सध्या प्रादेशिक चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजत आहेत. चित्रपट रसिकांना आता चांगल्या कलाकृतींचा आनंद घ्यायला भाषेचा अडसर जाणवेनासा झालाय. म्हणूनच दक्षिणेतील पुष्पाला लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले आणि आता मराठी चित्रपट देखील रसिकांची गर्दी खेचून घेत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीने कायमच अजरामर कलाकृती देऊन चित्रपटरसिकांचे मनोरंजन करण्याबरोबरच विविध ऐतिहासिक व सामाजिक विषय अत्यंत उत्कृष्टरित्या हाताळले आहेत. हल्लीच प्रदर्शित झालेल्या झिम्मा व झोंबिवली सारख्या मराठी चित्रपटांनाही चांगलेच यश मिळाले. आता शिवरायांच्या पराक्रमी मावळ्यांची कथा सांगणाऱ्या पावनखिंड (Pawankhind ) या चित्रपटाने एक नवा विक्रम करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
‘पावनखिंड’ ने केला विक्रम
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपले दैवतच! त्यांच्या दैदिप्यमान आयुष्यावर , त्यांच्या विविध मोहिमांवर अनेक चित्रपट यापूर्वीही येऊन गेलेत तरीही अजूनही शिवराय व त्यांना साथ देणाऱ्या शूरवीर मावळ्यांच्या पराक्रमाबद्दल जाणून घेण्यासारखे खूप काही आहे. नुकताच शिवजयंतीच्या पूर्वदिवशी ‘पावनखिंड’ (Pawankhind ) हा चित्रपट प्रदर्शित झाला. मागच्याच आठवड्यात प्रदर्शित झालेल्या पावनखिंडने आठवड्याच्या शेवटी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत सुरुवातीच्या वीकेंडमध्ये 6 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
पावनखिंडचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले असून या चित्रपटात अजय पुरकर, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, प्राजक्ता माळी, आस्ताद काळे, अंकित मोहन व समीर धमाधिकारी या दिग्गज कलाकारांसह अनेक कसलेले व प्रसिद्ध अभिनेते आहेत. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी या आधी फत्तेशिकस्त व फर्जंद या चित्रपटांचेही दिग्दर्शन केले होते. स्वराज्याच्या सुवर्णइतिहासाची गाथा सांगणाऱ्या त्यांच्या या तिसऱ्या ‘पावनखिंड’ चित्रपटाचीही सर्वत्र चर्चा घडते आहे आणि कलाकारांचे कौतुक होते आहे. हा चित्रपट यशस्वी होण्यामागे संपूर्ण टीमचीच मेहनत आहे. बाजीप्रभू देशपांडेंच्या बलिदानाची कथा सांगणाऱ्या पावनखिंड चित्रपटाला पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात 1500 हून अधिक शो मिळाले. एकाच दिवसांत इतके शो मिळणारा पावनखिंड हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. ‘पावनखिंड’ ने हा एक नवा विक्रमच घडवला आहे.
चित्रपटाच्या निमित्ताने इतिहासाची उजळणी
आपण सगळेच शाळेत असताना इतिहास हा विषय शिकताना महाराजांविषयी जाणून घेत शिकलो आहोत. महाराजांच्या विविध मोहीमा, त्यांची युद्धनीती, गनिमी कावा तसेच महाराजांच्या निष्ठावंत शिलेदारांविषयी ऐकत, वाचत आपण मोठे झालो. या चित्रपटाच्या निमित्ताने त्या इतिहासाची आपली उजळणी झाली. तर नव्या पिढीला आपल्या दैदिप्यमान इतिहासाची ओळख होते आहे.
पावनखिंड ( Pawankhind ) हा चित्रपट पावनखिंडीत झालेल्या रणसंग्रामाविषयी तसेच स्वामिनिष्ठ शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्याविषयी आहे. शिवरायांच्या मावळ्यांनी स्वराज्याच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले होते. त्यांच्यासाठी महाराज हे दैवत होते त्यामुळे त्यांची महाराजांवर अढळ निष्ठा होती. स्वराज्य उभे करण्यासाठी शत्रूचा नाश करताना मृत्यू जरी समोर आला तरी आधी महाराजांना दिलेले वचन पूर्ण करून मगच मृत्यूला आलिंगन देणारे असे ते पराक्रमी मावळे होते. बाजीप्रभू देशपांडेंच्या पवित्र बलिदानाने पावन झालेली ती घोडखिंड आज आपण पावनखिंड म्हणून ओळखतो. याच पावनखिंडीचा इतिहास हा चित्रपट सांगतो.
प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत होते
पावनखिंड हा चित्रपट येणार हे कळल्यापासून, त्याचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच चित्रपटरसिक व इतिहासप्रेमी या चित्रपटाची अगदी आतुरतेने वाट बघत होते. अखेर 18 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांनी या चित्रपटाला उदंड प्रतिसाद दिला. बरीच चित्रपटगृहे हाऊसफुल झाल्याने काहींना वेळेवर तिकीट मिळाले नाही म्हणून निराश होऊन घरी जावे लागले. हे बघून असेच दिसते की मराठी चित्रपटांवर प्रेक्षकांचे मनापासून प्रेम आहे. आणि महाराजांविषयीचा चित्रपट म्हटल्यावर तर बऱ्याच अमराठी रसिकांनी देखील हा चित्रपट आवर्जून बघितला.
चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता ‘पावनखिंड’ बॉक्स ऑफिसवर आणखी धुमाकूळ घालणार याबद्दल काहीच शंका नाही.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक