प्रियांका आणि निकच्या लग्नाची भरपूर चर्चा झाली. काही दिवसांपूर्वीच राजस्थानमधील जोधपूरमध्ये झालेल्या लग्नानंतर आज मुंबईत Nickyanka ने आपल्या मित्र मंडळींसाठी रिसेप्शन आयोजित केले. यामध्ये दोघेही ‘रॉयल ब्लू’ लुकमध्ये दिसले. प्रियांकाने आपल्या लग्नापासून प्रत्येक लुक वेगळा ठेवला असून आताही रिसेप्शनला इंडियन आणि वेस्टर्न असा मिक्स संस्कृतीचा मेळ तिने साधला आहे. इंडियन लुक असलेला मात्र तरीही पाश्चात्य संस्कृती जपणारा असा लुक या रिसेप्शनच्या वेळी पाहायला मिळाला आहे. निकनेदेखील प्रियांकाला साजेसे कपडे परिधान केले आहेत. करड्या रंगाच्या सूटमध्ये निकदेखील अतिशय देखणा दिसत आहे. प्रियांका आणि निकने 1 आणि 2 डिसेंबरला ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीने विवाह केला. त्यानंतर ते ईशा अंबानीच्याही लग्नामध्ये सहभागी झाले आणि आता काही आपल्या मित्रमंडळींसाठी आज मुंबईमध्ये दोघांनी रिसेप्शन आयोजित केलं आहे. यामध्ये अगदी मुंबईच्या आरजेपासून सर्वांना आमंत्रित करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर त्यांच्या रिसेप्शनच्या कार्डावर बारकोडही छापण्यात आला आहे. त्यामुळे आतमध्ये जाण्यासाठी प्रत्येकाला या बारकोडनुसारच जावं लागणार आहे.
रिसेप्शनपूर्वी मीडियासाठी दिली खास पोझ
प्रियांका आणि निकने रिसेप्शन चालू होण्यापूर्वी मीडियासाठी खास पोझ दिली. प्रियांकाने घातलेल्या ड्रेसवर तिने आपल्या कपड्यांना साजेशी ज्वेलरी परिधान केली असून अगदी खास भारतीय पेहराव तिने यावेळी घातला आहे. तसंच जास्तीत जास्त साधं राहण्याचाही प्रियांकाचा प्रयत्न असल्याचा यातून जाणवत आहे. यावेळी प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनीही गोल्डन रंगाची साडी नेसली असून येणाऱ्या पाहुण्याचं स्वागत करताना दिसून आल्या. यावेळी प्रियांका आणि निक दोघेही अगदी एकमेकांकडेच पाहत होते. नव्या नवरीचं तेज प्रियांकाच्या चेहऱ्यावर आलेलंदेखील यावेळी पाहायला मिळालं.
प्रियांका आणि निकचं दुसरं रिसेप्शन
यापूर्वी लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी प्रियांका आणि निकने दिल्लीमध्ये रिसेप्शन आयोजित केलं होतं. या रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील हजेरी लावली होती. तर आता हे दुसरं रिसेप्शन मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलं असून बॉलीवूडमधील आपल्या मित्रमंडळींना प्रियांकाने आमंत्रित केलं आहे. शिवाय या रिसेप्शनमध्ये प्रियांकाच्या व्यवसायाशी निगडीत असलेल्या व्यक्तींना आमंत्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे आज अवघं बॉलीवूड या दोघांना शुभेच्छा द्यायला उपस्थित राहील यात शंका नाही.
फोटो सौजन्य – instagram, manav manglani