पावसाळा सुरू झाल्यानंतर एक वेगळाच फील सगळ्यांच्या मनात असतो. विशेषतः पावसाळ्यात रोमँटिक वातावरण अधिक प्रमाणात दिसून येते. पाऊस सुरू झाला की, घरात कांदाभजी आणि पावसाळा कविता (Rain Poems In Marathi), खिडकीत बसणं हे एक समीकरणच आहे. पहिला पाऊस सुरू झाल्यावर पहिला पाऊस कविता (Marathi Kavita On Nature And Rain) ही आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. मराठी पावसाळी कविता (Marathi Poem On Rain) ही पावसाळ्यात मनाला अधिक भावते. पाऊस कविता म्हटलं की आपल्याला मराठीतील अनेक कविताही आठवतात. अशाच काही पाऊस कविता (Rain Poems In Marathi) खास तुमच्यासाठी. मस्तपैकी पावसाळा सुरू झाल्यावर आपल्या जोडीदाराचा हात हातात घ्या, चहाचा घोट आणि पावसाळी कविता हे उत्तम समीकरण जमवून आणा आणि पावसाचा आनंद घ्या!
पाऊस कविता मराठी – पाऊस
पाऊस म्हटलं की कवयित्री शांता शेळके यांचं नाव ओठावर येणार नाही असं अजिबातच नाही होणार. मराठी साहित्यात पाऊस कविता मराठी शांता शेळके यांच्या नेहमीच मनावर राज्य करणाऱ्या आहेत. याशिवाय मंगेश पाडगावकर, संदीप खरे यांच्याही कविता या मनाला वेगळाच आनंद देऊन जाणाऱ्या आहेत. अशीच पाऊस कविता मराठी (Rain Poems In Marathi ) तुम्ही वाचा आणि पावसाळ्यात आनंद घ्या.
1. आला पाऊस मातीच्या वासांत ग
मोती गुंफ़ित मोकळ्या केसांत ग
आभाळात आले, काळे काळे ढग
धारा कोसळल्या, निवे तगमग
धुंद दरवळ, धरणीच्या श्वासात ग ॥ १ ॥
कोसळल्या कश्या, सरीवर सरी
थेंब थेंब करी नाच पाण्यावरी
लाल ओहळ वाहती जोसांत ग ॥ २ ॥
लिबोळ्यांची रास कडूनिंबाखाली
वारा दंगा करी, जुइ शहारली,
चाफा झुरतो, फुलांच्या भासात ग ॥ ३ ॥
झाडांवरी मुके, पाखरांचे थवे
वीज लालनिळी, कशी नाचे लवे
तेजाळते उभ्या अवकाशांत ग ॥ ४ ॥
वीज कडाडतां, भय दाटे उरीं
एकलि मी इथे, सखा राहे दुरी
मन व्याकूळ, सजणाच्या ध्यासांत ग ॥ ५ ॥ – शांता शेळके
2. मधुनीच वीज थरथरते
क्षण प्राण उजळुनी विरते
करी अधिक गहन अंधारा रे
बाहेर बरसती धारा रे
स्थिर अचल दिशांतुन दाही
निःशब्द वेदना काही
का व्याकुळ आज किनारा रे
बाहेर बरसती धारा रे
मी उन्मन, काही सुचेना
लाटांत निमंत्रण प्राणां
भरतीत मलाच इशारा रे
बाहेर बरसती धारा रे
हे मुक्त अनावर सगळे
आकाश इथून मज दिसले
घर गमे आज मज कारा रे
बाहेर बरसती धारा रे
मी उन्मन, काही सुचेना
लाटांत निमंत्रण प्राणां
भरतीत मलाच इशारा रे
बाहेर बरसती धारा रे – मंगेश पाडगावकर
3. पाऊस आलाय…
पाऊस आलाय….भिजून घ्या
थोडा मातीचा गंध घ्या
थोडा मोराचा छंद घ्या
उरात भरून आनंद घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या
बघा समुद्र उसळतोय
वारा ढगांना घुसळतोय
तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या
ऑफ़ीस रोजच गाठत असतं
काम नेहमीच साठत असतं
मनातून भिजावंसं वाटत असतं
मनाची हौस पुरवून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या
सर्दी पडसे रोजचेच..
त्याला औषध तेच तेच..
प्यायचेच आहेत नंतर काढे ,
आधी अमृत पिऊन घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या
बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या – नितेश होडबे
4. अग्गोबाई ढग्गोबाई, लागली कळ ।
ढगाला उन्हाची केवढी झळ ।
थोडी न् थोडकी लागली फार ।
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार ।।
वारा वारा गरागरा सो सो सूम् ।
ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम ।
वीजबाई अशी काही तोऱ्यामधे खडी ।
आकाशाच्या पाठीवर चमचम छडी ।।
खोलखोल जमिनीचे उघडून दार ।
बुडबुड बेडकाची बडबड फार ।
डुंबायला डबक्याचा करूया तलाव ।
साबु-बिबु नको थोडा चिखल लगाव ।। – संदीप खरे
5. भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची ।
धुंद वादळाची होती रात्र पावसाची ।।
कुठे दिवा नव्हता, गगनी एक ही न तारा ।
आंधळ्या तमातुन वाहे आंधळाच वारा ।
तुला मुळी नव्हती बाधा भीतिच्या विषाची ।।
क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारून नीती ।
नावगाव टाकुनि आली अशी तुझी प्रीती ।
तुला परी जाणिव नव्हती तुझ्या साहसाची ।।
केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली ।
ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली ।
श्वासांनी लिहिली गाथा प्रीतिच्या रसाची ।।
सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास ।
स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास ।
सुखालाहि भोवळ आली मधुर सुवासाची ।। – मंगेश पाडगावकर
पहिला पाऊस कविता | 1st Rain Poems In Marathi
पहिला तुफान पाऊस आणि तुझी आठवण….
एकाच छत्रीत कणीस खात मनसोक्त आनंद
समुद्रकाठी जाऊन येणाऱ्या गार वाऱ्याचा स्पर्श
तुझ्या जवळ असण्याने येणारी शिरशिरी – दिपाली नाफडे
अशाच काही पाऊस कविता आणि पहिला पाऊस कविता घेऊन तुमच्यासाठी आम्ही हा लेख आणला आहे. पहिला पाऊस म्हटलं की अनेक आठवणी आणि साठवणीही असतात. त्याचाच अनुभव खास तुमच्यासाठीही.
1. पहिला तुफान पाऊस आणि तुझी आठवण….
एकाच छत्रीत कणीस खात मनसोक्त आनंद
समुद्रकाठी जाऊन येणाऱ्या गार वाऱ्याचा स्पर्श
तुझ्या जवळ असण्याने येणारी शिरशिरी
न सांगताही वाफळलेली कॉफी तू माझ्यासाठी विकत घेणं
आजूबाजूला बसलेल्या लोकांची पर्वा न करता एकमेकात गुंतून जाणं
न बोलता फक्त त्या पावसाची मजा घेणं
न बोलता तू मला आणि मी तुला समजून घेणं
आता आठवणीतल्या तुला जपूनही तू माझं असणं मला कधी तुझ्यापासून दुरावू नाही शकलं
पण पाऊस असा आला की फक्त तुझं असणं जास्त गरजेचं….
पहिला तुफान पाऊस आणि तुझी आठवण….– दिपाली नाफडे
2. टप टप टप काय बाहेर वाजतंय् ते पाहू ।
चल् ग आई, चल् ग आई, पावसात जाऊ ।।
भिरभिरभिर अंगणात बघ वारे नाचतात !
गरगर गरगर त्यासंगे, चल गिरक्या घेऊ ।।
आकाशी गडगडते म्हातारी का दळते ?
गडड्गुडुम गडड्गुडुम ऐकत ते राहू ।।
ह्या गारा सटासटा आल्या चटाचटा ।
पट् पट् पट् वेचुनिया ओंजळीत घेऊ ।।
फेर गुंगुनी धरू, भोवऱ्यापरी फिरू ।
“ये पावसा, घे पैसा”, गीत गोड गाऊ ।।
पहा फुले, लता-तरू, चिमणी-गाय-वासरू ।
चिंब भिजती, मीच तरी, का घरात राहू ? – श्रीनिवास खारकर
3. ढग दाटूनि येतात, मन वाहूनी नेतात ।
ऋतु पावसाळी सोळा, थेंब होऊनी गातात ।।
झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची । सर येते माझ्यात ।।
माती लेऊनीया गंध, होत जाते धुंद धुंद ।
तिच्या अंतरात खोल अंकुरतो एक बंध ।
मुळे हरखूनि जातात, झाडे पाऊस होतात ।
ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात ।।
झिम्मड पाण्याची ……
सुंबरान गाऊ या रं, सुंबरान गाऊ या ।
झिलरी झिलरी आम्ही तुम्ही, सुंबरान गाऊ या ।
सुंबरान गाऊ या रं, सुंबरान गाऊ या ।।
जीव होतो ओला चिंब, घेतो पाखराचे पंख ।
साऱ्या आभाळाला देतो एक ओलसर रंग ।
शब्द भिजूनि जातात अर्थ थेंबांना येतात ।
ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात ।।
झिम्मड पाण्याची …….अशोक पत्की
4. केतकीच्या बनी तिथे, नाचला ग मोर ।।
गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर ।।
पापणीत साचले, अंतरात रंगले ।
प्रेमगीत माझिया मनामनात धुंदले ।
ओठांवरी भिजला ग आसावला सूर ।।
भावफूल रात्रिच्या अंतरंगि डोलले ।
धुक्यातुनी कुणी आज भावगीत बोलले ।
डोळियांत पाहिले, कौमुदीत नाचले ।
स्वप्नरंग स्वप्नीच्या सुरासुरांत थांबले ।
झाडावरी दिसला ग भारला चकोर ।। – अशोक परांजपे
5. झिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात।
प्रियाविण उदास वाटे रात ।।
बरस बरस तू मेघा रिमझिम, आज यायचे माझे प्रियतम ।
आतुरलेले लोचन माझे बघती अंधारात ।।
प्रियाविण उदास वाटे रात ।।
प्रासादी या जिवलग येता, कमळमिठीमधि भृंग भेटता ।
बरस असा की प्रिया न जाइल माघारी दारात ।।
प्रियाविण उदास वाटे रात ।।
मेघा असशी तू आकाशी, वर्षातुन तू कधी वर्षसी ।
वर्षामागुन वर्षति नयने, करिती नित बरसात ।।
प्रियाविण उदास वाटे रात ।। – पी. सावळाराम
मनीचा पाऊस मराठी कविता | Marathi Poem On Rain
पाऊस मनीचा मराठी कविता अर्थात मनातल्या काही पावसाच्या कविता तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही या लेखाचा आधार घ्या. शांता शेळके आणि इतर साहित्यातील कवींच्या काही पाऊस कविता (Rain Poems In Marathi).
1. ऋतु हिरवा, ऋतु बरवा, पाचूचा वनि रुजवा ।
युग विरही हृदयांवर सरसरतो मधु शिरवा ।। ऋतु हिरवा ।।
भिजुनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती ।
नितळ निळ्या अवकाशी मधुगंधी तरल हवा ।।
मनभावन हा श्रावण, प्रियसाजण हा श्रावण ।
भिजवी तन, भिजवी मन हा श्रावण ।।
थरथरत्या अधरांवर प्रणयी संकेत नवा ।।
नभी उमटे इंद्रधनू, मदनाचे चाप जणू ।
गगनाशी धरणीचा जुळवितसे सहज दुवा ।। – शांता शेळके
2. पाऊस आला, वारा आला, पान लागले नाचू ।
थेंब टपोरे गोरे गोरे, भर भर गारा वेचू ।।
गरगर गिरकी घेते झाड, धडधड वाजे दार कवाड ।
अंगणातही बघता बघता, पाणी लागे साचू ।।
अंगे झाली ओलीचिंब, झुलू लागला दारी लिंब ।
ओली नक्षी, पाऊसपक्षी, कुणी पाहतो वाचू ।।
ओसरुनी सर गेली रे, उन्हे ढगांतुन आली रे ।
इंद्रधनुष्यामध्ये झळकती, हिरे माणके पाचू ! – शांता शेळके
3. टिप टिप पाऊस
झो झो वारा
गीत गाऊ पाहतो
आसमंत सारा
कडाडणारी वीज
गडगडणारे ढग
धावण्यार्या छत्रीतली
आपली लगबग
डराव् डराव् बेडकं
छम छम तळे
लेझीम हाती घेऊनी जणू
थेंब लाटेवर पळे
खळ खळ झरा
तड तड पत्रा
पावसाने भरवली बघा
ताला सुरांची जत्रा
4. ढगांची पळपळ
थेंबाची ओंजळ
मृदेची सळसळ
बेधुंद तो दरवळ
पहिला थेंब खेळ
छतावरून घरंगळ
उतारावर ओघळ
पाखरांची अंघोळ
सांज पाऊस वेळ
पोरांचे पाण खेळ
मळभ अंधारखेळ
विजेची बंद वेळ
लोकांची पळपळ
वाहनांची वर्दळ
5. पाऊस कोसळे हा
अंधारले दिसे
डोळे भरून आले
माझे असे कसे?
गेल्या बुडून वाटा
गेली बुडून राने
झाले उदास गाणे
माझे असे कसे?
या पावलांस लाटा
ओढून खोल नेती
हे प्राण ओढ घेती
माझे असे कसे?
का सांग याद येते?
एकांत हा सभोती
हे सूर डोह होती
माझे असे कसे?
पुन्हा कालचा पाऊस कविता | Marathi Kavita On Nature And Rain
दरवर्षीप्रमाणे यंदाही तो मनसोक्त बरसला,
जमिनीशी मिलन झाल्याच्या आनंदात हलकेच हसलायाही वर्षी दरवळला मातीचा सुगंध,
थंडगार वाऱ्याच्या स्पर्शाने शहारले सर्वांग – वेद बर्वे
पुन्हा कालचा पाऊस म्हटला की आठवणी जमा होतात आणि मग पावसाच्या धारांबरोबर त्या आठवणीही बरसू लागतात. अशाच काही कालच्या पावसाच्या आठवणी. ग. दि. माडगूळकर आणि अशा साहित्यातील नावाजलेल्या कवींच्या काही पाऊस कविता.
1. दरवर्षीप्रमाणे यंदाही तो मनसोक्त बरसला,
जमिनीशी मिलन झाल्याच्या आनंदात हलकेच हसला
याही वर्षी दरवळला मातीचा सुगंध,
थंडगार वाऱ्याच्या स्पर्शाने शहारले सर्वांग
यंदाही नकळत तिच्यासाठी चार ओळी स्फुरल्या,
मनातल्या भावना अलगद ओठांवर तरळल्या
ओठांवरील शब्द लागलीच कागदावर उतरवले,
तिच्यापर्यंत पोहचवण्यासाठी ते लिफाफ्यात बंद केले
बरेच महिने तिच्याशी संवाद न झाल्यामुळे मन थोडे उदास होते,
मात्र आता हातातल्या लिफाफ्याने मनाला पुन्हा प्रफुल्लित केले होते
तडक उठलो, दारामागे लटकवलेली छत्री घेतली,
पत्र छातीशी कवटाळलेआणि पावलं पोस्टाकडे वळवली
मनात थोडीशी धाकधुक होती, आता तरी तिचा राग जाईल का याची चिंता होती
दूर सारुन साऱ्या विचारांना, प्रसन्न मुद्रेने दरवाजा उघडला,
इतक्यात तिच्या गावचा पाहुणा लग्नाची पत्रिका घेऊन उंबऱ्यात धडकला – वेद बर्वे
2. रिमझिम पाऊस पडे सारखा,
यमुनेलाही पूर चढे,
पाणीच पाणी चहूकडे, ग बाई,
गेला मोहन कुणीकडे ।।
तरुवर भिजले भिजल्या वेली,
ओली चिंब राधा झाली,
चमकुन लवता वरती बिजली,
दचकुन माझा ऊर उडे ग बाई,
गेला मोहन कुणीकडे ।।
हाक धावली कृष्णा म्हणुनी,
रोखुनी धरली दाही दिशानी,
खुणाविता तुज कर उंचावुनी,
गुंजत मंजुळ मुग्ध चुडे ग बाई,
गेला मोहन कुणीकडे ।।
जलाशयाच्या लक्ष दर्पणी,
तुझेच हसरे बिंब बघुनी,
हसता राधा हिरव्या रानी,
पावसातही ऊन पडे, ग बाई,
गेला मोहन कुणीकडे ।। – ग. दि. माडगूळकर
3. श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे ।
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे ।।
वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे ।
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे ।।
झालासा सूर्यास्त वाटतो, सांज अहाहा ! तो उघडे ।
तरूशिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे ।।
उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा ।
सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा ।।
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते ।
उतरूनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते ।।
फडफड करूनी भिजले अपुले पंख पाखरे सावरिती ।
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती ।।
खिल्लारे ही चरती रानीं, गोपही गाणी गात फिरे ।
मंजुळ पावा गाय तयाचा श्रावणमहिमा एकसुरे ।।
सुवर्णचंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला ।
पारीजातही बघता भामारोष मनीचा मावळला ।। – बालकवी – त्र्यंबक बापूजी ठोंबरे
4. घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा ।
केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा ॥धृ.।।
कालिंदीच्या तटी श्रीहरी ।
तशात घुमवी धुंद बासरी ।
एक अनामिक सुगंध येतो, ओल्या अंधारा ॥१॥
कोसळती धारा ।।
वर्षाकालिन सायंकाली
लुकलुक करिती दिवे गोकुळी ।
उगाच त्यांच्या पाठिस लागे भिरभिरता वारा ॥२॥
कोसळती धारा ।।
कृष्णविरहिणी कोणी गवळण ।
तिला अडविते कवाड, अंगण ।
अंगणी अवघ्या तळे साचले, भिडले जल दारा ॥३॥
कोसळती धारा ।। – ग. दि. माडगूळकर
5. वादलवारं सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो ।
भिरभिर वाऱ्यात, पावसाच्या माऱ्यात,
सजनानं होडीला पान्यात लोटलंय् ।।
वादलवारं सुटलं गो !
गडगड ढगांत बिजली करी ।
फडफड शिडात धडधड उरी ।
एकली मी आज घरी बाय ।
संगतीला माझ्या कुनी नाय ।
सळसळ माडांत, खोपीच्या कुडात,
जागनाऱ्या डोल्यांत सपान मिटलं ।।
वादलवारं सुटलं गो !
सरसर चालली होडीची नाळ ।
दूरवर उठली फेसाची माळ ।
कमरेत जरा वाकूनिया ।
पान्यामंदी जालं फेकूनिया ।
नाखवा माजा, दर्याचा राजा,
लाखाचं धन त्यानं जाल्यात लुटलं ।।
वादलवारं सुटलं गो ! – शांता शेळके
मनमोहक पाऊस कविता | Beautiful Poem On Rain In Marathi
पाऊस कविता (Rain Poems In Marathi) या मनातील भावना अत्यंत सुंदररित्या आपल्या जोडीदाराला सांगायच्या असतील तर उपयोगी ठरतात. त्यातही आपल्या मराठी साहित्यातील कवींच्या कविता या नक्कीच मनाला अधिक भावतात.
1. आत्ता पावसाळा येईल
मन पुन्हा ओलं होईल
छत्री उघडू उघडू म्हणता
चिंब चिंब होऊन जाईल
कुणी तरी पावसा कडे
डोळे लाउन पहातंय
मळभ दाटल्या डोळ्यांचं
मन मात्र गातय
पाउस कधी मुसळधार
पाउस कधी रिपरीप
पाउस कधी संततधार
पाउस कधी चिडीचीप
आभाळभर डोळे आता
शोधत आहेत पाउस
कुणालाच दिसत नाही
पापण्यांमधला पाउस
खोल आठवणीचं बीज
अंकुरून येतं मनावर
वसंतात छाटलं असलं
तरी मन नसतं भानावर
परतीचा पाऊस कविता | Lovely Rain Poems In Marathi
परतीचा पाऊस हादेखील मनाला भावणारा असतो. मात्र त्यात एक उदासिनताही असते. परतीच्या पावसाची ही भावना अनेक कवींनी आपल्या शब्दात मांडली आहे.
1. खरा तर मी भाद्रपदातला
कुणी म्हणे मला परतीचा,
गडगडाटाने मुद्दाम आलो
ठेउन मान तुमच्या प्रेमाचा !
मधल्या काळात रूसलो
आभाळातच लपुन बसलो,
चिडले सगळेच माझ्यावर
म्हणुन जाता जाता बरसलो !
पाहुन हिरवी चादर भुईवर
मन कस मग भरून येतं,
तोडू नका हो झाडं तुम्ही
मग मलाही बरसावं वाटतं !
दयाल वचन मला तुम्ही
वसुंधरा ठेवणार हिरवीगार?
ठेवुन लोभ तुम्हावर असाच
पुढल्या वर्षी परत येणार !
चार महिने पुरे झालेत
तुमच्याकडे गावी येउन,
रामराम स्विकारा माझा
चाललो मी परत निघुन! – शिवाजी सांगळे
2. कातर वेळचा गार वारा,
तुझी स्मृती घेऊन भेटतो,
मिट्ट काळोख येता गारवा,
पाऊस अलगद मनात दाटतो
3. हाती आलेलं पीक
भीजलं डोळयादेखत
शेतकर्याच्या नशिबात
सदाच वाईट वखत
मधेच कुठे गायब होतो
वेळेवर चींब भीजवतो
दान देतानाही असा का
हाहाकार तो माजवतो – रघुनाथ सोनटक्के
4. ढगांचा गडगडाट आणि
विजांचा कडकडाट
ओल्या मातीचा कोवळा गंध
चालला तो चिंब
वसुंधरेला भिजवून सृष्टीला विजयाची देऊनी सलामी
परतूनी चालली पावसाची स्वारी
श्रीगजाननावरती वाहूनी अक्षता
नवरात्रीत अंबेमातेसोबत
रास तो खेळला
ढोलताशांसंगे रंगत त्याची न्यारी
परतूनी चालली पावसाची स्वारी
इंद्रधनुचे नभी उधळूनी रंग
ढगांचे पुंजकेही झाले खेळात दंग
रेशमाच्या सरींचा
इंद्रधनुचे नभी उधळूनी रंग
ढगांचे पुंजकेही झाले खेळात दंग
पानाफुलासोबत संग रोमांचित झाले
सृष्टीचे अंग अंग
5. बाहेर पाऊस पडतोय
आणि मला तुझी आठवण सतावतेय
त्या खोल डोहात पुन्हा डुबकी नको
असं म्हणून मन लगेच हृदयाला बजावतंय
पाऊस जोरात आला परतीचा
तू तशी परतून येशील का?
जिथून उगम झाला आपल्या प्रेमाचा
त्या महासागरात पुन्हा विलीन होशील का?
तू निघून गेलीस माझ्याजवळून
इतरांच्या आयुष्यात ओलावा देण्यासाठी
हा पाऊस जसा जाऊन पुन्हा परत येतो
तशी परत येशील का?
तो ओलावा देणंसुद्धा कठीणच होतं तुझ्यासाठी,
पण तरीही तू तुझ्या मनाला तयार केलंस
आपल्याच माणसांच्या आनंदासाठी
आपल्याच माणसाला सोडून दिलंस
पाऊस तर खरोखर परत येतो
आपल्या उगमस्थानास भेटण्या
तुझीच प्रतीक्षा असेल मला
तुझ्या सोबतीची असलेली माझी तृष्णा शमविण्या…– शब्दार्थजीवन
निष्कर्ष – पाऊस कविता (Rain Poems In Marathi) म्हटलं की, अनेक मराठी कविता पावसाळ्यावर (Marathi Poem On Rain) मनात घोंघावू लागतात. पहिला पाऊस कविता (Marathi Kavita On Nature And Rain), मराठी पावसाळी कविता खास तुमच्यासाठी या लेखातून आम्ही दिल्या आहेत.