भारतीय स्वातंत्र्यलढा हा असा विषय आहे की ज्यावर कितीही लिहावे, बोलावे,वाचावे तितके कमीच आहे. या विषयावर आजवर भारतीय चित्रपटसृष्टीत हिंदी तसेच अनेक प्रादेशिक भाषांमध्येही अनेक उत्तमोत्तम चित्रपट तयार झाले आहेत. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात हजारो क्रांतिकारकांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली आहे. अनेकांच्या बलिदानामुळे आज आपण हे स्वातंत्र्य उपभोगतो आहोत. त्यापैकी महात्मा गांधी, भगतसिंग,चंद्रशेखर आझाद यांसारख्या भारतातील स्वातंत्र्यसैनिकांवर आतापर्यंत अनेक चित्रपट बनले आहेत. भारताच्या स्वातंत्र्यासाठी हजारो क्रांतिकारकांनी त्यांचे आयुष्य वेचले, अशा स्वातंत्र्यसैनिकांमध्ये भगवान बिरसा मुंडा यांचेही नाव येते.आता लवकरच बिरसा मुंडा यांचे महान कार्य देखील आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
पा रंजित यांचे बॉलिवूडमध्ये पदार्पण
कबाली आणि काला सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक व चित्रपट निर्माते पा रंजित हे आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत आणि त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या बायोपिकमधून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी या चित्रपटावर काम करण्यास सुरुवात देखील केली आहे. पा रंजीत यांचा बायोपिक 2022 च्या अखेरीस बनण्यास सुरुवात होईल असा अंदाज आहे. शरीन मंत्री आणि किशोर अरोरा हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते नमः पिक्चर्स या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. भगवान बिरसा मुंडा यांच्या आयुष्याविषयी व त्यांच्या कार्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आणि स्क्रिप्टला अंतिम टच देण्यासाठी चित्रपटाच्या टीमने झारखंड आणि बंगालमध्ये जाऊन बराच अभ्यास केला. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितले की, ‘हा ऍक्शन ड्रामा अशा ठिकाणी शूट केला जाईल जिथे आजवर शूटिंग झालेले नाही. चित्रपटात अशा प्रकारची दृश्ये तसेच घनदाट जंगले मोठ्या पडद्यावर दाखवली जातील जी प्रेक्षकांनी कदाचित यापूर्वी कधीही पाहिली नसतील.’
दक्षिणेतले प्रसिद्ध दिग्दर्शक पा रंजित यांचे नाव सरपट्टा, परंबराई, मद्रास, रजनीकांत स्टारर कबाली आणि काला या तामिळ चित्रपटांसाठी घेतले जाते. या चित्रपटाबद्दल पा रणजित हे खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाविषयी बोलताना ते म्हणाले की, “’माझ्या पहिल्या हिंदी चित्रपटासाठी मला यापेक्षा चांगला प्रोजेक्ट सापडला नसता. या चित्रपटाची पटकथा आणि संशोधनाची प्रक्रिया खूप चांगली होती. भगवान बिरसा मुंडा यांच्या आयुष्यावरून मला प्रेरणा मिळाली. स्क्रिप्टिंग आणि संशोधनासाठी मी निर्मात्यांना त्यांनी घेतलेल्या कष्टांसाठी धन्यवाद देऊ इच्छितो.”
भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचा नवीन पिढीला होणार परिचय
बिरसा मुंडा हे झारखंडचे महान क्रांतिकारक आणि समाजसुधारक होते.तिथले स्थानिक आदिवासी त्यांना बिरसा भगवान म्हणतात. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी रांचीच्या उलिहाटू नावाच्या गावात झाला. उच्च प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी चरितार्थासाठी गौर पेडा येथील स्वामी कुटुंबात काम करण्यास सुरुवात केली. ते ज्यांच्या साठी काम करीत असत त्या व्यक्तीचे नाव आनंद पांडे होते. आनंद पांडे यांची सनातन धर्मावर श्रद्धा होती. ते वैष्णव होते. त्यांच्या संपर्कात आल्यावर बिरसा मुंडा देखील वैष्णव बनले. गावातील लोकांच्या सेवेत ते मग्न झाले. त्यांनी गावातील गोहत्या बंद केली. ते तुळशीची पूजा करून कपाळावर चंदनाचा टिळा लावत असत. एका मोठ्या आंब्याच्या झाडाखाली बसून ते आजारी लोकांना औषधे देत असत. म्हणून आदिवासी लोक त्यांना भगवान बिरसा म्हणू लागले.
भगवान बिरसा यांनी पूर्ण धैर्याने इंग्रजांशी लढा दिला. आदिवासी लोकांना एकजूट करून ब्रिटिशांच्या सत्तेच्या विरोधात त्यांनी सशस्त्र आंदोलन केले. त्यांनी आदिवासींना संघटित केले. त्यामुळे त्यांना अनेकदा अटकही झाली पण त्यांनी लढा देणे सुरूच ठेवले.त्यांनी ब्रिटीशांकडून आदिवासींच्या होणाऱ्या शोषणाविरुद्ध कडवा लढा दिला आणि त्यासाठी बलिदान दिले. त्यांच्या या महान कार्यामुळे ते इतिहासात अमर झाले.
त्यांच्या या महान कार्याची आपल्याला या चित्रपटातून माहिती मिळेल.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक