‘पॅडेड की पुशप’ या नावातच नक्की काय असणार याची कल्पना सर्वांनाच येत आहे. तर ही आहे हंगामा प्लेवरील नवी वेबसिरीज. पहिल्यांदाच मराठी भाषेमध्ये वेबसिरीज आली असून यामध्ये ‘पॅडेड की पुशप’ मध्ये अडकलेल्या आदित्यची गमतीदार कथा मांडण्यात आली आहे. अनिकेत विश्वासराव, तेजश्री प्रधान, सक्षम कुलकर्णी आणि किशोरी आंबिये यांच्या अफलातून अभिनयाने नटलेली ही पहिलीच मराठी वेबसिरीज 19 डिसेंबरपासून स्ट्रीमिंग होत आहे. या शो चे सात भाग असणार असून एकाच दिवशी प्रदर्शित करण्यात आले आहेत. मराठीमध्ये नेहमीच वेगळ्या धाटणीच्या विषयांना हात घातला जातो आणि पहिल्या वेबसिरीजमध्येदेखील हाच विचार करण्यात आलेला आहे.
बोल्ड पण मर्यादा ठेऊन केलेले मनोरंजन
प्रत्येक घरामध्ये महिलांना ब्रा हा प्रकार आवश्यक असतोच आणि याची माहिती प्रत्येक पुरुषालाही असते. पण साधारणतः मराठी घरांमध्ये किंवा अन्य बऱ्याच घरांमध्ये ब्रा विषयी बिनधास्त बोलायला कोणीही धजावत नाही. इतकंच काय अगदी इनरवेअर वाळत घालायचे म्हटले तरीही त्यावर एखादा टॉवेल किंवा फडका ठेऊन वाळत घातले जाते. असं असाताना मराठीत पहिलीच वेबसिरीज ही अशा विषयावर करण्याचं धाडस करण्यात आलं आहे आणि अनिकेत, तेजश्री आणि सक्षमने कोणतीही लाज न बाळगता यामध्ये अभिनय केला आहे. कोणतंही काम हे कमी दर्जाचं नसतं तर ते करण्यासाठी तितकीच मेहनत लागते हे यातून समाजामध्ये सांगण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं यावेळी हंगामाचे संस्थापक आणि कार्यकारी अधिकारी नीरज रॉय यांनी सांगितलं.
लगेच होकार दिला नाही – तेजश्री प्रधान
तेजश्रीने आतापर्यंत मराठीमध्ये अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिला नेहमीच सालस आणि साध्या अशा भूमिकांमध्ये प्रेक्षकांनी पाहिलं आहे. अर्थात या सिरीजमध्येही ती सालस आणि प्रेमळ बायकोची भूमिका साकारत असली तरीही त्यातील संवाद बोल्ड असल्यामुळे आणि विषय नक्की कसा हाताळणार याची आधी कल्पना नसल्यामुळे पहिल्यांदाच होकार न देता थोडा विचार करून होकार दिल्याचं यावेळी तेजश्रीने ‘POPxo मराठी’ला सांगितलं.
अनिकेत आणि सक्षमचं कॉमेडी टायमिंग
‘पॅडेड की पुशप’ मध्ये मुख्य भूमिकेत अनिकेत विश्वासराव असून त्याचा अगदी जवळचा मित्र असलेला सक्षम यांचं अफलातून कॉमेडी टायमिंग आणि केमिस्ट्री हा वेबसिरीजच्या ट्रेलरमधून दिसून येत आहे. सक्षमनेही आतापर्यंत वेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या आहेत आणि असा चमडी मित्र त्याने या वेबसिरीजमधून साकारला आहे. शिवाय सासूची भूमिकेत किशोरी आंबियेनेदेखील धमाल उडवून दिली असल्याचं ट्रेलरमधून दिसून येत आहे. हंगामा डिजीटल मीडिया आणि कॅफे मराठी यांनी या वेबसिरीजची निर्मिती केली असून या वेबसिरीजचं दिग्दर्शन आकाश गुरसाळे यांनी केलं आहे. सध्या वेबसिरीजची चलती आहे. आता या पहिल्याच मराठी वेबसिरीजला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील हे लवकरच कळेल.
video source – instagram