सामान्यतः रक्तदाब (Blood Pressure) ही वृद्धापकाळातील आरोग्य समस्या असल्याचे गृहीत धरले जाते. उच्चरक्तदाब केवळ प्रौढ किंवा ज्येष्ठ नागरिकांमध्येच नाही तर हल्ली तरुणांमध्येही दिसून येते. 20 ते 30 वयोगटातील तरुणांना उच्च रक्तदाबाची समस्या भेडसावते. हल्ली आधुनिक जीवनशैलीमुळे उच्च रक्तदाबासारखी समस्या तरुणांमध्ये दिसून येते. सर्व प्रथम उच्च रक्तदाब (High Blood Pressure) म्हणजे काय हे माहीत असायला हवे. जेव्हा तुमचे रक्तदाब 3 वेळा 140/90 पेक्षा जास्त असेल, तेव्हा तुमचे डॉक्टर तुम्हाला उच्च रक्तदाबाचे रुग्ण म्हणून घोषित करतात. याबाबत आम्ही डॉ. बिपीनचंद्र भामरे, कार्डिओ-थोरॅसिक सर्जन, सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर यांच्याकडून अधिक जाणून घेतले.
रक्तदाबाची कारणे कोणती? (Reason For High Blood Pressure)
झोप न लागणे, ताणतणाव, मादक पदार्थांचे सेवन, खाण्या- पिण्याच्या चुकीच्या सवयी, लठ्ठपणा, धूम्रपान, मद्यपान, मूत्रपिंड किंवा हृदयविकाराचा त्रास, (हायपरथायरॉईडीझम) सोडियमयुक्त पदार्थ खाणे, पुरेसा व्यायाम न करणे ही उच्च रक्तहाबाची काही कारणे आहेत. तरुणांमध्ये हायपरटेन्शनचे (Hypertension) प्रमाण चिंताजनक वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. ही समस्या इतर आजारांना आमंत्रण देते जसे मूत्रपिंड किंवा अधिवृक्क समस्या, काहीवेळा महाधमनीच्या समस्या, अनियंत्रित उच्च रक्तदाब पुढील आयुष्यात हृदय, नेत्र, मूत्रपिंड, मेंदूच्या समस्यांशी जोडलेला असतो.
लक्षणे कोणती?
उच्च रक्तदाबाच्या लक्षणांमध्ये डोकेदुखी (ओसीपीटल), डाव्या खांदा तर कधी कधी पाठदुखी. काही लोकांना छातीत किंवा पाठीत जडपणा जाणवतो. ही लक्षणे तुम्ही जाणवत असतील तर तुम्ही वेळीच डॉक्टरांकडे जाऊन याची तपासणी करायला हवी आणि याकडे वेळीच लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे आवश्यक
औषधे ही उपचारांची पहिली पायरी आहे आणि म्हणून वेळेवर औषधे घ्यावीत. काही रुग्ण विचारतात, आता माझा रक्तदाब नॉर्मल आहे मी औषधे बंद करू शकतो का? त्याचे उत्तर नाही असे आहे. त्यामुळे कृपया लक्षात ठेवा औषधे घेणे थांबवू नका. अर्थात, जीवनशैलीत बदल करून आपण रक्तदाब कमी करू शकतो. एखाद्याने हे सुनिश्चित केले पाहिजे की –
- रोजच्या आयुष्यात ताजी फळे, भाज्या, तृणधान्य, शेंगा आणि कडधान्ये यांचा समावेश असलेला संतुलित आहार घ्यावा
- अतिरिक्त कॅलरीजचे सेवन कमी करा
- चरबीयुक्त पदार्थ कमी करण्याचा प्रयत्न करा
- तुम्हाला कार्बोनेटेड पेय, सोडा, मिठाई, कँडीज, ज्यूस, मिष्टान्न, बिस्किटे, पेस्ट्री, ब्रेड आणि केक टाळावे लागतील
- तुम्हाला तुमच्या मीठाच्या सेवनाचे निरीक्षण करावे लागेल. आहारातील मीठाच्या प्रमाणाबाबत तज्ज्ञांची मदत घ्या
- न चुकता दररोज व्यायाम करा
असे केल्याने तुम्हाला तुमचा रक्तदाब कमी करण्यास आणि इष्टतम वजन राखण्यास मदत होऊ शकते. धूम्रपान आणि अल्कोहोलचे (Smoking and Drinking) सेवन टाळा ज्यामुळे तुमचा रक्तदाब आणखी वाढू शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य बीएमआय राखण्याचा प्रयत्न करा आणि लठ्ठपणा नियंत्रित करा. योग आणि ध्यान यासारख्या विश्रांती तंत्रांचा वापर करून तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. तसंच तुम्ही तुमच्या खाण्याकडे वेळीच लक्ष द्या आणि तरूण आहोत म्हणून दुर्लक्ष न करता, वेळीच व्यायामाचा आणि योगाचा आधार घेऊन आपल्या तब्बेतीकडे लक्ष पुरवा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक