ADVERTISEMENT
home / आरोग्य
Postpartum Depression In Marathi

मातृत्वानंतरचे मानसिक आरोग्य, नैराश्याची कारणे आणि उपाय (Postpartum Depression In Marathi)

आई होणं म्हणजे बाईचा दुसरा जन्मच होण्यासारखं आहे असं म्हणतात. कारण गरोदरपण ते बाळंतपण या काळात स्त्रीच्या शरीर, मन आणि स्वभावात अनेक बदल घडत जातात. गर्भधारणा झाल्यापासून बाळाच्या संगोपनापर्यंत अनेक गोष्टी, शारीरिक बदल, त्रास, समस्या स्त्रीला सहन करावे लागतात. यासाठी बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेण्याआधीच तुम्हाला गरोदरपणाची लक्षणे नक्कीच माहीत असायला हवीत. या शिवाय जाणून घ्या गरोदरपणात बाळाची वाढ कशी होते (Stages Of Pregnancy In Marathi) कारण आपल्या शरीरात एका नव्या जीवाची निर्मिती होत आहे ही एक सुखद भावना आहे. ही भावना नेहमीच नवमातेला हे सर्व शारीरिक, मानसिक बदल मान्य करण्याची क्षमता देते. नाहीतर आई होणं ही काही सोपी गोष्ट नक्कीच नाही. अचानक होणाऱ्या या बदलांचा प्रत्येकीच्या मनावर खोलवर कुठेतरी परिणाम होत जातो. पती, माहेरची माणसं, सासरची माणसं, ऑफिस कर्मचारी, नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्याशी असलेले नाते अचानक बदलल्यासारखे वाटते. बाळ आणि बाळाचे संगोपन ही एकच गोष्ट प्राध्यान्य होते.  जबाबदारीने वागण्याची सवय लावण्यात कधी कधी ती  स्त्री स्वतःकडेही पुरेसं लक्ष देत नाही. शरीरात होणारे मानसिक, भावनिक आणि शारीरिक बदल नकारात्मक विचार निर्माण करतात. या आणि अशा अनेक गोष्टींमुळे पुढे त्या स्त्रीला सहन करावे लागते मातृत्त्वानंतर येणारे नैराश्य…बाळाच्या जन्मापर्यंत सहन केलेला शाररिक त्रास आणि बदल यामुळे मनावरील ताण इतका वाढत जातो की त्या स्त्रीचे मानसिक स्वास्थच बिघडून जाते. यासाठीच जाणून घ्या मातृत्त्वानंतर येणाऱ्या नैराश्याची लक्षणे, कारणे आणि उपाय (postpartum depression in marathi)

मातृत्त्वानंतर येणाऱ्या नैराश्याची लक्षणे (Symptoms Of Postpartum Depression In Marathi)

Symptoms Of Postpartum Depression In Marathi

गरोदरपण आणि बाळंतपणाच्या काळात शारीरिक आणि मानसिक बदलांमुळे स्त्रीमध्ये ही मातृत्त्वानंतर येणाऱ्या पोस्ट पार्टम डिप्रेशन (postpartum depression in marathi ) लक्षणे दिसू शकतात.

  • बाळाच्या जन्मानंतर स्त्रीची  भूक कमी होते. बाळाला स्तनपान करूनही मनासारखे खाण्याची इच्छा होत नाही.
  • वास्तविक बाळाच्या जन्मानंतर स्त्रीला झोपेची समस्या जाणवतेच. मात्र जर ती स्त्री मानसिक तणावाखाली असेल तर तिला अनिद्रेचा त्रास जाणवू शकतो.
  • सतत थकल्यासारखे वाटणे आणि कोणतीही गोष्ट करण्याचा उत्साह न वाटणे हेही मातृत्त्वानंतर येणारे नैराश्याचे लक्षण आहे.
  • अशा महिलांच्या मनात सतत अपराधीपणाची भावना निर्माण होत राहते.  आपण पती, घर, नोकरी, मुलं यांची जबाबदारी योग्य पद्धतीने सांभाळत नाही असं तिला वाटतं. मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांमुळे सतत आत्महत्या करण्याचे विचार मनात येण्याची शक्यता वाढते.
  • कोणतेही काम करण्यामधील पूर्वाचा उत्साह कमी झाल्यामुळे कामात मन लागत नाही.
  • मन:स्वास्थ बिघडल्यामुळे तुमच्या स्मरणशक्तीवर याचा परिणाम होतो आणि तुम्हाला गोष्टी आठवत नाहीत. 
  • मनात सतत एक अज्ञात भीती सतावत राहते. ज्याचे कारण तुम्ही शोधू शकत नसल्यामुळे असहाय्य असल्यासारखे वाटते. कारण नसताना छोट्या छोट्या गोष्टींवरून सतत रडायला येते. ज्यामुळे तुम्ही कायम निराश आणि दुःखी राहता.
  • बाळ आणि घरातील जबाबदाऱ्यांची अती काळजी वाटणे.
  • स्वभाव नेहमीपेक्षा जास्त चिडचिडा झाल्यामुळे इतर लोकांवर त्याचा सतत राग काढत राहणे. 

मातृत्त्वानंतर येणाऱ्या नैराश्याची कारणे (Causes Of Postpartum Depression In Marathi)

Causes Of Postpartum Depression In Marathi

गरोदरपण, प्रसूती आणि बाळंतपण या प्रत्येक टप्प्यामध्ये प्रत्येक स्त्रीमध्ये निरनिराळी लक्षणे आणि परिणाम जाणवतात. त्यामुळे मातृत्त्वानंतर येणारे नैराश्य म्हणजेच पोस्टपार्टम डिप्रेशन (postpartum depression in marathi) का येते याची कारणे प्रत्येकीसाठी निरनिराळी असू शकतात. यासाठी जाणून घ्या काही ठराविक कारणे 

  • सर्वात महत्त्वाचे  कारण असते गरोदरपण आणि बाळंतपणात स्त्रीच्या शरीरात होणारे बदल. शारीरिक वजन, सौंदर्य यात बदल झाल्यामुळे मातृत्त्वानंतर नैराश्य येण्याची शक्यता असते. यासाठी वाचा डिलीवरी नंतर पोट कमी करणे यासाठी उपाय (Delivery Nantar Pot Kami Karnyache Upay)
  • यासोबतच आणखी एक कारण या नैराश्य येण्याला कारणीभूत असू शकतं ते म्हणजे नातेसंबधामध्ये आलेला दूरावा. बाळाच्या जन्मानंतर पतीपत्नीच्या नात्यात बदल होतात. पूर्वीपेक्षा नात्यात शारीरिक दूरावा येणे हे एक कारण या नैराश्य येण्यामागे असू  शकते. 
  • गरोदरपण आणि  बाळंतपणात स्त्रीसाठी बाळ हे प्राधान्य असल्यामुळे ती स्वतःसाठी पुरेसा वेळ काढू शकत नाही. याचा परिणाम तिच्या मानसिक स्थितीवर होतो.
  • बाळ आणि बाळाच्या जागं राहण्याच्या वेळ पाळण्यात नवमातेला बऱ्याचदा  पुरेशी झोप घेता येत नाही. ज्यामुळे स्त्रीचे मानसिक स्वास्थ कमी होते.
  • आई होणं ही एक खूप मोठी जबाबदारी असल्यामुळे अशा स्त्रीच्या मनावर सतत चांगली अथवा आदर्श माता होण्याचा दबाव असतो. ज्यामुळे ताणतणाव वाढतो आणि मानसिक आरोग्य बिघडते. 

मातृत्त्वानंतर येणारे नैराश्य टाळण्यासाठी काय करावे (How To Prevent Postpartum Depression In Marathi)

How To Prevent Postpartum Depression In Marathi

मातृत्त्वानंतर येणारे नैराश्याची लक्षणे दिसतात योग्य ते उपचार घेत यावर मात करता येते. यासाठी औषधे, मानसिक थेरपी आणि कुटुंबाची साथ असण्याची गरज आहे. या व्यतिरिक्त काही गोष्टींची काळजी घेतल्यास मातृत्त्वानंतर येणारे नैराश्य (postpartum depression in marathi) टाळता देखील येऊ शकते.

ADVERTISEMENT
  • बाळंतपणानंतर जवळजवळ एक वर्ष महिलांना घरातून चांगले मानसिक पाठबळ मिळाले तर हा त्रास वाचवता येऊ शकतो.
  • बाळाच्या संगोपनाची जबाबदारी फक्त आईची नाही. यात पिता, आजी-आजोबा आणि मदतनीसाची मदत घेण्यात काहीच गैर नाही.
  • बाळंतपणानंतर मनात येणाऱ्या भावना मनातच ठेवण्यापेक्षा तुमच्या जवळच्या व्यक्तीजवळ व्यक्त करा. म्हणजे तुम्ही या नैराश्याच्या आहारी जाणार नाही.
  • बाळंतपणानंतर जितका शक्य असेल तितका आराम करा. बाळ रात्रीचे झोपत नसेल तर बाळाच्या वेळेनुसार तुमची झोपण्याची वेळ बदला.
  • बाळंतपणानंतर नैराश्य टाळायचं असेल तर स्वतःला सतत आनंदी ठेवा आणि घरातील वातावरण प्रसन्न राहिल याची काळजी घ्या.
  • बाळंतपणानंतर योग्य आणि संतुलित आहार घ्या. नियमित प्रसूतीनंतरचा व्यायाम आणि योगासने करा. ज्यामुळे शरीर आणि मन स्वस्थ राहिल.
  • तुमच्या आवडत्या व्यक्ती जसं की आई, बहीण, मैत्रीण, बाबा यांच्यासोबत फोनवर गप्पा मारा अथवा त्यांना भेटा.
  • बाळाची जबाबदारी त्याच्या बाबांवर द्या आणि मस्त पार्लर अथवा स्पामध्ये जाऊन रिलॅक्स व्हा.
  • मनासारखी शॉपिंग करा ज्यामुळे तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल.
  • बाळाची जबाबदारी आईबाबा, सासूसासऱ्यांकडे द्या आणि  पतीसोबत डिनर डेट, मुव्ही डेट अथवा सहज कॉफीसाठी  बाहेर जा. 

मातृत्त्वानंतर येणाऱ्या नैराश्याबाबत निवडक प्रश्न – FAQ’s

1. आई झाल्यावर मन:स्थिती बदलणं सामान्य आहे का ?

बाळंतपणानंतर शरीरात होणारे बदल, मानसिक  आणि भावनिक बदल हे सामान्य आहेत. प्रत्येकीला यातून जावे लागते. काही काळानंतर तुमचे जीवन पुन्हा पूर्ववत होईल. त्यामुळे आता उगाच याची चिंता करू नका. 

2. मातृत्त्वानंतर येणारे नैराश्य किती काळ असू शकते ?

मातृत्त्वानंतर येणाऱ्या नैराश्याला बेबी ब्लूज असंही म्हणतात मात्र ते बाळंतपणानंतर पहिले काही आठवडेच जाणवते. जर तुम्ही सहा महिने  अथवा वर्षभर या मानसिक अवस्थेत  असाल तर तुम्हाला तज्ञ्जांचा सल्ला घ्यायला हवा. 

3. मातृत्त्वानंतर येणारे नैराश्य आणि बेबी ब्लूजमध्ये काय फरक आहे ?

मातृत्त्वानंतर येणारे नैराश्य ही एक खूप काळ जसं की वर्ष, दोन वर्ष जाणवणारी मानसिक आणि गंभीर समस्या आहे. तर बेबी ब्लूज फक्त डिलीव्हरीच्या नंतर काही आठवडे होणारी एक मानसिक अवस्था आहे. 

16 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT