अनुष्का – विराट अर्थात विरूष्का त्यानंतर दीपिका – रणवीर अर्थात दीपवीर या दोन्ही जोडप्यानं भारताबाहेर इटलीमध्ये जाऊन लग्न केलं. मात्र देसी गर्ल प्रियांका आणि निक अर्थात प्रिनिक किंवा निकयांक यांनी भारतातील जोधपूरमध्ये शाही लग्न करण्याचं निश्चित केलं. या लग्नाच्या शाही सोहळ्याला सुरुवात तर झाली आहे. निक तर दोन आठवडे आधीच भारतात आला असून त्याचं कुटुंबही भारतामध्ये आलं आहे. कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये यासाठी चोप्रा कुटुंबातील प्रत्येकजण अगदी जातीने यामध्ये लक्ष घालत आहे. प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा यांनी स्वतः सर्व पाहणी केली आहे. अलीकडेच प्रियांकादेखील आपल्या आईबरोबर उमेद भवनमध्ये जाऊन आली होती. जोधपूरमधील उमेद भवन पॅलेसमध्ये हा शाही विवाह पार पडणार आहे.
इमेज सोर्स – इन्स्टाग्राम
एका दिवसाचं भाडं ४३ हजार
उमेद भवन हे भारतातील प्रसिद्ध हॉटेलपैकी एक असल्याचं म्हटलं जातं. पूर्वी हा राजमहाल होता. पण आता त्याचं हॉटेलमध्ये रूपांतर करण्यात आलं आहे. मात्र याचं एका दिवसाचं भाडं किती आहे हे तुम्हाला माहीत आहे का? हे भाडं किती आहे हे कळल्यानंतर नक्कीच तुम्ही आश्चर्याने तोंडात बोटं घालाल. केवळ एका रात्रीचं भाडं या हॉटेलमध्ये साधारणतः ४३ हजार रूपये आहे. झालात ना आश्चर्यचकित? पण हो हे खरं आहे. या हॉटेलमध्ये प्रियांका चोप्राच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी ६५ रूम्स बुक केल्या आहेत. म्हणजे किती पैसा खर्च होणार आहे याचा अंदाज आता तुम्हीच लावा. या महालामध्ये अनेक वेगवेगळे सूट्स आहेत. त्यापैकी महाराणी सूट सगळ्यात खास असून प्रियांका आणि निकसाठी हा सूट घेण्यात आला असून याची किंमत एका दिवसासाठी ६६ हजार रूपये मोजावे लागणार आहेत. उमेद भवनची सजावट अतिशय सुंदर असून या हॉटेलमध्ये सर्व आधुनिक सुविधादेखील आहेत. त्यामुळेच या हॉटेलचे भाडे जास्त आहे. प्रियांका आणि निकचं लग्न २ डिसेंबरला असलं तरीही २९ तारखेपासून ते ३ तारखेपर्यंत सर्वजण याच महालात राहणार आहेत. अर्थात ५ दिवस सर्व वऱ्हाडी इथेच स्थायिक असणार आहेत. सर्व खास व्यक्तींनाच या लग्नाला बोलावण्यात आलं आहे. दरम्यान उमेद भवनमध्ये लग्न करण्यासाठी निवड ही प्रियांकानेच केली असल्याचं सांगण्यात येत आहे. देसी गर्ल पूर्णतः भारतीय संस्कारांमध्ये इथे निकबरोबर विवाहबद्ध होणार आहे. पण जोधपूर एअरपोर्टवरून हेलिकॉप्टरने उमेद भवन महालात हे जोडपं येणार असल्यामुळे त्यांचे फोटो पाहण्यासाठीही त्यांच्या चाहत्यांना वाट पाहावी लागणार आहे.
दोन पद्धतीने होणार लग्न
प्रियांकाने काही दिवसांपूर्वीच निक आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी thanksgiving पार्टी आयोजित केली होती. प्रियांका आणि निक एकमेकांची संस्कृती जपत असून दोन्ही पद्धतीने लग्न करणार आहेत. २ डिसेंबरला हिंदू पद्धतीने विवाह होणार असून ३ डिसेंबरला ख्रिश्चन पद्धतीने विवाह होणार आहे. दरम्यान दोन्ही विवाह उमेद भवन पॅसेसमध्येच पार पडणार आहेत. निक प्रियांकापेक्षा ११ वर्षांनी लहान आहे. तरीही दोघांची जोडी अतिशय सुंदर दिसत असून निक भारतीय पेहरावात कसा दिसेल याची उत्सुकता प्रियांका आणि निक दोघांच्याही चाहत्यांना नक्कीच लागून राहिली आहे.