एखाद्यावेळी आपले काम इतके जास्त होते की, त्यामुळे आपल्याला अंगदुखीचा त्रास अगदी जाणवतोच. वयोमानानुसार होणारी अंगदुखी आणि स्ट्रेस किंवा धकाधकीमुळे होणारी अंगदुखी ही वेगळीच असते. कधीतरी खूप काम झाले, सामान उचचले, दिवसभर उभे राहिलो की, पाय दुखू लागतात. अंग अगदी मोडल्यासारखे होते. अशावेळी गोळ्या खाणे किंवा इंजेक्शन घेणे, आराम करणे असे काही पुरेसे नसते. यावर थोडे सोपे उपाय केले तर तुम्हाला नक्कीच थोडा आराम मिळू शकतो. आम्ही सुचवत असलेले हे पर्याय फार काही कठीण नाही तुम्ही अगदी सहज हे उपाय करु शकता. चला जाणून घेऊया अंगदुखीसाठी सोपे पण परिणामकारक असे उपाय
गरम पाण्याची आंघोळ
सगळ्यात सोपा आणि अंग दुखी कमी करणारा असा हा उपाय आहे. ज्यावेळी तुम्ही खूप थकून भागून येता. तुमचे खूप अंग दुखत असेल अशावेळी तुम्ही चक्क गरम पाण्याची आंघोळ करा. पाण्यामध्ये मीठ घालून ही आंघोळ केली तर तुम्हाला जास्त लवकर बरे वाटेल. त्यामुळे तुम्ही अंगाला सहन होईल एवढ्या गरम पाण्याने छान आंघोळ करा. ही आंघोळ साबण लावून केलेली नसेल तरी चालेल नुसतं गरम पाणी अंगावर येऊ द्या. त्यामुळेही तुम्हाला आराम मिळण्यास मदत मिळेल. दिवसातून किमान दोनवेळा तुम्ही असे केले तर तुम्हाला त्यामुळे नक्कीच बरे वाटेल.
टीप: जर असेल तर शॉवरने आंघोळ न करता बादलीत पाणी घेऊन त्यात मीठ टाकून आंघोळ करावी. जो भाग दुखतोय तिथे अधिक पाणी घालावे.
पायाला शेक
खूप जणांना सतत उभे राहिल्यामुळे पाय सुजणे, पाय अगदी तुटल्यासारखे वाटणे, टाचा, चौड्यातून कळा येणे असा त्रास होतो. तुमचे काम सतत उभे राहून असेल अशावेळी तुम्ही मस्त गरम पाण्यात पाणी टाकून बसा. त्यामुळे पायांच्या नसांवर आलेला ताण कमी होण्यास मदत मिळते. आता पायदुखी एका मिनिटात बरे होईल असे सांगता येणार नाही. पण तुम्हाला त्यामुळे नक्कीच थोडासा फरक झालेला जाणवेल. पायाला सहन होईल इतके कडक पाणी तुम्ही घ्या आणि त्यात खडे मीठ टाकून पाय बुडवा. असे तुम्हाला किमान दोन ते तीन वेळा नक्कीच करावे लागेल.
बाम मसाज
बाजारात अनेक बाम मिळतात. जर तुमचा पाय किंवा गुडघा दुखत असेल तर अशावेळी तुम्ही तुमच्या पायाला, पाठीला, कंबरेला मस्त बाम लावून घ्या. तो जास्त चोळला नाही तरी देखील चालू शकेल. पण ते लावल्यानंतर लगेचच अंगावर जाड अशी चादर घ्या. त्यामुळे होतं असं की, त्या बामाची वाफ आपल्याला मिळत राहते. त्यामुळेही आराम मिळण्यास मदत होते. कधी कधी जर तुम्ही जास्त बाम लावला तर त्यामुळे जळजळ देखील होऊ शकते. त्वचा नाजूक असते. या अशाप्रकारे बामाचा वापर केल्यामुळे त्वचेला अधिक त्रास देखील होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो तुम्ही या बाम बेताने लावा. खूप दुखतंय म्हणून खूप बाम लावू नका. त्यामुळे लगेच बरे वाटणार नाही.
आता या सोप्या आणि घरगुती उपायांनी तुमची अंग दुखी करा कमी