलं रिसेप्शन झालं ते दिल्लीमध्ये. त्यानंतर मुंबईमध्ये आपली काही मित्रमंडळी आणि खास मीडियासाठी रिसेप्शन ठेवण्यात आलं आणि आता तिसरं ग्रँड रिसेप्शन आपल्या बॉलीवूडमधील मित्रमंडळींसाठी प्रियांका आणि निकने आयोजित केलं आहे. प्रियांकाने आपल्या प्रत्येक रिसेप्शनला इंडो – वेस्टर्न स्टाईल कॅरी केली. देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक हे लग्नापासून अगदी दोन्ही संस्कृती व्यवस्थित जपताना दिसत आहेत. या रिसेप्शनमध्येदेखील हेच दिसून आलं.
प्रियांका आणि निकचा लुक
प्रियांका आणि निकने या रिसेप्शनला निळा रंग निवडला आहे. रॉयल ब्ल्यू आणि ब्लॅक सूटमधला निक आणि गुलाबी आणि निळ्या रंगाच्या लखनवी एम्ब्रोरडरी असलेल्या लेहंग्यातील प्रियांका खूपच सुंदर दिसत आहेत. प्रियांकाने यावेळीदेखील आपला लुक सिंपल पण एलिगंट असा ठेवला आहे. नव्या नवरीचा चेहरा अगदी उठून दिसत आहे. प्रियांकाचा मेकअपदेखील अगदी मिनिमल असा आहे आणि त्यामुळे तिने घातलेल्या लेहंग्याला अधिक उठाव आला आहे. दरम्यान प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनी साडी न नेसता यावेळी सलवार सूटला पसंती दिली. अर्थात सर्वात जास्त काम हे नवरीच्या आईलाच असतं ना आपल्याकडे? प्रियांका आणि निकच्या लग्नामध्ये अवघं बॉलीवूड शुभेच्छा द्यायला लोटलं आहे.
अवघं बॉलीवूड राहिलं हजर
अवघं बॉलीवूड प्रियांका आणि निकला शुभेच्छा द्यायला आज मुंबईमध्ये जमलं होतं. प्रियांका आणि सलमान खानमध्ये बिनसल्याच्या बातम्यांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. सलमान खानदेखील प्रियांकाला शुभेच्छा द्यायला हजर होता. इतकंच नाही तर प्रियांकाने करिअर सुरु केल्यानंतर मधुर भांडाकरच्या फॅशनमधून चांगला ब्रेक मिळाला. मधुरही आपल्या पत्नीसह उपस्थित होता. तर हेमामालिनी, ए. आर. रेहमान, शबाना आझमी, सिद्धार्थ रॉय कपूर आणि विद्या बालन, आशा भोसले, नवीने लग्न झालेलं जोडपं सायना नेहवाल आणि पारूपल्ली कश्यप, रविना टंडन, तुषार कपूर, जितेंद्र,गीता बसरा, कंगना राणौत आपल्या आई आणि बहिणीसह, डिझाईनर मसाबा गुप्ता, दिग्दर्शक अब्बास – मस्तान, रजनीकांत यांची पत्नी लथा रजनीकांत, काजोल, रेखा, सुभाष घई, गर्लफ्रेंड तान्या श्रॉफबरोबर आहान शेट्टी, कतरिना कैफ हे प्रियांका आणि निकला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिले.