कर्करोग हा आजार संपूर्ण जगभरात होणाऱ्या मृत्यूंचे सर्वात मोठे कारण आहे आणि कर्करोगाच्या वेगवेगळ्या प्रकारांपैकी (पॅनक्रियाटिक) स्वादुपिंडाचा कर्करोग हा सर्वाधिक आढळणाऱ्या कर्करोगांच्या यादीत बारावा असला तरी मृत्यूंच्या प्रमुख कारणांमध्ये त्याचा क्रमांक चौथा आहे. पश्चिमी देशांच्या तुलनेत भारतात स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या केसेसची संख्या कमी आहे, दर वर्षी दर 1 लाख महिलांपैकी 2.4 आणि दर 1 लाख पुरुषांपैकी 1.8 जणांना हा कर्करोग होतो. दर वर्षी स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या जवळपास 14,500 नवीन केसेस आढळून येतात. दशकभर आधी हेच प्रमाण 12,500 इतके होते पण गेल्या दहा वर्षात त्यामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. हा आजार बहुतेक करून वयस्कर व्यक्तींना होतो. स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निदान ज्या वयामध्ये होते ते सरासरी वय पुरुषांमध्ये 71 वर्षे आणि महिलांमध्ये 75 वर्षे आहे. स्वादुपिंडाचा कर्करोग बरा होऊ शकतो का? त्याबाबत डॉ.तेजिंदर सिंग, कन्सल्टन्ट मेडिकल ऑन्कोलॉजी, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई यांची मुलाखत घेतली.
स्वादुपिंडाचा कर्करोग कसा होतो ?
स्वादुपिंडाचा कर्करोग स्वादुपिंडातील पेशींमध्ये तयार होतो. पाचक एन्झाइम्स आणि हार्मोन्स स्वादुपिंडामध्ये तयार होतात, त्यापैकी एक महत्त्वाचे असते इन्शुलिन, ही बाब जवळपास सर्वांनाच ठाऊक असते. बहुतेक केसेसमध्ये स्वादुपिंडाचा कर्करोग त्या भागापासून सुरु होतो जिथे पाचक एन्झाइम्स तयार होतात. हा आजार नेमका कशामुळे होतो हे जरी अद्याप ठाऊक नसले तरी त्याला कारणीभूत ठरणारे बरेच धोकादायक घटक कोणते असू शकतात ते कळून चुकले आहे, त्यामध्ये वाढते वय, धूम्रपान, स्थूलपणा, मधुमेह किंवा स्वादुपिंडाचा दाह असे आजार आधीपासून असणे, अति मद्यपान, हेलिकोबॅक्टर पायलोरी संसर्ग, हेपटायटीस बी विषाणू किंवा एचआयव्ही, लोणी, सॅच्युरेटेड फॅट्स, लाल मांस आणि प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ यांचे अति प्रमाण असलेला आहार, फळे आणि भाज्या कमी असलेला आहार, विशिष्ट जनुकांमधील बदल आणि कुटुंबात एखाद्या व्यक्तीला हा आजार असणे इत्यादींचा समावेश आहे.
अधिक वाचा – स्त्रियांमधील कर्करोग समज – गैरसमज
स्वादुपिंडाच्या कर्करोगाची लक्षणे आणि कारणे ?
स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये बऱ्याचदा अतिशय कमी लक्षणे असतात किंवा काहीच लक्षणे दिसून येत नाहीत. लक्षणे दिसायला लागेपर्यंत हा आजार जिथे उत्पन्न झालेला असतो तिथे बराच वाढलेला असतो किंवा शरीराच्या इतर पसरलेला असतो. ट्युमरचा आकार जसजसा वाढत जातो, तसतशी त्याची लक्षणे ट्युमर नेमका कुठे आहे त्यावर अवलंबून असतात. स्वादुपिंडाच्या हेड (पॅनक्रियाटिक हेड) या भागात ट्यूमर्स असल्यास पित्त नलिका किंवा स्वादुपिंडाच्या नलिका दबल्या जातात आणि त्यामुळे काविळीसारखे त्रास उद्भवू लागतात, त्वचा पिवळी पडते, डोळे पांढरे होतात. याची इतर लक्षणे विशिष्ट नसतात, पोटात दुखणे, वजन कमी होणे आणि सफेद मल (फॅटी स्टूल्स) अशी काही लक्षणे दिसून येतात. काही रुग्णांमध्ये सतत तहान लागणे, वारंवार लघवी होणे, थकवा येणे अशी मधुमेहाची लक्षणे देखील दिसून येतात.
वरील लक्षणांवरून डॉक्टरांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाबरोबरीनेच त्याची संभाव्य कारणे समजून घेण्यात मदत मिळू शकते पण स्वादुपिंडामध्ये ट्युमर आहे याची पुष्टी करण्यासाठी सीटी स्कॅन केले जाते. अल्ट्रासाऊंड आणि मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग (एमआरआय) सारख्या इतर इमेजिंग पद्धती देखील ट्यूमरचे स्थान, वाढ आणि प्रसार याबाबत अधिक माहिती देण्यास मदत करतात, यांच्या आधारे कर्करोगाचे स्टेजिंग केले जाते. बायोमार्कर्सचे स्तर, म्हणजेच कॅन्सर अँटीजेन्स देखील मोजले जातात आणि त्यामुळे उपचार नेमके कोणते व कशाप्रकारे करायचे हे ठरवण्यात मदत मिळते. कर्करोग कोणत्या टप्प्यात पोहोचला आहे त्यानुसार उपचार निश्चित केले जातात.ट्युमर जितक्या लवकर लक्षात येईल तितकी उपचारांची यशस्वी होण्याची शक्यता वाढते.याचे चार टप्पे असतात जे रोमन अंक I ते IV ने दर्शवले जातात.जितका टप्पा वरचा तितका ट्युमरचा आकार मोठा, आजूबाजूच्या टिश्यू, जवळपासच्या लिम्फ नोड्सपर्यंत किंवा शरीराच्या दूरवरच्या भागांपर्यंत प्रसार (मेटास्टेसेस) तितका जास्त असा त्याचा अर्थ होतो.
अधिक वाचा – चुकीच्या जीवनशैलीमुळे कर्करोग होऊ शकतो का, काय म्हणतात तज्ज्ञ
स्वादुपिंड कर्करोगाचे उपचार
कर्करोग ज्या अवस्थेत आहे त्यानुसार त्यावर उपचार काय करायचे याचा निर्णय एक मल्टिडिसिप्लिनरी टीम घेते, ज्यामध्ये सर्जन्स, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट्स, रेडिओलॉजिस्ट्स आणि रेडिओथेरपिस्ट्स यांचा समावेश असतो. शस्त्रक्रिया करून ट्युमर काढून टाकणे किंवा रिसेक्शन हा यावरील एकमेव रोगनिवारक उपचार आहे. कर्करोग पुन्हा उद्भवू नये यासाठी बऱ्याचशा ऊती देखील काढल्या जातात.पण सर्जरी आणि रिसेक्शन हे ज्यांच्यामध्ये कर्करोगाचे निदान तो पहिल्या टप्प्यात असतानाच झालेले असते अशा रुग्णांच्या बाबतीतच शक्य असते आणि अशा रुग्णांचे प्रमाण 20% पेक्षा कमी असते. केमोथेरपी किंवा केमोरेडिओथेरपी हे इतर पर्याय आहे जे वरच्या टप्प्यांमध्ये पोहोचलेल्या कर्करोगासाठी आणि शस्त्रक्रियेनंतर सहायक उपचार म्हणून वापरले जातात.स्वादुपिंडाच्या कर्करोगावर इम्युनोथेरपी औषधे क्लिनिकल चाचण्यांमध्ये आश्वासक परिणाम दर्शवत आहेत पण रुग्णांवर त्यांचा नियमित वापर केला जाण्यास अद्याप वेळ लागेल. आजार खूप बळावला आहे अशा केसेसमध्ये रुग्णाला नीट जगता यावे यासाठी सहायक आणि दुःखशामक काळजी देखील मोठी भूमिका बजावते. शस्त्रक्रियेनंतर आणि केमोथेरपी दरम्यान, रुग्ण शारीरिक आणि मानसिकरित्या बरे होण्यासाठी त्यांनी निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीचे पालन करणे महत्वाचे आहे.
अधिक वाचा – स्तनाचा कर्करोग तुमच्या त्वचेवर आणि केसांवर परिणाम करतो का
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक