राणी मुखर्जीचा ‘मर्दानी’ 2014 साली एक हिट चित्रपट ठरला होता. मर्दानी या चित्रपटात राणी मुखर्जीने ‘शिवानी शिवाजी रॉय’ या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील राणीच्या या हटके भूमिकेला प्रेक्षकांनी चांगली प्रतिसाद दिला होता. लहान मुलींची मानवी तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश या विषयावर आधारित हा चित्रपट होता. आता मर्दानी चित्रपटाचा सिक्वल येत आहे. आता ‘मर्दानी 2’ मध्ये राणी मुखर्जी नेमकी कोणती भूमिका साकारणार या कडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. राणी पुन्हा एकदा पोलिसाची भूमिका साकारणार आहे. सध्या सिक्वल आणि पोलिसाच्या भूमिकांचा हिंदी चित्रपटात ट्रेंड आहे. अनेक चित्रपटांचे सिक्वल येत आहेत. शिवाय दबंग, सिंघम, सिम्बा, मर्दानी अशा अनेक चित्रपटामधून साकारलेल्या पोलिसांच्या भूमिकांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. थोडक्यात चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेला एक प्रकारचं ग्लॅमर निर्माण झालं आहे. मात्र मर्दानी मधील भूमिका ही महिला पोलिस अधिकाऱ्याची असल्याने हा चित्रपट इतर चित्रपटांपेक्षा नक्कीच वेगळा असेल.
राणी साकारणार पोलिस अधिकारी
राणी मुखर्जीने मर्दानी 2 चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली असून 2019 च्या वर्षअखेर प्रदर्शित होणार आहे. राणी मुखर्जी तिच्या या भूमिकेसाठी सध्या प्रंचड मेहनत घेत आहे. एका डॅशिंग पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणं नक्कीच आव्हानात्मक असणार. या चित्रपटाची निर्मिती राणी मुखर्जीचा पती आदित्य चोप्रा करत आहे. तर दिग्दर्शक गोपी पुथरन या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. वास्तविक राणीने लग्न आणि मुलीच्या जन्मानंतर चित्रपटात काम करणं कमी केलं आहे. मर्दानी नंतर राणीने ‘हिचकी; या चित्रपटात काम केलं होतं.हिचकीमधील तिची भूमिकादेखील प्रंचड गाजली होती.
राणी मोजक्या चित्रपटात काम करत असली तरी तिच्या भूमिका हटके आणि महत्त्वपूर्ण असतात त्यामुळे आजही राणीचे चाहते तिच्यावर भरभरून प्रेम करताना दिसतात. तिच्या भूमिकांचं नेहमीच कौतुक होत असतं. मर्दानी 2 मधील राणीचा फर्स्ट लुक काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दलदेखील चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
वरुण धवन आणि गर्लफ्रेंड नताशाचं शुभमंगल लवकरच
नवाझुद्दीनचा नवा सिनेमा लवकरच, थरारक असणार हा सिनेमा
फोटोसौैजन्य – इन्टाग्राम