बॉलीवूडवर एका पाठोपाठ एक आघात व्हावे तसे दोन अभिनेत्यांच्या निधनाच्या बातम्या आल्या. बुधवारी गुणी अभिनेता इरफान खान तर गुरूवारी ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी आली. चिंटूजींच्या बॉलीवूड करिश्म्याबाबत आणि स्वभावाबाबतच्या आठवणींना उजाळा दिला निर्माता-दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी.
माझ्या लहानपणी पुण्यातील प्रभात थिएटरला ऋषी कपूर जयाप्रदा या जोडीचा सरगम सिनेमा मी पाहत असताना ‘डफली वाले डफली बजा….’ हे गाणं सुरू झालं आणि प्रेक्षकांनी संपूर्ण थिएटर डोक्यावर घेऊन खिशातील नाणी स्क्रीनच्या दिशेने फेकायला सुरुवात केली. तो सगळा जल्लोष पाहून ऋषी कपूर नावाची जादू मी प्रथम अनुभवली. पुढे सिनेमा क्षेत्रात आल्यावर दिग्दर्शक, निर्माता म्हणून जयाप्रदा यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली. पण ऋषी कपूर यांच्याशी कधी भेट झाली नाही. पण तसे त्यांच्या स्पष्ट स्वभावाचे किस्से मी ऐकून होतो.
सरगम, बॉबी, सागर, खेल खेल मे, कर्ज, प्रेमरोग, चांदनी, नगिना, हिना अशा अनेक चित्रटांमधून मला आवडणारा ऋषी कपूर सिनेमातील गाण्यात रंगीबेरंगी स्वेटर घालण्याच्या त्याच्या स्टाईलमुळे लक्ष्यात रहायचा आणि मला नेहमी प्रश्न पडायचा याच्याकडे कपाट भरून स्वेटर असतील ना? वाढत्या वयाप्रमाणे अग्निपथ, बे दुनी चार, अमर अकबर अँथनी, अग्नीपथ, करीब करीब सिंगला, मुलुक अश्या काही सिनेमांमधून त्याच्या अभिनयाची ताकद दाखवून दिली.
माझ्या ‘मराठी तारका’ कार्यक्रमाच्या पाचशेव्या शोसाठी माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी या दोघींनी येण्यास होकार दिला. मग माझ्या डोक्यात विचार आला की, या दोन्ही हिरोईनबरोबर हिरो म्हणून काम केलेले ऋषी कपूर हे पण जर गेस्ट म्हणून कार्यक्रम पहायला आले. तर आणखी ग्लॅमर वाढेल. ऋषी कपूर यांच्या स्पष्ट काहीश्या फटकळ स्वभावाबद्दल मी ऐकून होतो म्हणून डायरेक्ट फोन न करता मी मोबाईलवर मेसेज करून भेटण्यासाठी वेळ मागितली. तासाभरात मला रिप्लाय आला. उद्या दुपारी साडे तीन ते चारच्या मध्ये चहासाठी आर के मध्ये भेटू. मला अपेक्षित नव्हतं की, इतक्या लवकर मला ऋषी कपूर रिप्लाय देऊन भेटायला बोलवतील. माझे मित्र विजू खोटे यांना मी सांगितले. उद्या आर के स्टुडिओत जातोय. ऋषी कपूर यांना भेटायला. तेव्हा ते म्हणाले की, ”मीसुध्दा बरेच दिवसात चिंटूला भेटलो नाही. तुझ्या निमित्ताने भेटता येईल त्याला.”
दुसऱ्या दिवशी मी आणि विजू खोटे साडे-तीनला तिथं पोचलो. विजू खोटे मला म्हणाले, तू जाऊन तिथे बसलास की, त्याला फक्त सांग की माझे एक मित्र आहेत. जे तुमचे जबरदस्त फॅन आहेत आणि तुमची हरकत नसेल तर त्यांना आतमध्ये बोलावतो मी. आमचं ठरल्याप्रमाणे मी ऋषी कपूर यांच्या केबिन मध्ये गेलो. नमस्कार झाल्यावर मी त्यांना विचारले की,” ऋषिजी मेरे साथ कोई आये है जो आपके बहोत बडे फॅन है. आपसे बस हाय हॅलो करना चाहते है,आप कहे तो उन्हे अंदर बुलाऊ?” यावर पटकन त्याचे उत्तर “इस बुढापे में भी मेरा कोई फॅन है? असं म्हणून मला हसवून पुढे त्यांनी प्रश्न केला. ‘औरत है या आदमी?’ आणि पुन्हा जोरात हसले ते. मी मोबाईलवरून रिंग दिली आणि विजू खोटे आत आल्याचे पाहून ” विजू अबे….असं म्हणत प्रेमाने दोन तीन शिव्या देऊन झाल्यावर, कपूर घराण्याला शोभेल अशा मोठ्या ट्रेमधून चहा, खाण्याचे पदार्थ आले. गप्पा सुरू झाल्या आणि मी ऋषी कपूर यांना सांगितले. माझ्या कार्यक्रमाला तुम्ही यावं अशी खूप इच्छा आहे आणि त्यांना कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. माझं सगळं ऐकून घेतल्यावर त्यांनी मला विचारलं “आपके प्रोग्रॅम में लावणी डान्स है, तो ही मैं आऊंगा. दुनिया के सारे जाम की नशा एक तरफ और मराठी लावणी एक तरफ”. आमच्या कार्यक्रमात एखादी लावणी नेहमीच असते, असं सांगितल्यावर ते खुश झाले. मी माझी तारीख सांगितली. पण त्या तारखेला ते पंजाब ला शूटिंग करत असल्याचे त्यांनी सांगितलं. पण हे ही सांगितले की, एकदा शूटिंगला पोचल्यावर अंदाज घेईन आणि जर तो दिवस मला फ्री मिळाला. तर मी नक्कीच येईन कार्यक्रमाला.
नंतर काही दिवसांनी मोबाईलवर माझे त्यांच्याशी बोलणे झाले तेव्हा ते पंजाबमध्ये शूटिंग करीत होते आणि तिथून त्यांची सुटका होईल असं त्यांना दिसेना. “महेश जी मुश्किल लग रहा है, इस डायरेक्टर ने तो रात में भी मेरा शूट रखा है. मेरे तो पिने के भी….हो गये है”. इतकं स्पष्ट बोलून नंतर पुढे कधी तुमचा कोणताही कार्यक्रम असेल तर मला नक्की बोलवा मी येईन, असं प्रॉमिस ऋषी कपूर यांनी केले आणि माझ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी मला शुभेच्छा म्हणून त्यांनी आठवणीने फुलांचा मोठा गुच्छ माझ्यासाठी पाठवला.
त्यानंतर एका वर्षातच मी आशा भोसले यांच्यावर ‘टाईमलेस आशा’ हा हिंदी कार्यक्रम ठरवला. त्याला अनेक दिग्गज कलाकार आणि आशाताई भोसले स्वतः उपस्थित राहणार होत्या. कार्यक्रम 8 सप्टेंबरला आशाताईंच्या वाढदिवसा दिवशीच होता आणि नेमके ते गणेशोत्सवाचे दिवस होते. मी ऋषी कपूर यांना निमंत्रण दिले होते आणि त्यांनी यावेळी मी नक्कीच येणार असं विश्वासाने सांगितलं. कार्यक्रमाच्या एक दिवस आधी ऋषी कपूर यांना मी आठवण करून द्यायला फोन केला. तेंव्हा त्यांनी त्यांच्या घरी गणपती असतो त्यामुळे संध्याकाळी सात वाजता मी आरती करून लगेच निघतो, म्हणजे बांद्रा वरून निघून भाईदास हॉल विलेपार्लेला आठपर्यंत पोचता येईल.
कार्यक्रमाला सुरू झाला. अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. घरातून निघताना ऋषी कपूर यांनी मला मोबाईलवर मेसेज केला. वेळ जात होती, पण ऋषी कपूर पोचले नाही. त्यावेळी मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे चालू होती आणि गणपतीमुळे ट्रॅफिक खूप होते. डिंपल कपाडिया पण घरातील गणपतीची आरती करून तशीच स्वतः गाडी चालवत कार्यक्रमाला आली होती. कार्यक्रम संपला आणि आम्ही हॉलच्या बाहेर पडणार तर समोर हातात गुच्छ घेऊन ऋषी कपूर गाडीतून उतरताना दिसले. तेव्हा रात्रीचे साडे नऊ वाजले होते. ट्रॅफिकमुळे वेळेवर पोचता न आल्याने ते हळहळत होते. दोन दिवसांनी मी त्यांना एक गणपतीची मूर्ती भेट म्हणून पाठवली ती त्यांना आवडली म्हणून सांगायला त्यांनी आवर्जून मला फोन केला. फोनवर बोलताना मात्र माझा कार्यक्रम पहायला वेळेवर पोचता आले नाही, याची खंत त्यांना राहील असं त्यांनी मला सांगितलं आणि मला त्यांच्याच ‘हिना’ सिनेमातील त्यांच्यावरच चित्रित झालेलं गाणं आठवलं ” मैं देर करता नही देर हो जाती है….
ऋषी कपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.