वजन कमी करण्यासाठी तुमचे अनेक प्रयत्न सुरु असतीलच अशी अपेक्षा आहे. पण कधी कधी सगळ्या गोष्टी करुनही वजन काही केल्या आटोक्यात येत नाही. वजन आटोक्यात न येण्याची बरीच कारणं असू शकतात. त्यापैकी एक म्हणजे बाहेरचे खाणे. डाएटप्रमाणे आहार न घेता तोच पदार्थ बाहेर खाल्ला जातो. ज्यामध्ये कॅलरीज अधिक असतात आणि अशा पदार्थांचे सेवन केल्यानंतर वजनात वाढ होणे अत्यंत साहजिक आहे. पण बाहेरचे पदार्थ खाणे टाळता येत नसेल. कामाचे स्वरुप आणि लाईफस्टाईलमुळे ते शक्य नसेल तर तुम्ही आठवड्यातून एक दिवस डिटॉक्स करायला हवे. दर आठवड्याचा एक दिवस जर तुम्ही असा लंघन करुन घालवला तर तुम्हाला तुमच्या वजनात आणि शरीरात झालेला फरक नक्की जाणवेल.
लिक्विड डाएटच्या मदतीने महिन्याभरात करा वजन कमी
डिटॉक्स म्हणजे काय?
डिटॉक्स म्हणजे शुद्ध मराठीत सांगायचे तर लंघन. एखाद्या दिवशी आपण खूप खातो त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला म्हणावे तितके जेवण जात नाही. अशावेळी आदल्या दिवशीचा उतारा म्हणून खूप जण दुसऱ्या दिवशी लंघन करतात. त्यामुळे पोटाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. खूप बाहेरचे पदार्थ खाल्ल्यामुळे जर तुमच्या वजनात आणि शरीरात बदल झाला असेल तर लंघन करण्यासाठी म्हणजेच डिटॉक्स करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे पोट स्वच्छ होते आणि शरीरातून सगळी घाणही बाहेर पडते.
वजन कमी करण्यासाठी जेवण टाळणं योग्य की अयोग्य
आठवड्यात एकदा असे करा डिटॉक्स
डाएटिशनच्या सल्ल्याने जर तुम्ही डिटॉक्स करत असाल तर तुम्हाला कादाचित तीन दिवस तरी डिटॉक्स करण्याचा सल्ला दिला जातो. पण तीन दिवसांचा हा कडक उपवास आणि लंघन खूप जणांना करता येत नाही. त्यामुळेच आम्ही आठवड्यातून एकदा कसा डिटॉक्स करता ते जाणून घेऊया.
- सकाळी उठल्यावर ओव्याचे. दालचिनीचे किंवा बडिशेपेचे गरम पाणी प्या. त्यानंतर साधारण 5 बदाम खा. जर तुम्हाला ड्रायफ्रुट आवडत असेल तर अगदी मूठभरच ड्रायफ्रुट खा.
- सकाळच्या नाश्त्याला काही खाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही मिक्स फ्रुट्स प्लेट खा. फळांमुळे तुमच्या पोटात फायबरचे योग्य प्रमण शरीराला मिळते.
- तुम्हाला दूध किंवा ताक आवडत असेल तर तुम्ही याचेही सेवन करु शकता.
- डिटॉक्सच्या दिवशी तुम्हाला सॉलिड असं काही खाता येणार नाही. त्यामुळे दिवसभरात शक्य असेल त्यावेळी तुम्हाला फळं आणि फळांच्या रसाचे सेवन करायचे आहे.
- फळांमध्ये जर तुम्हाला काही पोटभरीचे खायचे असेल तर तुम्ही कलिंगड, पपई असे फळ खाल्ले तर तुमचे पोट त्यामुळे भरते.
- ताक हे देखील डिटॉक्ससाठी चांगलाच आहार आहे. दिवसभरातून तुम्ही कितीही वेळा ताक पिऊ शकता. ताक किंवा दही हे देखील खाल्ले तरी चालू शकेल.
- हे इतकेसे खाऊन तुमचे पोट भरणार नाही. त्यामुळे संध्याकाळी तुम्हाला थोडासा थकवा येईल. जर तुम्हाला काहीतरी खावे असे वाटत असेल तर तुम्ही सुप्स किंवा असे काही पिऊ शकता.
अशापद्धतीने डिटॉक्स करुन तुम्ही तुमचे वजन कमी करु शकता.