हल्ली कोणतंही लग्न संगीत सोहळ्याशिवाय पूर्ण होतंच नाही आणि तेच लग्न कोणत्या सेलिब्रिटीचं असेल तर मग त्याला काही वेगळाच लुक येतो. सध्या बॉलीवूडमध्ये लग्नाचा हंगामच सुरु आहे. नुकतंच दीपिका – रणवीरच्या लग्नातून वर येतो न येतोय तोच आता प्रियांका आणि निकचे फोटो समोर येऊ लागले आहेत. प्रियांकाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून संगीत सोहळ्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. अतिशय सुंदर व्हिडिओ एडिट करण्यात आला असून अगदी बॉलीवूडमधील कोणतातरी चित्रपटच बघत असल्याचा आभास होतो आहे. या संगीत सोहळ्यामध्ये निक आणि प्रियांकाचं कुटुंब अगदी एकरूप झालं असून अगदी ‘हम साथ साथ है’ चित्रपटाप्रमाणेच सर्व काही दिसून येत आहे. निकच्या कुटुंबीयांनीही अगदी मनापासून या संगीत सोहळ्यात सहभागी होऊन या कार्यक्रमाची एक प्रकारे शोभाच वाढवली आहे असं म्हटलं तर नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही.
संगीत सोहळ्यात झाली प्रियांका भावनिक
संगीत सोहळा म्हणजे खरं तर दोन कुटुंबाची एक प्रकारे स्पर्धाच. मात्र निक आणि प्रियांकाच्या लग्नामध्ये ही स्पर्धा कधी कौटुंबिक सोहळा झाला हे कळतही नाही. दोन्ही कुटुंबांनी त्यांची लव्ह स्टोरी गाण्यातून सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रियांकाने हा व्हिडिओ पोस्ट करताना अतिशय भावनिक पोस्ट लिहिली आहे. ‘खरं तर संगीत सोहळा म्हणजे दोन कुटुंबातील स्पर्धा. लग्नापूर्वीचा अजून एक विधी. पण ही स्पर्धा कधी कौटुंबिक सोहळा बनली कळलंही नाही आणि हा सोहळा एक प्रेमाचा सोहळा झाला. प्रत्येकाने आमचं प्रेम दर्शवण्याचा प्रयत्न करून हा सोहळा एक प्रेमाचा आणि आनंदाचा सोहळा बनवला.आमच्या कुटुंबासाठी आणि आमच्यासाठी याशिवाय चांगली सुरुवात असूच शकत नाही. ’ प्रियांकाचा हा व्हिडिओ आणि ही भावनिक पोस्ट वाचल्यानंतर आणि पाहिल्यानंतर प्रत्येक मुलीला आपल्या आयुष्यात निकप्रमाणेच जोडीदार मिळावा आणि असंच कुटुंब मिळावं असं वाटल्याशिवाय राहणार नाही.
प्रियांका आणि निक विवाहबद्ध
प्रियांका आणि निक यांचा १ डिसेंबरला ख्रिश्चन पद्धतीने विवाह झाल्याचं सांगितलं जात असून २ डिसेंबरला हिंदू पद्धतीने त्यांचा विवाह असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र सध्या तरी प्रियांकाने केवळ मेंदी सोहळा आणि संगीत सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले असून इतर फोटोजसाठी अजूनही चाहत्यांना थांबावं लागणार आहे असं सध्याचं चित्र आहे. त्यामुळे हिंदीत म्हटल्याप्रमाणे सध्या चाहत्यांना ‘सब्र का फल मिठा होता है’ हे समजून घ्यावं लागणार आहे. दरम्यान नुकतंच दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचे सर्व रिसेप्शन संपले असून आता प्रियांक आणि निकच्या फोटोसाठी चाहत्यांना तयार व्हावं लागत आहे. त्यामुळे निदान त्यामध्ये थोडा तरी गॅप असायला हवं असं कदाचित प्रियांकालाही वाटत असावं. मात्र या दोघांचे फोटो पाहण्यासाठी त्यांचे चाहते नक्कीच उत्सुक आहेत. लवकरच या दोघांचे फोटो प्रियांका आणि निक पोस्ट करतील अशी सर्वांनाच आशा आहे.
प्रियांकाच्या आईनेही केला डान्स
प्रियांका आपल्या आईच्या खूपच जवळ आहे. प्रियांकाने आजपर्यंत आपल्या आईला विचारूनच सर्व निर्णय घेतले आहेत. या संगीत सोहळ्यामध्ये प्रियांकाची आई मधू चोप्रा आणि प्रियांका दोघीही एकत्र नाचल्या.
इमेज सोर्स – इन्स्टाग्राम